शांताराम मंगेश गोठोस्कर हे स्वतः प्रकट न होणारे पण प्रकाशात येणारी असंख्य माणसे , घटना , तर्क आणि युक्तिवादांमागची कर्तुम-अकर्तुम शक्ती असत. तसे ते मुळात पत्रकार. ' नवशक्ति ' या दैनिकात प्रदीर्घ कारकीर्द केलेले. पण ही त्यांची ओळख फारच अपुरी ठरेल. याचे कारण , महाराष्ट्राचे राजकारण व त्याच्या अनुषंगाने येणारा सहकारक्षेत्राचा प्रचंड डोलारा , समाजकारण आणि त्याला विळखा घालून बसलेली जातिव्यवस्था , आधुनिक अर्थकारण आणि त्याच्या मांडीवरच जाऊन विसावलेला कॉर्पोरेट भ्रष्टाचार , संस्कृतिकरण आणि त्यात घुसणारा प्रांतवाद तसेच जातिविचार... अशा साऱ्यांमध्ये गोठोस्करांना आमूलाग्र रस असे. शिवाय , हा रस केवळ तत्त्ववैचारिक किंवा ' विद्यापीठीय ' नसे. ते स्वतः या घुसळणीतील खेळाडू होते. खरेतर , या लालमातीत ताकदीने शड्डू ठोकणारे पैलवानच होते. पण त्यांचे प्रत्यक्ष रूप , दर्शन आणि बोलणे याच्या विपरीत होते. सौम्य बोलणारे ,हलकेच हसून आपला मुद्दा पटविणारे , महाराष्ट्रासंबंधीच्या असंख्य पण विश्वासार्ह , नेमक्या आकडेवाऱ्यांनी दीपवून टाकणारे , एखाद्याचा एखाद्या विषयात अधिकार आहे असे पटल्यास त्याला विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून शंका विचारणारे... असे गोठोस्कर होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केवळ चालता-बोलता ज्ञानकोश नव्हे तर 'व्यवहारकोश ' हरपला आहे! गोठोस्करांनी असंख्य राजकीय नेते , सहकारातील पुढारी , अॅग्रो-उद्योजक , पत्रकार-संपादक आणि कारखानदारांना व्यावहारिक सल्ले व धडे दिले. हे धडे देताना त्यांचे कायदे-नियमांचे ज्ञान ,अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे भान , सरकारी पातळीवरच्या घडामोडींची जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची तहान हे सारे पणाला लागे. यामुळे , ते कधी कोणत्या प्रकल्पावर काम करत असतील , याचा नेम नसे. कधी ते मराठी- 'इटालियन ' उत्तम भाषांतर करणारा विश्वासाचा माणूस आहे का , अशी विचारणा करीत ; तर कधी एखाद्या आडनावाचा कीस पाडून त्याची जात-पोटजात-प्रांत शोधून काढत. मतदारसंघांची फेररचना झाली , तेव्हा गोठोस्करांनी दिलेले अहवाल , केलेली कामे थक्क करणारी होती. एखाद्या तरुण पत्रकाराची त्यांच्याशी ओळख होणे, यासारखा बोनस नसे. कारण , एखादा विषय व बातमीकडे पाहण्याची नजरच ते बदलून टाकत. कितीतरी दुर्लक्षित आयाम सहज लक्षात आणून देत. ठोस बातम्यांचा त्यांच्याकडे इतका खजिना असे की , ते बोलता बोलता अनेक ' बायलाइन्स ' देऊ शकत. गोठोस्करांसारखी चतुरस्र माणसे भारतासारख्या गुंतागुंतीच्या , अवाढव्य लोकशाहीत वंगणासारखी असतात. अनेक संभाव्य कटकटी , संघर्ष किंवा कटुता ते आपल्या बुद्धिचातुर्याने टाळतात.' रिजिड सिस्टम ' मधून उत्तरे शोधून देतात. असे योगदान देणाऱ्यांकडे निर्मळ दृष्टीने पाहण्याइतकी आपली लोकशाही अजून प्रगत झालेली नाही. तशी ती होईल , तेव्हा गोठोस्करांचे नाव पुन्हा एकदा आदराने स्मरावे लागेल.
Please click here to read this article on Maharashtra Times website.
Please click here to read this article on Maharashtra Times website.
No comments:
Post a Comment