Showing posts with label Loksatta. Show all posts
Showing posts with label Loksatta. Show all posts

Tuesday, November 13, 2012

'सुरस आणि चमत्कारिक.. '


शां. मं. गोठोस्कर हे एक विलक्षण रसायन होते. मूळचे पत्रकार. अगदी महाराष्ट्राच्या जन्माचे साक्षीदार. पु. रा. बेहेरे आदींचा सहवास लाभल्याने मूळचीच विचक्षण असलेली नजर अधिक सजग झालेली. साहजिकच राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार होते. त्यांना ज्याची अंडीपिल्ली माहीत नाहीत, असा महाराष्ट्राचा एक राजकारणी नसेल.  पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावरही साखर संघ वगैरेंत ते सक्रिय कार्यमग्न होते. त्यामुळे राजकारण आणि सहकारी साखर कारखानदारीचे त्यांचे ज्ञान शब्दश: प्रचंड होते. या सगळय़ाच्या जोडीला आपल्याला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगावे ही वृत्ती. त्यामुळे गोठोस्कर हे वर्तमानपत्रीय जगाचे आधारस्तंभ होते. राज्याचा संदर्भ हवा आहे आणि तो त्यांच्याकडे नाही असे क्वचितच झाले असेल. गोठोस्कर जवळपास दररोज वीस वर्तमानपत्रे वाचत आणि अर्धा डझनभर साप्ताहिके, मासिके त्यांच्या नजरेखालून जात. त्यांचे ज्यांच्याशी जवळचे संबंध होते त्यांना गोठोस्कर यांचा दररोज न चुकता एक फोन असायचा म्हणजे असायचाच. आपण जे काही वाचले त्यातले बरोबर काय, असत्य वा चूक ते काय आणि तुम्ही त्यावर काही लिहिणार असलातच तर त्यात काय असायला हवे, असा सल्ला गोठोस्करांनी दिला नाही असे घडले नाही. हे सर्व सकारात्मकच असेल असे नाही. वय आणि अनुभवाच्या आधारे आलेल्या ज्येष्ठतेचा ते प्रसंगी कान उपटण्यासाठीही वापर करीत. अहो.. हे तुम्ही काय लिहून ठेवलेत.. या वाक्याने त्यांचा फोन सुरू झाला की पुढील दोन-पाच मिनिटे आपणास श्रवणभक्ती करायची आहे याची खूणगाठ बांधली जाई. कामाच्या गडबडीत त्यांचा फोन घेता आलाच नाही तर ते एसएमएस करीत. 'अमुक नियतकालिकातील तमुक लेख.. न जमल्यास अमुक परिच्छेद.. न वाचल्यास तो दखलपात्र गुन्हा समजला जाईल, याची नोंद घ्यावी' असा दम देणारा मजकूर त्या एसएमएसमध्ये असे. गोठोस्कर यांचे वैशिष्टय़ हे की ते दुसऱ्या दिवशी पुन्हा कालचे ते वाचलेत का, असे विचारण्यास विसरत नसत. गोठोस्करांनी सांगितले आणि वाचले नाही, असे करण्यास कोणीही धजावत असेल असे वाटत नाही. वयाच्या या टप्प्यावरही गोठोस्कर प्रचंड उत्साही होते. 'लोकसत्ता'चे ते नियमित लेखक. 'लोकसत्ता'चे कार्यालय ही त्यांची क्षणभर विश्रांती होते. हक्काने येत. गोठोस्कर आले की हातातले काम बाजूला ठेवण्यास गत्यंतर नसे. आपल्या अत्यंत मिश्कील शैलीत, 'समजलं का..' असे म्हणून ते काही सांगायला सुरुवात करीत. ते ऐकणे हे कर्तव्य असायचे. हवी ती आकडेवारी त्यांना मुखोद्गत असायची. आकडय़ांची तुलना करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे एखाद्या कंपनीस इतका फायदा झाला असे त्यांच्यासमोर म्हटले गेले की.. म्हणजे अमुक राज्याच्या ठोकळ उत्पादनाइतका.. वगैरे तपशील ते झटक्यात सांगत. त्यामुळे महाराष्ट्रावर लिहू इच्छिणाऱ्यांना एक वेगळीच दृष्टी मिळे. हे माहितीज्ञानामृत पाजून झाले की गोठोस्कर संबंधित विषयातील काही मनोरंजक- आणि बरीचशी खासगी माहिती सांगत. 'आता तुम्हाला काही सुरस आणि चमत्कारिक सांगतो..' अशी सुरुवात करून गोठोस्कर एखाद्या व्यक्तीचा आश्चर्यकारक असा तपशील देत. हे सारे रंगवून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. गोठोस्कर, हे सगळे तुम्ही लिहून ठेवायला हवे.. तुम्ही म्हणजे राज्याचा चालताबोलता इतिहास आहात.. असे आमच्याकडून त्यांना वारंवार सांगितले गेले. 'लिहिणार तर..' असे त्यांचे उत्तर असे. त्यांच्या निधनाने आता ते सगळेच हवेत विरले. महाराष्ट्राचा सुरस आणि चमत्कारिक इतिहास सांगणारी अधिकारी व्यक्ती आपल्यातून कायमची गेली.

ज्येष्ठ अर्थविश्लेषक शां. मं. गोठोस्कर यांचे निधन


ज्येष्ठ अर्थविश्लेषक व स्तंभलेखक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे सोमवारी सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अपर्णा, मुलगा भरत, मुलगी प्राजक्ता पांढरे, सून, जावई व दोन नाती असा परिवार आहे. दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडीत झाल्यानंतर शां. मं. गोठोस्कर यांना १८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ दिवसांपासून ते कोमातच होते. अखेर आज सकाळी ८.४५ वाजता चर्नी रोड येथील मोतीबेन दळवी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य वित्त महामंडळावरही (महावित्त) ते संचालक म्हणून होते.

