Showing posts with label Infrastructure. Show all posts
Showing posts with label Infrastructure. Show all posts

Tuesday, June 29, 2010

कोकण रेल्वे नव्हे, ही तर पश्चिम किनारा रेल्वे

शां. मं. गोठोसकर

कोकण रेल्वेकडून आपणाला किमान आवश्यक एवढीसुद्धा सेवा उपलब्ध होत नाही याची उशिराने का होईना कोकणवासीयांना जाणीव झाली हे चांगले झाले. ते आता प्रक्षुब्ध झाले आहेत. त्यांच्यातील या असंतोषाला वाट करून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या घोषणा राजकीय पुढाऱ्यांनी केल्या आहेत. महसूलमंत्री नारायण राणे यांनी कोकण रेल्वेविषयक मागण्यांची यादी मांडून त्यासाठी येत्या ९ जुलैला ‘चक्का जाम’ करण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे. त्याआधी ३० जूनला शिवसेनेचे कार्याध्यक्ष याच विषयावर मैदानात उतरणार आहेत. या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करून कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल करण्याची खरोखरच गरज आहे काय?

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत रेल्वेचे जास्तीत जास्त प्रकल्प व कमाल सुविधा मिळविण्यात गुजरात आघाडीवर राहिला. तेथे यासाठी कधीही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रात मात्र यासाठी चळवळी होतात. रेल्वे कशाशी खातात हे मराठी लोकांना माहीत नाही आणि कोकणवासीयांना तर अजिबात नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. नाही म्हणायला ठाण्याचे भूतपूर्व खासदार प्रकाश परांजपे यांनी रेल्वेची कार्यपद्धती जाणून घेऊन एक प्रश्न सोडविला होता. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ठाण्याला थांबवावी अशी त्यांनी रेल्वेकडे मागणी केली होती. ती मान्य करणे कसे अशक्य आहे याचे सविस्तर उत्तर रेल्वेकडून आले. त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला, आणखी माहिती गोळा केली आणि रेल्वेला पुन्हा लिहिले. रेल्वेच्या वेळापत्रकाला कसलीही बाधा न येता महालक्ष्मी ठाण्याला थांबविणे कसे शक्य आहे हे त्यांनी त्यामध्ये दाखवून दिले होते. रेल्वेने ते मान्य केले आणि ही गाडी थांबू लागली. त्यासाठी जक्का जाम करण्याची धमकी परांजप्यांनी दिली नव्हती.

कोकणवासीयांचे रेल्वेविषयक प्रश्न परांजप्यांच्या पद्धतीने हाताळणे नारायणरावांना सहज शक्य आहे. सावंतवाडी ते मुंबई अशी एक्स्प्रेस गाडी सुरू झाली की, यापैकी निम्मे अधिक प्रश्न सुटतात. त्यासाठी सावंतवाडीला प्रथम टर्मिनस तयार करायला हवे असे कोकण रेल्वे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी १८ कोटी रुपये खर्चाची योजना आखण्यात आली असून अतिरिक्त जमीन मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण पडून आहे. तो विषय मी चुटकीसारखा पुरा करतो असे नारायणराव म्हणतात. पण त्याआधी त्यांनी या विषयाचा किमान आवश्यक अभ्यास करण्याची गरज आहे.

कारवारला टर्मिनस तयार न करता तेथून मुंबईसाठी एक्स्प्रेस गाडी गेल्या वर्षी सुरू झाली. मग टर्मिनसविना सावंतवाडीहून सुरू करण्यात अडचण कोणती? टर्मिनस बांधायचे हा आराखडा काय आहे, नवी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासाठी किमान कोणत्या गोष्टी हव्यात आणि तातडीने त्या पुऱ्या कशा करता येतील याचा विचार करून नारायणरावांनी तो कार्यक्रम आखून दिला असता तर आंदोलनाचे पाऊल टाकण्याचा त्यांना विचार करावा लागला नसता. रेल्वेतील जाणकारांच्या मते सावंतवाडीहून एक्स्प्रेस गाडी सुरू करणे अल्पावधीत शक्य आहे. टर्मिनस नाही म्हणून सावंतवाडीहून गाडी सोडता येत नाही असे ११ वर्षांपूर्वी रेल्वेमंत्री असताना राम नाईक म्हणाले होते. नारायणराव त्यावेळी मुख्यमंत्री होते. तेथे टर्मिनस करा असे पत्र त्यांनी त्यावेळी रेल्वेमंत्र्यांना पाठविले असते तर ते केव्हाच अस्तित्वात आले असते.

