शां. मं. गोठोसकर
नद्यांच्या आंतरराष्ट्रीय तंट्यांचा विचार करता ब्रह्मापुत्रेबाबत चीनला अडविण्यासाठी भारत व बांगलादेश यांना कसलाही कायदेशीर आधार नाही. याउलट, चीनने तसे धरण बांधले तर ब्रह्मापुत्रेच्या महापुराने दरवषीर् आसामात हाहाकार माजतो, तो बराचसा संपुष्टात येईल. या नदीला वर्षातील तीन महिने पाणी कमी असते. चीनच्या त्या धरणामुळे ते आणखी कमी होण्याचा धोका संभवतो. तो टाळण्यासाठी चीनशी बोलणी करता येतील.
चीनने तिबेट प्रदेशात ब्रह्मापुत्रेवर अतिप्रचंड धरण उभारण्याचे योजले असून, त्याचा वापर पाण्याचे दुभिर्क्ष असणाऱ्या आपल्या काही प्रांतांसाठी करायचा असा त्या राष्ट्राचा संकल्प आहे अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. या संकल्पामुळे भारत व बांगलादेश यांची धाबी दणाणली आहेत, असेही त्यामध्ये म्हटले आहे. चीनने या वृत्ताचा इन्कार केलेला असला तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही. पहिले असे की, ५० वर्षांपूवीर् 'हिंदी चिनी भाई भाई' असा घोष झाल्यानंतर थोड्या काळाने चीनने भारतावर आक्रमण केले आणि नंतर भारत-चीन युद्धही झाले. दुसरे म्हणजे चीनने तिबेटमध्ये सतलज नदीवर मोठे धरण बांधले. ते पुरे होऊन पाण्याने पूर्ण भरले तेव्हाच आपल्या देशाला त्याचा पत्ता लागला. त्यापूवीर् चीनने भारताला त्याचा सुगावासुद्धा लागू दिला नव्हता. अजूनही त्या संबंधात चीन आपणाला कसलीही माहिती देत नाही. हे सर्व पाहता ब्रह्मापुत्रेचे पाणी वळविण्याच्या संकल्पाची वेळीच व आवश्यक तेवढी माहिती चीन देईल अशी अपेक्षा करता येत नाही.
त्या बातमीप्रमाणे ब्रह्मापुत्रेचे वर्षाकाठी २०० अब्ज घनमीटर पाणी वळविण्याचा चीनचा संकल्प आहे. आपल्याकडे धरणांच्या जलाशयांचे आकडे अब्ज घनफुटांचे आहेत. त्यानुसार चीनचा, प्रस्तुत आकडा ७००० अब्ज घनफुटांचा होतो. त्याच्याशी तुलना करता आपल्या धरणांच्या जलाशयांचे आकार अब्ज घनफुटांमध्ये पुढीलप्रमाणे आहेत. खडकवासला साडेतीन, पानशेत दहा, कोयना १००, उजनी ११७, सरदार सरोवर ३७५, इंदिरासागर ४५० वगैरे. हे पाहता पानशेतच्या सातशेपट तर सरदार सरोवराच्या २० पट एवढे ब्रह्मापुत्रेचे पाणी चीन वापरणार आहे. त्या देशाने एवढे पाणी घेतले तर मग भारत व बांगलादेश यांचे काय?
भारतातील अन्य नद्यांच्या संदर्भात ब्रह्मापुत्रेला किती पाणी आहे ते पाहू. आपल्या अन्य नद्यांचे एकूण पाणी उपलब्धतेचे अब्ज घनमीटरमध्ये आकडे असे- गंगा ५०२, गोदावरी ९२, सिंधू ७३, महानदी ४८, नर्मदा ३५, कृष्णा २७, कावेरी ८.५, तापी ६.१८ वगैरे. ब्रह्मापुत्रेचे पाणी गंगेहून जास्त म्हणजे ५३७ अब्ज घनमीटर असून, त्यातील तीन अष्टमांशच पाणी त्या प्रकल्पासाठी लागेल. त्यामुळे भारत व बांगलादेश यांमधील प्रकल्पांना पाणी कमी पडेल असा प्रश्ान् येत नाही. कारण या दोन देशांचा ब्रह्मापुत्रेवर कसलाही प्रकल्प नाही. काही प्रकल्प वर्षानुवषेर् विचाराधीन आहेत एवढेच. नद्यांच्या आंतरराष्ट्रीय तंट्यांचा विचार करता ब्रह्मापुत्रेबाबत चीनला अडविण्यासाठी भारत व बांगलादेश यांना कसलाही कायदेशीर आधार नाही. याउलट, चीनने तसे धरण बांधले तर ब्रह्मापुत्रेच्या महापुराने दरवषीर् आसामात हाहाकार माजतो तो बराचसा संपुष्टात येईल. या नदीला वर्षातील तीन महिने पाणी कमी असते. चीनच्या त्या धरणामुळे ते आणखी कमी होण्याचा धोका संभवतो. तो टाळण्यासाठी चीनशी बोलणी करता येतील. त्यातून काही निष्पन्न झाले नाही, तर भारतातच ब्रह्मापुत्रेवर धरण बांधणे शक्य आहे.