सहकार, आर्थिक तसेच अनेक राजकीय घडामोडींवरील त्यांचे लेखन 'लोकसत्ता'सह विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम मुंबई - बंगळुरु दरम्यान 'ब्रॉडगेज' रेल्वेमार्गाची कल्पना मांडली होती. तिहारी धरण बांधकामाच्या वेळी दाखविलेल्या प्रत्यक्ष सहभागामुळे सुमारे १० हजार लोकांचे विस्थापन रोखले गेले.


Please click here to read this article on Loksatta.com

Monday, February 13, 2012

मतदारांपुढे मुख्य प्रश्न कोणते?



मुंबई महापालिकेची निवडणूक

शां. मं. गोठोसकर, सोमवार, १३ फेब्रुवारी २०१२

alt
मुंबई महापालिकेच्या सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांनी ‘भ्रष्टाचार’ हा मुख्य मुद्दा केलेला आहे. गेल्या पावसाळ्यात या महानगरातील रस्त्यांना फार खड्डे पडले. युतीचा भ्रष्टाचार हेच या दुरवस्थेचे कारण आहे असा विरोधकांचा आरोप आहे. खरे म्हणजे भ्रष्टाचार हा सबंध देशालाच लागलेला रोग आहे. उद्धव ठाकरेंनी ‘करून दाखवलं’ असे आपल्या प्रचाराने घोषवाक्य करताच ‘चरून दाखवलं’ अशी त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. चरण्यासाठी म्हणजे पसे खाण्यासाठी केंद्र सरकार हे सर्वात मोठे कुरण आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी स्पेक्ट्रम घोटाळा होऊच कसा दिला या प्रश्नावर संमिश्र सरकारमध्ये असे अपरिहार्यपणे घडते, असे त्यांनी उत्तर दिले.
केंद्र सरकारनंतर राज्य सरकार नावाच्या कुरणांचा क्रम लागतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व राज्यांमध्ये सुमारे ५०० मंत्रिमंडळे होऊन गेली. त्यापकी जास्तीत जास्त २५ भ्रष्टाचारमुक्त होती असे म्हणता येईल. एक आंतरराष्ट्रीय संघटना जगातील राष्ट्रांचा कमी भ्रष्टाचारापासून जास्तपर्यंत असा क्रम लावते.  त्यामध्ये फार भ्रष्ट राष्ट्रांमध्ये भारताची गणना होते. आपल्या देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्राची स्थिती अशीच आहे.  हे सरकार चालविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छपणे चालविला जाईल यावर शेंबडे पोरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. मुंबई काँग्रेसला तिच्या अखत्यारीत वेगळे कुरण हवे एवढाच या निवडणुकीतील तिच्या आटापिटय़ाचा अर्थ आहे.
मुंबईतील खड्डय़ांबाबत शिवसेनेचा खुलासा विचारात घ्यावयास हवा. महापालिकेशिवाय राज्य सरकारच्या तीन यंत्रणांचेही रस्ते येथे आहेत. त्यांच्या रस्त्यांवरही खड्डे पडले, पण ते पालिकेचे आहेत असे समजून नागरिक युतीलाच दोष देत राहिले. रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजित रकमांच्या बऱ्याच खाली निविदा भरल्या जातात. सर्वात कमी बोलीची निविदा स्वीकारायची असा नियम सरकारने घालून दिलेला आहे. अंदाजित रकमेच्या जास्तीत जास्त किती निविदा मंजूर करायची याचा नियम आहे, पण कमी किती स्वीकारायची याचा नियम नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होते, असा शिवसेनेचा खुलासा आहे. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार अधिकारावर आल्यापासून धरणे, कालवे आदी कामांच्या अंदाजित रकमा मुळातच ५० टक्के वाढविलेल्या असतात. त्यानंतर नियमांतील कमाल मर्यादेपर्यंत निविदा भरल्या जातील याची काळजी घेतली जाते. त्यानंतर मर्जीतील कंत्राटदाराला ते काम मिळते. अशा प्रकारे दुप्पट खर्च होऊनही कामाचा दर्जा सुमारच राहतो. अशी ही आघाडी मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर काय अरिष्ट ओढवेल याची यावरून कल्पना केलेली बरी!
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी भरपूर पाणी पुरवण्याचे आश्वासन युतीने दिले होते खरे, पण मध्य वैतरणा प्रकल्प अपरिहार्यपणे वेळीच पुरा होऊ शकला नाही त्यामुळे ते अपुरे राहिले. आता लवकरच तो प्रकल्प पुरा होईल. या निवडणुकीत आघाडी विजयी झाली तर भरपूर पाणी पुरवण्याचे श्रेय ती घेईल हे निश्चित.  भारतातील प्रत्येक खेडय़ात पिण्याचे स्वच्छ पाणी भरपूर पुरवण्याचे आश्वासन १९६२ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने दिले होते ते अजून पुरे झालेले नाही. लोक ते विसरले आहेत असे गृहीत धरून मुंबई काँग्रेसने हा गहजब चालविला आहे.
सबंध मुंबईसाठी विजेचा एकच दर करू, असे आश्वासन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. या महानगरात चार वेगवेगळ्या यंत्रणा वीजपुरवठा करतात. केंद्राच्या वीज कायद्यानुसार वीजधंद्याचे नियमन होते. त्याचा विचार करता, एकच दर ठेवणे केवळ अशक्य आहे. खरे म्हणजे सबंध देशात सर्वात महागडी वीज मुंबईत आहे. तसेच शहर बस सेवेचे सर्वात जास्त दर या महानगरात आहेत. भारतात महावितरणाचे दर सर्वात जास्त, तर सबंध देशातील एस.टी. महामंडळांमध्ये महाराष्ट्राचे दर सर्वाधिक आहेत. 
