Wednesday, May 5, 2004

शिवसेनाप्रमुखांचा पासष्टीचा दंडक

शां. मं. गोठोसकर

राजकारणी मंडळींनी वयाची 65 वर्षे पुरी होताच निवृत्त झाले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गोंधळ उडवून दिला आहे. पंडित नेहरू पंतप्रधान असताना 40 वर्षांपूर्वी काहीसा असाच प्रकार घडला होता. ज्यांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगली होती , त्यापैकी काहींना सक्तीची निवृत्ती द्यायची , असे नेहरूंनी ठरविले. त्यांनी त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष कामराज यांच्या तोंडून हे वदवून घेतले. त्याला ' कामराज प्लॅन ' हे नाव पडले. त्यानुसार सत्तास्थानी असलेली काही बडी धेंडे पायउतार झाली. अर्थातच त्या यादीत खुद्द नेहरू नव्हते. त्याप्रमाणेच आता ठाकरे यांचा हा दंडक दुसऱ्यांसाठी आहे. दुसऱ्याच्या तोंडून वदवून घेणे , असली राजकारणातील खेळी त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी स्वत:च पासष्टीचा हा नियम सांगून टाकला. शिवसेनेतील 11 नेते व 13 उपनेते अशा 24 पैकी आठ जण पासष्टी उलटलेले आहेत. त्यापैकी एकानेही शिवसेनाप्रमुखांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या पदाचा अजून राजीनामा दिलेला नाही , हे विशेष होय.

वीस वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच बहुमत मिळाले. त्यावेळी शिवसेना नेते प्रमोद नवलकर म्हणाले , बाळासाहेब आणखी दहा-पंधरा वर्षे निश्चितपणे नेतृत्व करू शकतील. ती 15 वर्षे संपून पाच वर्षे उलटली. अजून ठाकरे यांचे नेतृत्व प्रभावीपणे चालूच आहे आणि ते इतरांना मात्र पेन्शनीत काढायला निघाले आहेत!

भारतात पासष्टी उलटलेली कित्येक राजकारणी मंडळी फार मोठी महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. त्यापैकी कोणीही अजून महामृत्युंजय यज्ञाच्या फंदात पडलेला नाही. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री व मार्क्सवादी नेते ज्योती बसू यांना नुकतीच 90 वर्षे पुरी झाली. आठ वर्षांपूर्वी त्यांना पंतप्रधानपदाची संधी आली होती ; पण पक्षाचे सरचिटणीस हरकिशनसिंग सुरजित यांनी मोडता घातला. नव्या परिस्थितीत पुन्हा संधी आली तर ज्योती बसू या सरदारजीला गुंडाळून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत.