सावंतवाडीला १८ कोटी रुपयांचे टर्मिनस बांधायचे झाले तर कोल्हापूर-बेळगाव पट्टय़ात तयार होणारी साखर रेल्वेने केरळला पाठविण्यासाठी ते उपयोगी पडू शकेल. रेडी येथील टटा मेटॅलिक्सचा (पूर्वीच्या उषा इस्पातचा) कारखाना हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा औद्योगिक प्रकल्प आहे. तो सावंतवाडी स्टेशनचा वापर करतो. रेडी बंदराचा मोठा विकास होत आहे. त्याला सावंतवाडी हेच जवळचे स्टेशन आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन टर्मिनसच्या आराखडय़ाचा विचार व्हावयास हवा. या स्टेशनच्या लगत दक्षिणेला सावंतवाडी-रेडी राज्य महामार्गावर लेव्हल क्रॉसिंग आहे. टर्मिनसचा भाग म्हणून तेथे उड्डाण पूल बांधावा लागेल. या सर्व खर्चासाठी कोकण रेल्वेकडे पैसे नाहीत. तसेच, नवीन रेल्वे इंजिने, डबे व वाघिणी खरेदी करण्यासाठीही पैसे हवे आहेत. मग करायचे काय?आतापर्यंत कोकण रेल्वे महामंडळाला भारतीय रेल्वेकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध झालेला आहे. यापुढे तसा मिळत राहणे कठीण आहे. यास्तव या सावंतवाडी टर्मिनसचा व नवीन रेल्वेगाडय़ांचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावयास हवा. या राज्याच्या पूर्वेकडील भागात नांदेड-यवतमाळसारख्या नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी निम्मे खर्च देण्याचे या सरकारने मान्य केले आहे. हे सरकार तिकडे शेकडो कोटी रुपये खर्च करणार आहे. हे पाहता सावंतवाडी टर्मिनसबाबत अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही.

कोकण रेल्वे महामंडळाच्या शेअरभांडवलात भारतीय रेल्वेचा ५१ टक्के सहभाग असून बाकीचे ४९ टक्के महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्य सरकारांकडे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा हिस्सा सर्वात मोठा आहे. अशा प्रकारे या महामंडळात आपले राज्य सरकार दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समभागधारक असून त्याला संचालक मंडळावर एक जागा आहे. सध्या त्या जागी आहे कोण व तो करतो तरी काय? कोकणवासीयांचे हे प्रश्न तडीला नेण्यासाठी त्याचा काही उपयोग होईल की नाही? आपण ‘चक्का जाम’ची घोषणा केल्यामुळे संचालक मंडळात त्याची अडचण होईल काय आदी बाबींचा नारायणरावांनी प्रथम विचार करायला हवा होता. कर्नाटकाच्या संचालकाने कारवार-मुंबई एक्स्प्रेस गाडी सुरू करून घेतल्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे बनले आहेत. नव्या रेल्वेची मागणी करताना कोठपासून कोठपर्यंत हे त्यामध्ये नमूद केलेले असते. कोकण रेल्वेबाबत तसे नव्हते. मुंबईहून माझ्या गावापर्यंत रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे अशी प्रत्येक कोकणवासीयाची कल्पना होती. त्याच्या मनात ती ब्रॅन्च लाइन होती, पण प्रत्यक्षात मेन लाइन मिळाल्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे असे त्याला वाटते. मराठवाडय़ात असेच घडले. प्रदीर्घ आंदोलनानंतर तेथे मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले खरे, पण प्रत्यक्षात ती मेनलाइन झाली. ही रेल्वे आपल्या उपयोगाची राहिलेली नाही असे मराठवाडय़ातील लोकांना वाटू लागले आहे.