केंद्र सरकारला मुंबईतून अतिप्रचंड प्रमाणात महसूल मिळतो. परंतु या महानगराच्या विकासासाठी त्या सरकारकडून अत्यल्प निधी उपलब्ध होतो, अशी सातत्याने टीका होते. ती करणाऱ्यांमध्ये राज्य सरकार अग्रभागी असते. परंतु, हे सरकार मात्र या पालिकेला किमान आवश्यक एवढा निधी देत नाही. या प्रकरणी मोठी मूलभूत अडचण आहे. राज्यघटनेच्या ३७१ कलमामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र (म्हणजे पश्चिम महाराष्ट्र) असे तीन विभाग कल्पिलेले असून त्यांवर समन्यायानुसार विकासखर्च झाला पाहिजे असा दंडक आहे. याचा अर्थ असा की, राज्य सरकारच्या महसुलात मुंबईतून अतिप्रचंड प्रमाणात भर पडत असली तरी या महानगराच्या विकासाला पश्चिम महाराष्ट्राच्या वाटय़ातून पसे मिळतात.  अर्थातच, ते तोकडे असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर राज्यघटनेतील समन्यायामुळे मुंबईवर अन्याय होत आहे. महाराष्ट्राच्या निधीतून मुंबईच्या विकासासाठी किमान आवश्यक एवढा निधी काढून बाकीची रक्कम उर्वरित कोकण, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यांवर समन्यायानुसार वाटली पाहिजे. आघाडी, युती व मनसे यांच्या जाहीरनाम्यांमध्ये या विषयाचा ऊहापोह व्हायला हवा होता, पण एकानेही या अतिमहत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिलेले नाही.
मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चार यंत्रणा, राज्य सरकार व महापालिका यांची रुग्णालये आहेत. त्यामध्ये राज्य सरकारच्या रुग्णालयांचा दर्जा फारच खालचा आहे. हा दर्जा वर आणण्याचे वचन आघाडीने का दिले नाही?  देणार कशी? कारण राज्य सरकारच्या तिजोरीत तर खडखडाट आहे. अशा अवस्थेत मुंबईसाठी आपण काही करू ही आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचने म्हणजे शुद्ध भूलथापा आहेत.
मुंबईचा खरा राजकीय प्रश्न येथे लक्षात घेतला पाहिजे. भारतातील अब्जाधीशांपकी बहुसंख्य मुंबईत राहतात. काही अपवाद वगळता बाकीचे सर्व अमराठी आहेत.  त्यामुळे येथील मराठी लोक आíथकदृष्टय़ा दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत असे हे अमराठी समजतात. याउलट हे अमराठी लोक भाषिक अल्पसंख्य असल्यामुळे राजकीयदृष्टय़ा ते दुय्यम दर्जाचे नागरिक ठरतात.  मुंबईत बहुसंख्येने असलेले हे धनवान अमराठी लोक हा राजकीय दर्जा किती काळ सहन करतील?  राज्यपुनर्रचनेपूर्वी संकल्पित मराठी राज्याला मुंबई देण्याला या मंडळींचा विरोध होता. तीन दशकांनंतर मुंबई काँग्रेसचे त्या वेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी ही गोष्ट मनावर घेतली. या महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीवेळी काँग्रेसकडून कमीत कमी मराठी उमेदवार उभे करायचे आणि पालिकेत काँग्रेसच्या अमराठी नगरसेवकांचे बहुमत झाले की तेथे मुंबईचे वेगळे राज्य करण्याचा ठराव करून घ्यायचा असा डाव देवरांनी योजला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तो ओळखला. त्यांनी आपले व राज्य सरकारचे सारे बळ शिवसेनेमागे उभे केले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना प्रथमच बहुमताने महापालिकेत सत्तारूढ झाली. अशा प्रकारे वसंतदादांनी मुंबई वाचवली. 
आता देवरांची जागा कृपाशंकरांनी घेतली आहे. फरक एवढाच की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर त्यांना मुंबईच्या वेगळ्या राज्यात ते पद हवे आहे. या निवडणुकीनंतर पालिका काँग्रेस पक्षात कमीत कमी मराठी नगरसेवक राहतील याची त्यांनी काळजी घेतली. तिला अजित सावंतांनी आक्षेप घेताच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हे सर्व करताना पृथ्वीराज व माणिकराव ठाकरे यांना कृपाशंकरांनी काखोटीला मारले होते. निवडणुकीनंतर शिवसेना इतिहासजमा होईल असे भाकीत पृथ्वीराजांनी केले आहे. अल्पशिक्षित वसंतदादा आणि उच्चविद्याविभूषित पृथ्वीराज यांच्या जाणतेपणातील फरक येथे लक्षात भरतो. मुंबईचे राजकारण कशाशी खातात याची पृथ्वीराज व माणिकराव यांना काडीमात्र जाणीव नाही हे स्पष्ट झाले आहे. मुंबईत सतत लोंढे आणत राहणे हा कृपाशंकरांच्या राजकारणाचा स्थायिभाव आहे. कायदा करून या लोंढय़ांना थोपवणे शक्य आहे, पण पृथ्वीराजबाबांना कोण रोखत आहे हे सांगू शकतील.
अशा या संकटप्रसंगी मुंबईतील सर्व मराठी लोकांची एकजूट व्हायला हवी, पण ते तर शिवसेना व मनसे यांमध्ये विभागलेले आहेत. या दोन्ही पक्षांचे ऐक्य व्हावे अशी मराठी लोकांची अंतरीची तळमळ आहे. पण तसे ग्रह जुळून येत नाहीत, कारण कृपाशंकरांचे ग्रह उच्चीचे आहेत ना?