विश्वनाथ प्रताप सिंह , चंदशेखर , नरसिंह राव , देवेगौडा व गुजराल या पाच माजी पंतप्रधानांना ते पद पुन्हा मिळाले तर हवेच आहे. पण आता ठाकरे यांचा पासष्टीचा दंडक आड येतो , त्याला काय करायचे ? या पदाची महत्त्वाकांक्षा असलेले , पण पासष्टी उलटलेले राजकारणी पुष्कळ आहेत. अडवाणी , अर्जुन सिंग , नारायणदत्त तिवारी , विद्याचरण शुक्ल , प्रणव मुकर्जी , मुरली मनोहर जोशी , जॉर्ज फर्नांडिस आदींचा त्या यादीत प्रामुख्याने समावेश करावा लागेल. पासष्टीला पोचायला शरद पवारांना अवघे दीड वर्षे उरले आहे. पंतप्रधानपदासाठीचे राजकारण सत्तरीनंतर सुरू होते , असे ते एकदा म्हणाले होते खरे ; पण शिवसेनाप्रमुखांना ते मान्य नाही , असे दिसते.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची उघड महत्त्वाकांक्षा असणारे सुमारे 50 राजकारणी आहेत. त्यातील 15 जणांची तर पासष्टी उलटून गेली आहे. अंतुले , बाबासाहेब भोसले , निलंगेकर व मनोहर जोशी या माजी मुख्यमंत्र्यांचा त्यामध्ये समावेश होतो. या यादीतील सर्वात वयोवृद्ध म्हणजे यशवंतराव मोहिते. त्यांना आताच 85 वे वर्ष चालू झाले आहे. पण त्यामुळे काही अडत नाही. टी. प्रकाशम हे प्रथमच मुख्यमंत्री बनले , ते 50 वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या आंध्र राज्याचे. त्यावेळी त्यांचे वय 86 वर्षांचे होते. हे लक्षात घेता यशवंतरावांनी महत्त्वाकांक्षेला मुरड घालण्याची गरज नाही. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदासाठी , म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी , 1977 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नव्हते. पण त्यांनी अजून जिद्द सोडलेली नाही. भंडाऱ्यातील आदिवासी गोंदियाचा बाजार का लुटत नाहीत , असा जाहीर सवाल 35 वर्षांपूर्वी मंत्री असतानाच मोहित्यांनी करून खळबळ उडवून दिली होती. तेथील बडे विडी कारखानदार (विडी नं. 27 चे मालक) व आताचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी गेल्या दोन-तीन निवडणुकांपासून नक्शलवाद्यांनाच विकत घेतले आहे. मोहित्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेच , तर वैनगंगेच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेले , हे त्यांना प्रथम ध्यानात घ्यावे लागेल. ते सक्रिय राजकारणात असताना शिवसेनाप्रमुख काय म्हणतात , याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नव्हते. पासष्टीचा नियमही त्यांनी आता ध्यानात घेण्याची गरज नाही.

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या सर्वांनीच पासष्टीनंतर निवृत्त व्हावे , असे ठाकरे यांना खरोखरच म्हणायचे होते , असे गृहीत धरायला हरकत नाही. तेव्हा आता सहकार क्षेत्राकडे दृष्टिक्षेप टाकू. आपण निवृत्त झालो आहोत , असे दाखवून मुलाला सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष करायचा आणि प्रत्यक्षात आपणच तो कारखाना चालवायचा , असे वागणारे आठ-दहा साखरसम्राट आहेत. त्याला अपवाद फक्त बाळासाहेब विखे पाटलांचा. त्यांनी वयाच्या 55 व्या वर्षी आपला 28 वर्षांचा मुलगा राधाकृष्ण याच्याकडे कारखाना सोपवला. नंतर पुन्हा त्याकडे पाहिले नाही. रत्नाप्पा कुंभार तर 89 वर्षी निधन होईपर्यंत सतत 40 वर्षे पंचगंगा साखर कारखाना चालवत होते.

शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेली मर्यादा फारच कमी आहे , असे वाटणारी उच्चभ्रू मंडळी आहेत. सारस्वत सहकारी बँक ही भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असून मुंबईतील मराठी माणसाच्या ताब्यातील ती सर्वात मोठी संस्था आहे. तिच्या एकूण 12 संचालकांचे सरासरी वय 66 वर्षांचे आहे. ऐंशी ओलांडलेले तीन व सत्तरी पार केलेले तीन संचालक तेथे आहेत. अशाप्रकारे हे संचालक मंडळ म्हणजे प्रत्यक्षात अतिवृद्धाश्रम बनला आहे. बँकिंग सुधारणा याविषयी केंद सरकारने नेमलेल्या गांगुली समितीने बँकेच्या संचालकाचे कमाल वय 70 वर्षांचे असावे , अशी शिफारस आपल्या अहवालात केली आहे. पण सारस्वत बँकेने त्या अहवालाची प्रत खरेदीच केली नाही. तेथील एक संचालक डॉ. श्रीरंग आडारकर यांना सध्या वयाचे 85 वे वर्ष चालू असून गेली 37 वर्षे ते या संचालक मंडळावर आहेत. अध्यक्षपद उपभोगून त्यांना 27 वर्षे झाली. तरीही यंदा या बँकेच्या होणाऱ्या पंचवाषिर्क निवडणुकीसाठी ते पुन्हा उभे राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली लक्ष्मणरेषा त्यांना थोडीच बंधनकारक आहे ?