कोकण रेल्वे होण्यापूर्वी भारतीय रेल्वेचा नकाशा पाहता मुंबई ते मंगळूर एवढय़ा किनाऱ्याला समांतर रेल्वे नव्हती. देशातील रेल्वेच्या जाळ्यातील तो न सांधलेल दुवा (मिसिंग लिंक) होता. तो जोडण्याचे काम या रेल्वेने केले. त्यामुळे केरळ व तामिळनाडूचा पश्चिम भाग यांना मुंबई व पश्चिम भारत जवळ आले. या रेल्वेचा ५५ टक्के भाग कोकणात असून बाकीचा गोवा व कर्नाटक राज्यांमध्ये आहे. तिचे ‘पश्चिम किनारा रेल्वे’ असे यथार्थ नाव ठेवले असते तर ही ब्रँच लाइन नाही याची जाणीव झाल्याने, आपल्यावर अन्याय होत आहे, असे कोकणवासीयांना वाटले नसते.

कोकणाशी संबंध नाही, पण देशाच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाणाऱ्या अशा किती रेल्वेगाडय़ा कोकणातून धावतात याची भली-मोठी यादी देऊन, कोकणवासीयांवर कसा अन्याय होतो हे सांगितले जाते. अशा सुमारे २२ गाडय़ा असल्या तरी त्या सर्व रोज सुटणाऱ्या नाहीत. सरासरीने दिवसाला त्या चार आहेत. या लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये किमान एकेका ठिकाणी थांबल्या पाहिजेत अशी नारायणरावांची मागणी आहे. ती मुळीच व्यवहार्य नाही. मुंबई ते दिल्ली ही राजधानी एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून निघाल्यानंतर थेट सुरतेला जाते. वाटेत ती चार जिल्हे ओलांडते. त्या प्रत्येक जिल्ह्यात ती एकेका ठिकाणी थांबल्यास ती एक्स्प्रेस राहील काय? एर्नाकुलम (केरळ) ते निझामुद्दीन (दिल्ली) ही दुरोन्तो एक्स्प्रेस गाडी वाटेत सात राज्ये पार करते, पण कोठेच थांबत नाही. ती कोकण रेल्वेवरून धावते. जी गाडी राज्यात थांबत नाही तेथे जिल्हयात कशी थांबेल?

कोकण रेल्वेवर शटल सव्‍‌र्हिस हवी ही मागणी कमी अंतराच्या प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. तथापि ती व्यवहाराला धरून नाही. या संबंधात चीनचे उदाहरण लक्षात घ्यावयास हवे. त्या राष्ट्रात ६० वर्षांपूर्वी कम्युनिस्ट राजवट आली तेव्हा तेथील रेल्वे भारताहून फारच अप्रगत होती. सध्या ती कितीतरी पुढे गेली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वे ही केवळ लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी राहील असे धोरण त्या राष्ट्राने अंगीकारले. त्याचा परिणाम म्हणून शेकडो स्टेशने रद्द करण्यात आली. आपल्याकडे स्टेशने रद्द होणे कठीण आहे, पण रेल्वे ही दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीसाठी आहे हे केंद्र सरकार अप्रत्यक्षपणे अंमलात आणत आहे. त्या धोरणाशी शटल सव्‍‌र्हिसची मागणी विसंगत ठरते.

कोकण रेल्वे ही एकच लाइन आहे ती दुहेरी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. सध्या समोरून येणारी गाडी निघून जाईपर्यंत खोळंबून राहावे लागते. दुहेरी झाल्यानंतर हे संपेल असे नाही. मागाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीसाठी कमी अंतराची गाडी खोळंबून ठेवली जाते. रेल्वेची ही अखिल भारतीय कार्यपद्धती आहे. कोकण रेल्वेसाठी ती बदलली जाणार नाही. दुहेरी मार्ग बनविण्याआधी सध्याच्या मार्गाचा पुरेपूर वापर होतो की नाही म्हणजेच लाइन कपॅसिटी पुरेशी वापरली जाते की नाही हे पाहिले जाते. सध्या तिचा पुरेसा वापर होत नाही. उदाहरण द्यायचे तर पुरेसा ऊस मिळत नसेल तर साखर कारखान्याचा विस्तार का करायचा? ते कसेही असले तरी नजिकच्या भविष्यकाळात लाइन कपॅसिटी पूर्णपणे वापरली जाईल असे गृहीत करून दुहेरीकरणाचा आतापासूनच विचार झाला पाहिजे. कोकण रेल्वे बांधण्यासाठी १२ वर्षांपूर्वी जेवढा खर्च आला त्याहून बराच जास्त आता दुहेरीकरणासाठी येईल. तेवढा निधी उभा करणे या महामंडळाला केवळ अशक्य आहे.