Friday, June 10, 2011

उद्योगांच्या पैशाचे स्रोत काय?

मुंबईत शिवाजी पार्क नाक्यावर शिवसेना भवनासमोर कोहिनूर मिल क्र. ३ ही कापड गिरणी होती. ती आजारी झाल्यावर केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्स्टाइल्स कॉर्पोरेशनने (एनटीसीने) ताब्यात घेतली. पुढे ती बंद पडल्यावर कालांतराने तिची जमीन एनटीसीने लिलावाने विकून टाकली. राज ठाकरे यांनी आपल्या कंपनीतर्फे दुसऱ्यांशी भागीदारी करून ४२१ कोटी रुपयांना ती खरेदी केली. त्यासाठी त्यांनी हा पैसा आणला कोठून, असा सवाल रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केला आहे. तो तपासून पाहावयास हवा. राज ठाकरे राजकारणात असले तरी व्यवसायाने बिल्डर आहेत. आपला एक रुपयाही न घालता शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प उभे करणे या व्यवसायात शक्य असते. अर्थात राजकारण्यांनच नव्हे तर अनेक उद्योजकांना अशा प्रकारे उद्योगासाठी निधी उभारता येतो. व्यापारधंदा करण्यासाठी आपल्याकडे पैसे हवेत, असा गैरसमज मराठी लोकांचा असल्यामुळे या क्षेत्रात ते मागे पडले, असे गेल्या शतकातील एक बडे उद्योगपती लालचंद हिराचंद नेहमी म्हणत असत. ते आठवल्यांच्या कानावर कधी गेलेले नसावे. राज ठाकरे हे सर्वात मोठे मराठी बिल्डर नव्हेत. तो मान किशोर अवर्सेकरांकडे जातो. त्यांच्या युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची गेल्या ३१ मार्चअखेरच्या वर्षांत १७७२ कोटी रुपयांची विक्री झाली आणि प्राप्तिकर दिल्यावर तिला ९.६ कोटी रुपये निव्वळ नफा उरला. तिच्या दोन रुपये ‘पेडअप’ शेअरचा सध्या ७० रुपये भाव आहे. त्या कंपनीच्या शेअरभांडवलाचे बाजारभावाने एकूण मूल्य ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या मोजपट्टीने पहिल्या १५ मराठी उद्योगपतींमध्ये अवर्सेकरांची गणना होते. राजकारणात शिरला आणि फार मोठा बिल्डर झाला, असे मुंबईतील उदाहरण म्हणजे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचे. प्रथम नगरसेवक व नंतर १६ वर्षे आमदार असा त्यांचा प्रवास आहे. १० वर्षांपूर्वी ते सामान्य बिल्डर होते. मग अचानक ते मुंबईतील सर्वात मोठे बिल्डर बनले. वरळीला ६३ मजली इमारत उभी करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला असल्यामुळे या क्षेत्रात ते विशेष तळपत आहेत. त्यासाठी त्यांनी पैसा आणला कोठून, असे आठवले विचारणार नाहीत. लोढा हे मारवाडी असल्यामुळे त्यांच्याकडे वडिलोपार्जित गडगंज पैसा असणार, असे आठवले गृहीत धरून चालतात. गडगंज पैसे येतात कसे हे यानिमित्ताने पाहू. इन्फोसिस या ख्यातनाम कंपनीने आपल्या समभागांची १९९३ मध्ये प्रथम विक्री केली. त्यांची २००६ पर्यंत दीड हजार पटीने मूल्यवृद्धी झाली. असे समजू की राज ठाकरे यांनी १९९३ मध्ये या कंपनीचे १० लाख रुपयांचे शेअर घेतले होते. त्यांचे २००६ पर्यंत मूल्यवृद्धी होऊन १५० कोटी रुपये झाले. कोहिनूरची जमीन खरेदी करण्याकरिता बँकांकडून कर्ज घेण्यासाठी ही रक्कम दुरावा (मार्जिन मनी) म्हणून पुरेशी होती.


तथापि, आपल्या खासगी धंद्यासाठी असा खुलासा देण्याचे राज ठाकरे यांच्यावर मुळीच बंधन नाही. आर्थिक जगतात अल्पावधीत प्रचंड मूल्यवृद्धी झाली, अशी कित्येक उदाहरणे आहेत. या गोष्टी आठवल्यांच्या गावी दिसत नाहीत. (दरम्यान राज ठाकरे यांनी कोहिनूर प्रकल्पातून अंग काढून घेतल्यामुळे ही बाब उपस्थित करण्याचे खरोखर प्रयोजन नव्हते.) २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीवेळी नीरा राडिया यांनी काही विशेष माहिती सांगितली. बडय़ा कंपन्यांची दिल्ली दरबारातील मोठी कामे करून देणे, हा या बाईंचा धंदा आहे. डीबी रिअ‍ॅलिटी ही कंपनी शरद पवारांची असल्याचा सर्वत्र समज आहे असे त्या चौकशीवेळी म्हणाल्या. युनिटी इन्फ्रा ही कंपनी ठाकरे पितापुत्रांची किंवा लोढा ग्रुप महाजन मंडळींची आहे, असा समज असल्याचे नीराबाई म्हणालेल्या नाहीत, हे महत्त्वाचे आहे.


शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई


Wednesday, May 18, 2011

जिल्ह्यांचे विभाजन नको, पुनर्रचना हवी!

शां. मं. गोठोसकर

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्याबाबत तर उपोषणाच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने याबाबत तत्पर राहून हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यांचे विभाजन करण्यापूर्वी तालुक्यांचे विभाजन किंवा पुनर्रचना यासंबंधी सूचना मागविल्या आहेत. हा एकूण विषय अधिक व्यापक दृष्टिकोनातून हाताळला जाणे आवश्यक आहे.