आता खाजगी क्षेत्राकडे वळू. जेआरडी टाटा , घन:श्यामदास बिर्ला , शंतनुराव किलोर्स्कर व आबासाहेब गरवारे हे वयाच्या 80 वर्षांनंतरही कार्यरत होते. गोदावरी शुगर मिल्सचे करमसीभाई सोमय्या तर नव्वदी उलटल्यावरही आपल्या ऑफिसला पूर्ण वेळ येत होते. पण , शिवसेनाप्रमुखांचा दंडक जाहीर होण्यापूर्वी बऱ्याच आधी उद्योगपती दादासाहेब तिरोडकर हे वयाला 65 वर्षे पुरी होताच निवृत्त झाले आणि आपला मुलगा मनोज याच्याकडे त्यांनी कंपनीचा कारभार सोपवला. जीटीएल हे त्या कंपनीचे नाव असून पूवीर्चे नाव ग्लोबल टेलिसिस्टिम्स होते. त्या कंपनीची वाषिर्क विक्री रु. 600 कोटींवर असून प्राप्तिकर दिल्यानंतर निव्वळ नफा रु. 93 कोटी आहे. तिरोडकरांसारखे वेळीच निवृत्त न होणारे मग स्वत:ला निष्कारण त्रास करून घेतात. कराडच्या नीळकंठ कल्याणींनी पुण्याला भारत फोर्ज ही कंपनी स्थापन केली. पुढे मुलगा बाबा कल्याणी याच्या ताब्यात ती दिली. त्याने ती विलक्षण भरभराटीला आणली. त्या कंपनीच्या रु. 10 च्या शेअरचा सध्या शेअरबाजारात रु. 800 हून अधिक भाव चालला आहे. आता मुलगा आपणाला विचारत नाही , अशी तक्रार नीळकंठराव करीत असतात. त्या कंपनीशी संबंधित अशा कोणाचीच बाबा कल्याणींविरुद्ध कसलीही तक्रार नाही , उलट ते सर्व खुश आहेत , यावरच खरे म्हणजे पिताश्रींनी समाधान मानायला हवे.

पासष्टाव्या वर्षी निवृत्त झाले पाहिजे असे म्हणताना , राजकारणी मंडळी बऱ्याच लवकर त्या क्षेत्रात शिरतात , असे बाळासाहेबांनी गृहीत धरले आहे. पण ते खरे नव्हे. त्यांनी स्वत:च शिवसेना 39 व्यावर्षी स्थापन केली आणि हा राजकीय पक्ष आहे आणि आपण राजकारणात आहोत हे सांगायला त्यांनी काही वर्षे घेतली. तेलुगु अभिनेते एनटी रामाराव यांनी पासष्टी जवळ आल्यावर नवा पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केला आणि एका वर्षात सत्ता हस्तगत केली. सत्ता मिळताच लगेच निवृत्ती असा मजेदार प्रकार सेनाप्रमुखांच्या दंडकानुसार तेथे झाला असता.

साठाव्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या मंडळींना , अन्य क्षेत्रांतील मंडळी ' अवघे पाऊणशे वयमान ' होऊनही कार्यरत आहेत हे पाहून , आपल्यावर अन्याय झाला असे वाटते. हा दंडक काढून त्यांची मते शिवसेनाप्रमुखांनी खिशात घातली आहेत. तसेच , अन्य पक्षांतील तरुण व मध्यमवयीन कार्यर्कत्यांचा भलेपणाही त्यांनी संपादन केला आहे.