कोकण रेल्वे दुहेरी करणे ही गोष्ट किती कठीण आहे हे लक्षात येण्यासाठी काही पूर्वपीठिका ध्यानात घ्यावयास हवी. पेण नगरपालिकेने १८८४ साली ठराव करून कोकणात रेल्वे हवी अशी मागणी केल्यापासून हा विषय सुरू झाला. नवीन रेल्वेबाबत तीन टप्पे असतात. इंजिनिअरिंग रिकॉनिसन्स सव्‍‌र्हे व ट्रॅफिक सव्‍‌र्हे हा पहिला टप्पा असून त्यानंतर रेल्वे बांधायची असे ठरले तर फायनल लोकेशन सव्‍‌र्हे हा दुसरा टप्पा असतो. प्रत्यक्ष बांधकाम हा शेवटचा टप्पा राहतो. ब्रिटिश सरकारने १९२८ साली दिवा ते दासगाव असा पहिला टप्पा करून घेतला. त्यानंतर जागतिक मंदी आल्यामुळे पुढचा विचार झाला नाही.

दिवा-दासगाव हा प्रकल्प रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित होता. ब्रिटिश सरकारने कोकणच्या दक्षिण टोकापर्यंत रेल्वे बांधायची असा विचार करून त्याप्रमाणे पहिला टप्पा का केला नाही? रत्नागिरी जिल्हा फार डोंगराळ असल्यामुळे तेथे रेल्वे बांधणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्यामुळे दासगावपर्यंतच विचार झाला असे कोकणवासीयांना वाटू लागले. मग १९४८ साली पश्चिम रेल्वेतील एक तंत्रज्ञ अ. ब. वालावलकर हे पुढे आले आणि कोकणात रेल्वे बांधणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आणि तसा दहा-बारा वर्षे प्रचार केला. त्याच्या आधारावर लोकसभेतील कोकणच्या प्रतिनिधींनी आवाज उठवायला सुरुवात केली. मोरोपंत जोशी, नाथ पै, प्रेमजीभाई आशर, नानासाहेब कुंटे, मधू दंडवते, शंकरराव सावंत आदी ही मंडळी होती. मग १९७० च्या दरम्यान रेल्वे बोर्डाने मुंबई ते मंगळूर अशी फायनल लोकेशन सव्‍‌र्हे करून घेतली. पण पुढे हालचाल होईना. याचे कारण म्हणजे नवीन रेल्वे बांधण्यासाठी पंचवार्षिक योजनेत सबंध देशासाठी जेवढी तरतूद त्याच्या दुपटीहून अधिक कोकण रेल्वेचा खर्च होता. दुसरे म्हणजे नवीन रेल्वे कोठे बांधायची याचे अग्रक्रम ठरले होते. त्यामध्ये कोकण रेल्वे बसत नव्हती. या प्रकल्पासाठी कधीच पैसे मिळणार नाहीत असा याचा अर्थ होता.

पुढे १७७३ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी दौऱ्यावर आल्या आणि दुष्काळी काम म्हणून कोकण रेल्वे प्रकल्प हाती घेतल्याची त्यांनी जाहीर घोषणा केली. दिल्लीला परतल्यावर आपण भलतेच काही कबूल करून बसलो हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी अशी काही घोषणा केलीच नाही अशा आशयाच्या बातम्या महाराष्ट्राबाहेरील इंग्रजी दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. दुष्काळ संपल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

केंद्रात १९७७ साली सत्तांतर होऊन जनता पक्ष अधिकारावर आला आणि मधू दंडवते रेल्वेमंत्री झाले. तथापि ते, हा प्रकल्प मंजूर करून घेऊ शकले नाहीत. आपटा ते रोहा एवढय़ाच भागासाठी ते सर्व प्रकारची मंजुरी मिळवू शकले. अडीच वर्षांनंतर त्यांचे हे पद गेल्यानंतर रेल्वे रोह्याला पोचायला सात वर्षे लागली. विलंबित आशेने हृदयव्यथा जडावी तसे कोकणवासीयांचे कोकण रेल्वेबाबत झाले आहे असे चिंतामणराव देशमुख १९६० साली म्हणाले होते. या प्रकल्पाचे काम रोह्याला थांबल्यानंतर हृदयव्यथा पुढे चालू राहिली.