आपल्या देशात १९५६ मध्ये राज्य-पुनर्रचना झाली. त्यासाठी नेमलेल्या फाजल अली आयोगाने आपल्या अहवालात त्याचे मुख्य कारण सांगितले होते. देशातील राज्यांची रचना काही सूत्रबद्धपणे झालेली नसून केवळ ‘ऐतिहासिक अपघातांमुळे’ ही राज्ये बनलेली आहेत आणि म्हणून पुनर्रचना आवश्यक असल्याचे त्या अहवालात म्हटले होते. तीच गोष्ट कोकणातील ‘महसुली खेडी’ (म्हणजे मौजे) आणि सर्व महाराष्ट्रातील तालुके व जिल्हे यांना लागू आहे. कोकणाबाहेर मौजे म्हणजे गावातील लोक गावठाणात राहतात आणि त्या गावाच्या क्षेत्रात शेती करतात, असे स्वरूप असते. कोकणात अनेक वाडय़ा मिळून मौजे तयार होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावात १६ वाडय़ा असून त्याचे क्षेत्रफळ मुंबई शहर जिल्ह्याहून अधिक आहे. हे सर्व ‘ऐतिहासिक अपघात’ आहेत, असे समजून कोकणातील मौजे आणि या राज्यातील तालुके व जिल्हे यांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे. अन्य रीतीने हा विषय हाताळणे योग्य होणार नाही.

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, तेव्हा २६ जिल्हे होते. दोन वर्षांनी जिल्हा परिषदा स्थापन झाल्यावर विदर्भातील काही तालुक्यांमध्ये एकाहून अधिक पंचायत समित्या तयार झाल्या. पुढे १९८० साली अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद व रत्नागिरी या जिल्ह्यांचे विभाजन करून जालना, लातूर व सिंधुदुर्ग हे नवे जिल्हे तयार केले. असे करताना परभणी जिल्ह्याचा परतूर तालुका जालन्याला तर कोल्हापूर जिल्ह्याच्या बावडा तालुक्यातील तळकोकणात असलेली ३७ गावे सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडण्यात आली. काही अंशाने ही पुनर्रचनाच होती. पुढे धुळे, अकोला, चंद्रपूर, भंडारा, परभणी व मुंबई या जिल्ह्यांचे विभाजन झाले. त्यातून नंदूरबार, वाशीम, गडचिरोली, गोंदिया व िहगोली हे नवे जिल्हे निर्माण झाले. मुंबईत शहर व उपनगरे असे दोन जिल्हे तयार झाले. आता ठाणे, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड आदी जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, अशी मागणी होत आहे. पूर्वी विदर्भातील तालुके क्षेत्रफळाने फार मोठे होते. त्यामुळे त्या विभागात नवीन तालुक्यांची मोठय़ा संख्येने स्थापना झाली. पूर्वीचे सिरोंचा व गडचिरोली हे तालुके क्षेत्रफळाने प्रत्येकी वर्धा व रायगड या जिल्ह्यांहून मोठे होते. सध्या ठाणे तालुक्याहून कमी लोकवस्ती असलेले या राज्यात १२ जिल्हे आहेत.

आता या पुनर्रचनेसाठी राज्य सरकारने आयोग किंवा समिती नियुक्त करणे आवश्यक आहे; केवळ सरकारी आधिकाऱ्यांवर विसंबून चालणार नाही. याचे कारण म्हणजे राजकीय बाजू (पॉलिटिकल फॅक्टर) या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईलच असे नाही. जुन्या सिरोंचा तहसिलीमध्ये ४२ टक्के तेलुगू भाषिक होते. त्याचे त्रिभाजन झाल्यावर नव्या सिरोंचा तालुक्यात त्या भाषिकांची संख्या ७२ टक्के झाली. सत्तर टक्क्यांहून अधिक दुसऱ्या भाषेचे लोक असले तर त्या भाषेच्या राज्याला तो तालुका जोडावा, असे फाजल अली आयोगाचे सूत्र होते. त्यानुसार नवा सिरोंचा तालुका जोडावा अशी मागणी तेथील काही मंडळी करू लागली! याउलट, कर्नाटकात जिल्ह्यांची पुनर्रचना/विभाजन करताना सीमाप्रश्नाला बाधा येऊ नये म्हणून बेळगाव जिल्ह्याला स्पर्श करण्यात आला नाही.

महाद्विभाषिक मुंबई राज्याचे १९६० साली विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात यांची निर्मिती झाली. त्यांच्या दरम्यानची हद्द ठरवताना डांग जिल्हा गुजरातला देण्यात आला. ठाणे जिल्ह्याच्या उंबरगाव तालुक्याचा बराचसा भाग गुजरातला गेला. उकाई धरणाखाली बुडणारी त्यावेळच्या धुळे जिल्ह्यातील गावे गुजरातला मिळाली. त्यावेळी महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘अशावेळी देवाणघेवाण अपरिहार्य असते.’ त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, ‘ही तर फक्त देवाणच चालू आहे!’ यामागे त्यावेळी प्रकाशात न आलेली माहिती कारणीभूत होती. तेव्हाच्या धुळे जिल्ह्यातील अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नंदूरबार, साक्री व नवापूर या तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींनी आपणाला गुजरातमध्ये जायचे आहे, असे ठराव केले होते. त्या ठरावांचा गठ्ठा मोरारजीभाईंच्या हातात होता. मग यशवंतराव बोलणार काय? असे असूनही अलिकडच्या काळात नंदूरबार जिल्हा बनविण्यात आला!