ब्रह्मापुत्रा किंवा अन्य कोणत्याही नदीबाबत भारताचा चीनशी प्राथमिक स्वरूपाचा करारसुद्धा नाही. बांगलादेशाशी असा करार गंगेच्या पाण्याबाबत असून पाकिस्तानशी पक्का करार सिंधू नदीच्या पाण्याबाबत (ट्रीटी) आहे. भारत करारा-प्रमाणे वागत नाही अशी त्या दोन्ही देशांची तक्रार असते. संबंधित नद्यांमध्ये किती पाणी खरेखुरे उपलब्ध असते आणि त्यापैकी भारतात किती वापर होतो याची माहिती त्यांना हवी असते. ती किमान आवश्यक एवढी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. आंतरराष्ट्रीय नदीवर कसलाही प्रकल्प नसेल तर पहिला प्रकल्प बांधणाऱ्या राष्ट्राला अन्य राष्ट्रे अडवू शकत नाहीत. चीनने ब्रह्मापुत्रेवर धरण बांधायला घेतले तर भारत ते अडवू शकणार नाही हे यावरून लक्षात यावे.
पाण्याच्या प्रश्नावरून भारतातील राज्यांच्या दरम्यान भांडणे चालूच आहेत. कर्नाटक व तामिळनाडू यांच्या दरम्यानचा कावेरीच्या पाण्याचा तंटा न मिटणारा आहे. कृष्णेवरील अलमट्टी धरणाच्या जलाशयामुळे सांगली-मिरज-शिरोळ भागात महापूर येतो व तो आठ-दहा दिवस मुक्कामाला राहतो ही बाब मान्य करायलाच कर्नाटक सरकार तयार नाही. गोदावरीचे समुदात वाया जाणारे पाणी आंध्र प्रदेशात मोठा कालवा बांधून कृष्णेत आणता येईल आणि त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक यांना कृष्णेच्या पाण्याचा अधिक वाटा मिळू शकेल हा प्रस्ताव आंध्र प्रदेश सरकारला मान्य नाही. सतलजचे पाणी कालव्याने यमुनेत आणून दिल्लीचा पाणीपुरवठा वाढवावा या गोष्टीला पंजाबचा विरोध आहे. गोव्यातील मांडवी नदी बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात उगम पावते. तेथे तिला म्हादई म्हणतात. गोव्याला न विचारता तेथे मोठे धरण बांधण्याचे काम कर्नाटकाने हाती घेतले असून, ते लवकरच पुरे होईल. कर्नाटकाला हे पाणी त्या नदीच्या खोऱ्याबाहेर वळवायचे आहे! या संबंधात कर्नाटक सरकार व केंद सरकार दाद देईनात म्हणून आता गोवा सरकार सवोर्च्च न्यायालयात गेले आहे. नद्या जोडण्याच्या मिशनचे प्रमुख म्हणून खासदार सुरेश प्रभू यांनी मन लावून विशेष प्रयत्न केले. तथापि, अपवाद वगळता बहुसंख्य राज्ये या गोष्टीला तयार दिसत नाहीत.
देशाप्रमाणे महाराष्ट्राच्या अंतर्गत पाण्यावरून भांडणे आहेतच. उर्ध्व वैतरणेचे पाणी सध्या मुंबई महानगरपालिकेला मिळते. ते सर्व पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीत उपलब्ध करून द्यावे असे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विशेष प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत; पण अजून ते फळाला येत नाहीत. संबंधितांनी या गोष्टीला अजून मान्यता दिलेली नाही. भीमेवरील उजनी प्रकल्पाच्या पाण्याच्या वापराचा मूळ आराखडा बाजूला ठेवून बारामती परिसरातील कारखान्यांना ते पुरविले जाते. हे पाणी पूवेर्कडे मांजरा नदीत सोडावे असाही राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या दोन्ही बाबींना सोलापूर जिल्ह्यातील लोकांचा विरोध आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी पुणे जिल्ह्यालाच जास्त कसे मिळेल या दिशेने तो प्रकल्प राबविला जातो अशी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी तक्रार करीत असतात. धरण बांधताना त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व पाण्याचा वापर व्हावा अशा दृष्टीने बांधकाम करण्यात आले. त्यानंतर वरच्या भागातील लोक आमच्यासाठी धरणे बांधा अशी मागणी करायला लागले. त्यामुळे बांधलेल्या धरणांना पाणी कमी उपलब्ध होण्याचा धोका निर्माण झाला. पेणगंगा, मुळा आदी नद्यांबाबत असा प्रकार आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या पाण्याचा वापर कसा करावा याबाबत चितळे आयोगाने दिलेला अहवाल कोणी विचारात घेतलेला नाही; कारण प्रत्येकाला उसासाठी पाणी हवे आहे. हवे तेवढे ते उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातूनच पाण्याचे तंटे वाढत जाणार आहेत.
आगामी काळात पाण्यावरून युद्धे व यादवी होतील असे भाकीत काही जाणकार व्यक्त करीत असतात. ब्रह्मापुत्रेबाबत तशी परिस्थिती नाही. चीनने हवे तेवढे घेतले तरी उदंड पाणी त्या नदीला उपलब्ध आहे हे वर सांगितलेच आहे. दोनशे अब्ज घनमीटर पाणी नेण्यासाठी कालवा उपयोगी पडणार नाही. त्यासाठी मोठी नदीच बांधावी लागेल! पर्याय म्हणून नळ घालावे लागतील. मुंबईला पाणी पुरविणारे मोठाले नळ ठाणे-भिवंडी बायपासवर दिसतात. त्यांच्या शंभर पटीहून अधिक नळ चीनला घालावे लागतील आणि हे सर्व परवडेल असा त्या आधी हिशेब करावा लागेल. महाराष्ट्रात कृष्णेवरील ताकारी व तत्सम योजनांमध्ये हे परवडत नाही, हे या संबंधात लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व ध्यानात घेता मूळ विषय मोठी भीती बाळगण्यासारखा नाही.