कोकण रेल्वे प्रकल्पाला खरी चालना १९८९ साली मिळाली. त्यावेळी माधवराव शिंदे रेल्वेमंत्री होते. त्यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेतील सर्व उच्चाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या प्रकल्पासाठी पंचवार्षिक योजनेत निधी उपलब्ध होत नाही तर तो योजनेबाहेर काढून हाती घ्यावा का असा विचार झाला. त्यासाठी खास अ‍ॅथॉरिटी स्थापन करावी लागेल आणि त्यासाठी रेल्वे कायद्यात दुरुस्ती करणे भाग पडेल, असेही चर्चेत सांगण्यात आले. यावेळी इतर उच्चाधिकाऱ्यांव्यतिरिक्त रेल्वे बोर्डाचे तांत्रिक सदस्य इ. श्रीधरन व इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार राणे उपस्थित होते. कायदा दुरुस्त करण्यात फार काळ जाईल त्याऐवजी कंपनी स्थापन तर झटपट काम सुरू करता येईल असे त्यावेळी राणे यांनी सुचविले. ती सूचना मान्य होऊन रेल्वे मंत्रालय कामाला लागले. माधवरावांनी या निर्णयाला कसलीही प्रसिद्धी दिली नव्हती हे विशेष होय. वयाला ६० वर्षे पुरी झाल्याने राणे त्या दरम्यान निवृत्त झाले. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्याला असते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आजिवली हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे आजोबा १९३४ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून माहीममधून निवडून आले होते.

सन १९८९ अखेरीस दिल्लीत सत्तांतर होऊन जॉर्ज फर्नाडिस रेल्वेमंत्री झाले. त्या अगोदर श्रीधरन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनले होते. त्यांनी जॉर्ज फर्नाडिस यांना कोकण रेल्वेसाठी कंपनी ही कल्पना सांगितली आणि मग चक्रे वेगाने फिरू लागली. कंपनी हे माझे ब्रेन चाइल्ड आहे, असे श्रीधरन यांनी खासदार भारतकुमार राऊत पत्रकार असताना त्यांना १५ वर्षांपूर्वी सांगितले होते. विजयकुमार राणे प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहिल्याने श्रीधरन यांच्या हिशोबाने ते अज्ञातवासात गेले होते.

कोकण रेल्वे महामंडळ स्थापन होऊन बांधकाम सुरू झाले. मुळात ठरल्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे काम करण्याचा त्या संस्थेने निर्णय घेतल्यामुळे अंदाजे खर्चापेक्षा प्रत्यक्ष खर्च बराच अधिक झाला. रेल्वेकडून फार मोठे कर्ज घेण्याशिवाय मार्ग उरला नाही. त्या कर्जाची परतफेड करताना मुद्दल सोडाच, पण व्याजही देणे मुश्किल झाले. अखेरीस कर्जाचे रूपांतर शेअरभांडवलात करून रेल्वे बोर्डाने या महामंडळाची सुटका केली. यापुढे दुहेरीकरणासाठी पैसा उभा करणे महामंडळाला शक्य नसल्यामुळे, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो. आता भारतीय रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा फरक झाला असल्याने ती दुहेरीकरणावर खर्च करू शकेल. कोकण रेल्वे सध्या ४० टक्के जास्त भाडे आकारते. विलिनीकरणामुळे हा भार संपुष्टात येऊ शकेल. एक ऐतिहासिक गरज म्हणून हे महामंडळ स्थापन झाले. आता तशाच स्वरूपाची आवश्यकता निर्माण झाल्याने विलिनीकरण व्हावयास हवे. कोकणवासीयांच्या तक्रारींपैकी विलिनीकरणाने काही निकालात निघणे शक्य होईल.

दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि कमी अंतरासाठी सडक हे चीनचे धोरण असल्याचा यापूर्वी निर्देश केलेला आहे. आता या संदर्भात मुंबई-कोकण-गोवा मार्गाचा १७ म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ चा फेरविचार व्हावयास हवा. कोकणमार्गे मुंबई ते गोवा असा मुळात हा रस्ता आखलेला नाही. रायगड व पूर्वीचा रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तालुक्याची ठिकाणे जिल्ह्याच्या ठाण्याला जोडण्यासाठी मुळात रस्ते झाले. हे दोन जिल्हे जोडण्यासाठी कशेडी घाट अस्तित्वात आला नाही. दीडशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरला हर्णे बंदरात उतरून महाबळेश्वरला जाता यावे यासाठी हा घाट बांधण्यात आला. सध्या या राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा संख्येने अपघात होत असतात. तो चौपदरी करायला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ निघाले आहेत. हा त्यावरचा उपाय नव्हे. अकरा वर्षांपूर्वी नितीन गडकरी या खात्याचे मंत्री असताना त्यांनी मुंबई-पुणे यासारखा मुंबई-गोवा एक्स्प्रेस वे योजला होता. मुंबई ते गोवा कमीत कमी अंतराने, कमीत कमी वळणे व कमीत कमी उंचसखलपणा अशा दृष्टीने तो आखला होता. त्याचे प्राथमिक काम सुरू झाले होते. नारायणराव त्यावेळी मुख्यमंत्री होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता जाताच ते काम बंद पडले. तो संकल्पित एक्स्प्रेस वे ही कोकणची आता खरी गरज आहे. सध्याच्या महामार्गाचे चौपदरीकरण हा त्याला पर्याय नव्हे. उद्धवरावांचे सोडा, पण नारायणराव प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा बारकाईने अभ्यास करतात असा त्यांचा लौकिक आहे. त्याला अपवाद कोकण रेल्वे झाल्याने हा प्रपंच!

Wednesday, January 24, 2007

मुंबईच्या प्रश्ानंकडे दुर्लक्ष

शां. मं. गोठोसकर

रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे मुंबईर्त येत राहिल्यास, कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी महापालिका किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा, अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला, तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रस्तृत केलेल्या जाहीरनाम्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या मूलभूत बाबीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. या महानगरात नागरी सुविधा पुरविणे ही महापालिकेची मुख्य जबाबदारी आहे. पण येथे रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे स्थायिक होण्यासाठी येत राहिल्यास, महापालिकेला कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी ती किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. या देशातील ''सर्व नागरिकांस भारताच्या कोणत््याही राज्यक्षेत्रात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार असेल'', असे राज्यघटनेच्या १९व्या कलमात म्हटलेले आहे. तथापि, सार्वजनिक हितार्थ त्यावर मर्यादा घालण्याचा कायदा सरकारला करता येईल, असेही त्यामध्ये सांगितले आहे. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.

मुंबईच्या विकासखर्चाला पैसा फार अपुरा पडतो. त्यासंबंधात राज्य सरकारपुढे घटनात्मक अडचण आहे. महाराष्ट्रात विकासखर्चाचे वाटप कसे करायचे याचा दंडक राज्यघटनेच्या ३७१ कलमाने घालून दिला आहे. त्यामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित (म्हणजे पश्चिम) महाराष्ट्र असे तीन प्रदेश कल्पिले असून त्यांवर समन्यायानुसार खर्च झाला पाहिजे, असे सांगितले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून मुंबईचा विकासखर्च भागवायचा, असा याचा अर्थ होतो. राज्य सरकारच्या महसुलात मुंबई महानगर प्रदेशाचा हिस्सा ८० टक्क्यांहून अधिक आहे. असे असताना त्याच्या विकासखर्चासाठी लागणारे पैसे मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हिश्श्यातून घ्यायचे, हीच बाब मुळात समन्यायानुसार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीपैकी बराच मोठा भाग या प्रदेशातील विशेष राजकीय ताकद असलेले जिल्हे आपल्याकडे ओढून घेतात. त्यामुळे मुंबईच्या वाट्याला किमान आवश्यक एवढासुद्धा निधी मिळू शकत नाही. मग कोकणच्या वाट्याचे पैसे मुंबईवर खर्च करायचे, असा हा प्रकार गेली ४६ वषेर् चालू आहे. प्राथमिक शिक्षणावरील खर्च ही राज्य सरकारची जबाबदारी असते. मुंबई महापालिका त्यावर वर्षाकाठी चारशे कोटी रुपये खर्च करते. त्यातील काहीसुद्धा हिस्सा महाराष्ट्र सरकार उचलत नाही. मग रस्त्यांसाठी खर्च करायचे काही पैसे प्राथमिक शिक्षणावर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत रस्त्यात खड्डे पडणार नाहीत तर काय होणार? हा अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, मुंबई महानगर प्रदेश, उर्वरित कोकण व उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असे पाच विभाग कल्पिले पाहिजेत. मुंबई महानगर प्रदेशावर रास्त विकासखर्च करून बाकीच्या निधीचे उर्वरित चार विभागांवर समन्यायानुसार वाटप व्हावयास हवे. अशी व्यवस्था झाली तरच राज्य सरकारच्या तिजोरीतून अन्याय न होता मुंबईसाठी पैसा मिळू शकेल.