जिल्ह्यांची पुनर्रचना करताना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पूर्व व पश्चिम असे दोन जिल्हे करावे लागतील. नवी मुंबई, ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. त्या महानगरपालिका क्षेत्रासाठी वेगळा जिल्हा आवश्यक आहे. उर्वरित ठाणे जिल्ह्याचे तीन जिल्हे करावे लागतील. पुणे जिल्हा क्षेत्रफळ व लोकवस्ती यांनुसार फार मोठा असला तरी त्याला धक्का पोचू नये यासाठी पवार मंडळी जागरूक असतात. खरे म्हणजे बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस, फलटण, माण, माढा, करमाळा आदींचा मिळून नवीन बारामती किंवा इंदापूर जिल्हा व्हायला हवा. धुळे जिल्ह्याचे विभाजन करताना साक्री तालुका नंदूरबारला न जोडण्यात चूक झाली. आता पुनर्रचना करताना ती दुरूस्ती व्हावयास हवी. सांगली शहराला लागून कोल्हापूर जिल्ह्याचा शिरोळ तालुका आहे. तो सांगलीला का जोडू नये?

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कराडचे होते. मी कराडची मुंबई करीन, असे ते एकदा म्हणाले होते. पण तसे घडले नाही. मुंबई सोडाच, पण आता जिल्ह्याचे ठाणे तरी कराडला स्थापन करण्याचा, कराडचेच असलेल्या नव्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण हे तालुके आणि खटाव तालुक्याचा पुसेसावळी विभाग आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, इस्लामपूर, कडेगाव, खानापूर व आटपाडी हे तालुके मिळून कराड जिल्हा होऊ शकतो. त्यानंतर यशवंतरावांच्या स्वप्नाची वाटचाल होऊ शकते.

जिल्ह्याच्या राजकारणावर ज्या पुढाऱ्यांचे वर्चस्व आहे, त्यांना पुनर्रचनेमुळे बाधा येऊ शकते. विधानसभेचा मतदारसंघ एकाहून अधिक जिल्ह्यांमध्ये विभागलेला असता कामा नये, असा नियम आहे. तसेच, तालुक्याची लोकवस्ती विधानसभेच्या एका मतदारसंघाएवढी असली तर तसा तो बनवला जातो. हे सर्व लक्षात घेता मतदारसंघाची पुन्हा पुनर्रचना होताना जिल्हा व तालुका यांच्या फेररचनेमुळे मोठीच उलथापालथ होईल. तालुके व जिल्हे यांच्या पुनर्रचनेमुळे पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांची मोठी मोडतोड व जडणघडण होईल. यामुळे हा विषय राजकीय पुढाऱ्यांच्या चिंतेचा ठरतो. तालुके व जिल्हा यांच्या पुनर्रचनेसाठी सरकारने समिती नेमली तर यापूर्वीच्या अशा समित्यांनी काय केले आणि अन्य राज्यातील समित्यांची काय पध्दती काय होती, हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.

Wednesday, February 23, 2011

अजितदादांच्या टगेगिरीचा शोध!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात खुद्द स्वत:बद्दल टग्या हा शब्द वापरल्यामुळे सर्वजण अचंबित झाले आहेत. या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मराठी-मराठी व मराठी-इंग्रजी असे कित्येक शब्दकोश पाहिले. त्यांमध्ये नमूद केलेले अर्थ असे- उनाड, गुंड, धटिंगण, लबाड, लुच्चा, भामटा व छट, इंग्रजी अर्थ असे- deceit, a huge burly fellow, rogue, rascal व scamp. हे अर्थ ठाऊक असते तर अजितदादांनी हा शब्द वापरला नसता हे उघड आहे. तथापि, फक्त एका शब्दकोशातील अनेक अर्थांपैकी एक आहे, ‘निर्भय म्होरक्या’ intrepid leader! तो अजितदादांना फिट्ट बसतो काय?

शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई

Monday, November 1, 2010

उपमुख्यमंत्री

शां.मं. गोठोसकर , दिवाळी २०१०


महाराष्ट्रात दोन ‘उप’ निर्थक आहेत. एक म्हणजे उपराजधानी आणि दुसरा उपमुख्यमंत्री. २० वर्षांपूर्वी नागपूर ही उपराजधानी म्हणून घोषित झाली खरी, पण त्याचा अर्थ काय हे राज्य सरकारने कधीच स्पष्ट केले नाही. हा दर्जा देण्यापूर्वी ३० वर्षांपासून नागपूरला विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरत होते. तेव्हा ती बाब लागू नाही. राज्य पातळीवरील सरकारी कार्यालये नागपूरहून किती तरी जास्त पुण्याला आहेत. अशा कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या नागपूरच्या पाचपट पुण्याला आहे. उपराजधानी या शब्दाला नागपूरबाबत काही अर्थ उरलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते.या उपराजधानीसारखीच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची स्थिती आहे. अध्यक्षाच्या खालोखाल उपाध्यक्षपद महत्त्वाचे असे आपण सर्वत्र पाहतो. तसे मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्रीपद अशी स्थिती असतेच असे नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री काम करील अशी नियमांमध्ये तरतूद नाही. या नियमांना ‘रूल्स ऑफ बिझनेस’ असे म्हणतात. सहकारी संस्था तिच्या ‘बायलॉज’प्रमाणे तर कंपनी तिच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’प्रमाणे चालविली जाते. राज्याच्या मंत्रिमंडळाचे कामकाज चालविण्यासाठी राज्यघटनेच्या १६६ कलमाखाली राज्यपालांनी नियम तयार केलेले असतात. हेच ते ‘रूल्स ऑफ बिझनेस’ होत. मंत्रिपदी १० वर्षे काम केलेल्या राजकारण्यांना असे ‘रूल्स’ असतात हेच माहीत नव्हते, असे सर्रास आढळून येते. ज्यांना ठाऊक असते त्यापैकी बहुतेकांनी ते वाचण्याची तसदी घेतलेली नसते. अशा परिस्थितीत ते वाचण्याची काळजी सचिवांनी तरी का घ्यावी? असा हा कारभार चाललेला असतो.

राज्यघटनेत उपमुख्यमंत्रीपद नाही, असे या संदर्भात सांगितले जाते. खरे म्हणजे राज्यमंत्री व उपमंत्री ही पदेसुद्धा राज्यघटनेत नाहीत, मुख्यमंत्री व मंत्री एवढीच पदे आहेत. ‘रूल्स ऑफ बिझनेस’मध्ये राज्यमंत्री व उपमंत्री या पदांचा उल्लेख आहे, पण त्यामध्ये उपमुख्यमंत्री नाही. सध्या अमलात असलेले हे ‘रूल्स’ १९६४ साली तयार करण्यात आले. त्या वेळी उपमुख्यमंत्रीपद नव्हते. नंतर त्या ‘रूल्स’मध्ये पाचसहा वेळा दुरुस्त्या झाल्या, राज्यमंत्री हे पद त्या वेळी समाविष्ट करण्यात आले, पण उपमुख्यमंत्रीपदाबाबत तसा विचार झाला नाही.महाराष्ट्रात १९७८ साली उपमुख्यमंत्रीपद प्रथमच तयार झाले. त्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मग संयुक्त मंत्रिमंडळ बनले. त्यामध्ये एस काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर काँग्रेस आयचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. ‘मुख्यमंत्र्याकडे पोचणारा प्रत्येक कागद उपमुख्यमंत्र्यामार्फत जाईल आणि परत खाली जाताना उपमुख्यमंत्र्याकडून रवाना होईल’ असा आदेश काढायला तिरपुडय़ांनी वसंतदादांना भाग पाडले. ‘रूल्स ऑफ बिझनेस’शी हे पूर्णपणे विसंगत होते. वसंतदादांना हे माहीत होते, पण तिरपुडय़ांपुढे त्यांचे काही चालले नाही. पुढे १९८३ साली वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले त्या वेळी रामराव आदिकांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तथापि, पूर्वीसारखा आदेश काढा, असे सांगण्याची रामरावना हिंमत झाली नाही. नंतर १९९५ पासून आजतागायत सातत्याने उपमुख्यमंत्रीपद आहे, पण तसा आदेश निघाला नाही. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील व पुन्हा भुजबळ त्या पदावर आले. त्यामध्ये फक्त भुजबळांनी आपला विशेष जोर दाखविला होता. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करून थोडा काळ का होईना, पण पोलीस कोठडीत ठेवले होते! भुजबळांकडे गृहखाते होतेच, पण उपमुख्यमंत्रीपददही असल्याने ते एवढी हिंमत दाखवू शकले.

केंद्र सरकारच्या मानश्रेणीमध्ये (ऑर्डर ऑफ प्रिन्सिपलमध्ये) उपमुख्यमंत्र्याला राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यापेक्षा बरेच वरचे स्थान आहे. त्या ऑर्डरमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री व राज्याचा मुख्यमंत्री सातव्या तर केंद्रीय राज्यमंत्री व उपमुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर केंद्रीय उपमंत्री व राज्याचा कॅबिनेट मंत्री यांना पंधरावे स्थान आहे. कित्येक सभासमारंभात आयोजकांना मानश्रेणी ठाऊक नसल्यामुळे मोठे प्रमाद घडतात आणि मग मानापमानाचे नाटक होते. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व जयंतराव पाटील हे पंधराव्या क्रमांकावर असले तरी त्यांच्यानंतर दहाव्या स्थानावरील प्रतीक पाटलांचे नाव घालणे हा सांगली जिल्ह्यातील नित्याचा प्रकार आहे.

पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री तर पुत्र सुखबीरसिंह उपमुख्यमंत्री असा प्रकार आहे. तामीळनाडूमध्ये तेवढा निर्लज्जपणा नाही. मुख्यमंत्री करुणानिधींचे पुत्र स्टालिन हे तेथे एक मंत्री आहेत. प्रत्यक्षात ते उपमुख्यमंत्री आहेत असे इतर मंत्री गृहीत धरून चालतात. जुन्या मुंबई राज्यात १९४६ साली बाळासाहेब खेर मुख्यमंत्री तर मोरारजी देसाई गृहमंत्री होते. मोरारजीभाई प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री आहेत असे सर्वजण धरून चालायचे. खरे तर त्यांनी त्या वेळी मुख्यमंत्र्यालाच निष्प्रभ करून टाकले होते!

वसंतराव नाईक १९६३ साली प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. ते प्रत्यक्षात अतिरिक्त मुख्यमंत्री आहेत, अशा थाटात वागत असत. खासदार, आमदार व इतर बाळासाहेबांना त्याप्रमाणे मान देत असत. मुख्यमंत्र्याने आपल्या अनुपस्थितीत आपले काम कोणी करावे हे लिहून ठेवायचे असते. वसंतराव एकदा परदेशी गेले असताना ‘आपली फक्त तातडीची कामे बाळासाहेबांनी हाताळावी’ असे लिहून ठेवले. आपण हंगामी मुख्यमंत्री झालोत असे बाळासाहेबांनी जाहीर केले आणि आपले सत्कार करून घेतले. वसंतदादा मायदेशी परतल्यावर हा फुगा फुटला. पुढे १९६७ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बाळासाहेबांकडचे गृहखाते काढून घेऊन त्यांना महसूल खाते दिले. आगाऊपणाला वेसण घालण्यासाठी हे पाऊल टाण्यात आले होते.विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असण्याच्या काळात, आपल्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री काम पाहतील असे विलासरावांनी लिहून ठेवले होते. मुख्यमंत्र्यांकडे अडकून राहिलेल्या आपल्या महत्त्वाच्या फाइली आरआर आबांनी मंजूर कराव्यात यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यांना फार गळ घातली होती, पण आबांनी दाद दिली नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम ठरले.