लोंढे वाढून दिल्ली बकाल होऊ नये म्हणून तिच्या आसमंतासह प्रदेशाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश कल्पिण्यात आला. त्याकरिता केंद सरकारच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. या सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त भर मुंबईतून पडत असते. याचे कारण हे महानगर ही भारताची आथिर्क राजधानी आहे. यास्तव, मुंबई महानगर प्रदेश हा राष्ट्रीय आथिर्क राजधानी प्रदेश आहे, असे कल्पून त्याच्या विकासासाठी केंद सरकारच्या तिजोरीतून निधी उपलब्ध व्हावयास हवा. हे साध्य होण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्ताव मांडून त्यासाठी जोर लावला पाहिजे. पण जाहीरनामे पाहता, निधी उपलब्ध करणे ही बाब कोणाच्याही गावी नाही असे दिसते. अन्य महानगरांतील उपनगर रेल्वे तोट्यात असून मुंबईची नफ्यात आहे. इतर ठिकाणचा तोटा मुंबईने भरून द्यायचा असा हा प्रकार आहे. आता तर इतर ठिकाणांपेक्षा मुंबईचे रेल्वेचे दर वाढवायचे असा विचार चालला आहे. हे टाळण्यासाठी आणि या उपनगर रेल्वेचा पुरेशा गतीने विकास होण्यासाठी तिच्याकरिता वेगळे महामंडळ स्थापन होण्याची गरज आहे. त्यासाठी रेटा लावणे ही गोष्ट महापालिकेलाच करावी लागेल, कारण राज्य सरकारचे त्याकडे लक्षच नाही.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात भर घालण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्प आता हाती घेण्यात येत आहे. ऊर्ध्व वैतरणा प्रकल्पाचे पाणी पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीच्या खोऱ्यात सोडावे अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून चालू आहे. त्या खोऱ्यात नेहमीच पाण्याची तीव्र टंचाई असते हे लक्षात घेता, ती मागणी मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. ती मान्य झाल्यास मध्य वैतरणा प्रकल्प रद्द करावा लागेल. महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंदीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि औरंगाबादचे तरुण तुर्क कृष्णा डोणगावकर या प्रश्ान्ी पुढाकार घेऊन रान उठवतील हे निश्चित. जो प्रकल्प पुढे रद्दच होणार आहे, त्यामागे जाण्यात हशील काय? मुंबईकरिता आणखी पाणी उपलब्ध करण्यासाठी अन्य तीन-चार प्रकल्पांचे अंतिम आराखडे तयार आहेत. ते अमलात आणण्याचा विचार एकाही जाहीरनाम्यात नाही, ही खेदाची गोष्ट होय.

नजीकच्या भविष्यकाळात मुंबईवर एक नवे संकट येऊ घातले आहे. केंद सरकार लवकरच दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमणार आहे. असा पहिला आयोग १९५३ साली नेमण्यात आला, तेव्हा मुंबई महानगराचे वेगळे राज्य व्हावे, अशी येथील बहुतेक साऱ्या बिगरमराठी मंडळींची इच्छा होती. त्यांचे खरेखुरे नेतृत्व इंडियन मर्चंट्स चेंबरकडे होते. त्या संस्थेची सध्या शतसंवत्सरी साजरी होत आहे. ती पुन्हा उचल खाणार नाही, याची हमी काय? या महापालिकेत मराठीऐवजी हिंदीचा वापर व्हावा अशी मागणी बिगरमराठी नगरसेवक सातत्याने करीत असतात. मुंबई महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीत कमीत कमी मराठी व जास्तीत जास्त बिगरमराठी उमेदवार उभे करावे आणि काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर वेगळ्या राज्याचा ठराव करायचा असे मुंबई काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी गुप्तपणे योजले होते. महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी योग्य ती पावले टाकली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आणि या महापालिकेत शिवसेनेला प्रथमच बहुमत प्राप्त झाले. याबद्दल शिक्षा म्हणून वसंतदादांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, ही गोष्ट वेगळी! भारतातील दहा राज्ये लोकवस्तीने मुंबईहून लहान आहेत. तसेच, जगातील १९२ पैकी १२६ राष्ट्रे लोकवस्तीने मुंबईहून छोटी आहेत. जगात महानगरांची वेगळी राष्ट्रे व राज्ये असल्याची उदाहरणे आहेत. दुसऱ्या राज्यपुनर्रचना आयोगाकडे बिगरमराठी मंडळी या दिशेने युक्तिवाद करतील. मुंबईचे वेगळे राज्य व्हावे अशी कोणी मागणी केल्यास आपला तिला पाठिंबा राहणार नाही, असे सर्व पक्षांकडून- विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्याकडून आता जाहीर करून घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनी सतर्क, दक्ष व जागरूक राहून, राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यांमध्ये पुरवणी म्हणून वर सुचविलेल्या बाबी समाविष्ट करणे भाग पडले पाहिजे.

Sunday, February 29, 2004

शंकरराव चव्हाण आणि विस्थापित

कै. शंकरराव चव्हाण यांच्यासंबंधी 35 वर्षांपूवीर्ची ही आठवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात तिळारी नदीवर प्रचंड धरण बांधण्याचा संकल्प राज्य सरकारने जाहीर केला होता. मी त्याचा प्रकल्प अहवाल मिळवून अभ्यास केला. पानशेतच्या साडेतीनपट एवढ्या जलाशयाचे ते धरण परमे गावी बांधायचे होते. आणि नऊ हजार लोक विस्थापित होणार होते. हा प्रकल्प अहवाल केंदीय जल व वीज आयोगाने तांत्रिक छाननी करून मंजूर केला होता. तथापि , या अहवालात मला काही ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. परमेऐवजी आयनोडे गावी धरण बांधले , तरीही पाणी तेवढेच साठविता येईल आणि फक्त तीन हजार लोकांना विस्थापित व्हावे लागेल , असे माझ्या लक्षात आले. मी त्याप्रमाणे लिहिलेला लेख प्रसिद्ध होताच शंकररावांनी त्याची तत्काळ दखल घेऊन , त्या बाबीची चौकशी केली. माझे आक्षेप खरे आहेत , हे लक्षात येताच आयनोडे येथे धरण बांधण्याचे आराखडे तयार करण्याचे त्यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे नंतर धरण तयार झाले. अशा प्रकारे विस्थापित होण्यापासून त्यांनी सहा हजार लोकांना वाचविले.

याउलट आताचे राज्यकर्ते. भीमेवरील उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून गेली तीन-चार वषेर् पाण्याचा तुटवडा आहे. आषाढी-कातिर्कीलासुद्धा चंदभागा वाहत नाही. टाटा पॉवर कंपनीच्या तिन्ही जलविद्युत प्रकल्पांची धरणे घाटमाथ्यावर असून ती सर्व भीमेच्या उपनद्यांवर आहेत. या वीजकेंदाचे लोड फॅक्टर 50 टक्क्यांऐवजी 19 टक्के केला , तर कंपनीचे काहीच बिघडणार नाही आणि त्यामुळे वाचलेले 25 टीएमसी पाणी उजनीला मिळून तुटवड्याचा प्रश्ान् सुटेल , अशा आशयाचा माझा लेख एक वर्षापूवीर् प्रसिद्ध झाला. त्याआधी ही बाब मी राज्यर्कत्यांना कळविली. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. दुष्काळग्रस्तांचे होरपळणे चालू आहे.

शां. मं. गोठोसकर , मुंबई.
Click on this link to read this letter on Maharashtratimes.com