अशोक चव्हाणांना भुजबळांबाबत तशी खात्री नसल्यामुळे त्यांनी काहीच लिहून न ठेवता परदेशगमन केले. यावर फार टीका झाली. आरआर आबा म्हणाले, ‘‘जाताना त्यांनी आपली खुर्ची नेली नाही, याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.’’ आबांनी मर्यादा सोडली असा कित्येकांचा समज झाला. खरे म्हणजे त्यांनी याहून मोठा मर्यादाभंग केल्याचे उदाहरण आहे. कर्नाटक सरकारने २००७ साली आपल्या विधानसभेचे अधिवेशन प्रथमच बेळगावला घ्यायचे ठरविले होते. त्याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. आरआर आबा मुख्य पाहुणे होते. आपल्या भाषणात त्यांनी कर्नाटकचे त्या वेळचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा बापच काढला होता. दुसऱ्या दिवशी विधानसभेत या प्रकरणी मोठा गदारोळ झाला. कुमारस्वामींनी तर आबांच्या नावाने मोठा थयथयाट केला!

शंकरराव चव्हाण १९८६ साली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेब विखे-पाटील प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री आहेत असे गृहीत धरून लोक त्यांना आपल्या कामांसाठी भेटू लागले. मी केवळ खासदार असून या राज्यात मंत्रीसुद्धा नाही असे ते सांगायचे. तथापि, लोक काही मुळीच ऐकेनात. या काळात विखे-पाटलांची विलक्षण पंचाईत व्हायची.

एकाच राज्यात दोन उपमुख्यमंत्री असाही प्रकार आपल्या देशात पाहायला मिळतो. झारखंडमध्ये मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे निरनिराळ्या तीन पक्षांचे असल्यामुळे समजण्यासारखे आहे, पण राज्यात एकाच पक्षाचे बहुमत असताना दोन उपमुख्यमंत्री अशी व्यवस्था एकदा मध्य प्रदेशात झाली होती. दिग्विजयसिंह पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते पद सुभाष यादवांना हवे होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री करा असा आदेश हायकमांडने दिला, पण यादवांचे प्रस्थ वाढू नये म्हणून दिग्विजयसिंहांनी यमुनादेवींनाही आणखी एक उपमुख्यमंत्री केले! सरकार व पक्ष यांमधील प्रमुख पदे शक्यतो वेगवेगळ्या प्रदेशातील/ जिल्ह्यांतील नेत्यांकडे असावीत असा रिवाज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला होता. तो गुंडाळून ठेवून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्याचे असा प्रकार २००३ साली काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री हे अधिकारावर आल्यामुळे घडला.

आपल्या देशात राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख तर पंतप्रधान सरकारप्रमुख असतात. काही राष्ट्रांमध्ये हे दोन्ही अधिकार एकाच नेत्याकडे असतात. अमेरिकेत अशी व्यवस्था आहे. हे दोन्ही अधिकार एकाकडेच असलेल्या काही राष्ट्रांचे प्रमुख कधीच परदेशी जात नाहीत, कारण सत्ता गमावण्याचा धोका त्यांना वाटतो. नुसते एकच पद असून अशा परिस्थितीत अधिकारपद गेले असे प्रकार घडलेले आहेत. एकदा मलेशियाचे पंतप्रधान परदेशी गेले तेव्हा उपपंतप्रधानाने प्रत्यक्षात सत्ता बळकावली. पंतप्रधान परतले तर त्यांना कोणी विचारेना, मग त्यांनी काय करावे? ते सतत परदेश दौरे करू लागले. आंध्र प्रदेशात एकदा एन. टी. रामाराव मुख्यमंत्री असताना ते परदेशांच्या दौऱ्यावर गेले आणि इकडे त्यांच्या हातून सत्ता गेली! आपल्या अनुपस्थितीत काम कोणी करावे हे लिहून न ठेवण्यात अशोक चव्हाणांनी हा इतिहास लक्षात घेतला नव्हता.

छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रीपदावरून घालवून ते पद मिळविण्याच्या विशेष प्रयत्नात सिंचन व ऊर्जामंत्री अजित पवार आहेत, अशा आशयाच्या बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्या मुळीच खऱ्या नाहीत. अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि महाराष्ट्रात यापूर्वी कोणीही उपमुख्यमंत्री पुढे मुख्यमंत्री झालेला नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. दुसरे म्हणजे आपण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे मुख्यमंत्री आहोत आणि राष्ट्रवादीचे खरेखुरे प्रदेशाध्यक्ष आहोत असेही अजितदादा गृहीत धरून चालतात आणि राष्ट्रवादीतील बहुसंख्य मंडळी ते मान्य करून चालतात. हे सर्व लक्षात घेता, उपमुख्यमंत्रीपद मिळविण्याच्या फंदात अजितदादा का पडतील?

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्याला त्या पदाचे म्हणून काहीच काम नसते. त्याच्याकडे असणाऱ्या खात्याच्या मंत्री म्हणून असणारे काम फक्त त्याने हाताळायचे असते. असे असताना त्याच्याकडे अधिकारी व कर्मचारी यांचा अतिप्रचंड फौजफाटा कशासाठी? राज्य सरकारच्या आकृतिबंधाप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या मुख्यमंत्र्याकडे १३५, उपमुख्यमंत्र्याकडे ६४, मंत्र्याकडे १५ व राजमंत्र्याकडे १३ अशी ठरलेली आहे. हे पाहता गरजेपेक्षा किती तरी पटीने जास्त अधिकारी व कर्मचारी उपमुख्यमंत्र्याकडे आहेत हे स्पष्ट होते.हा सारा नासिकराव तिरपुडय़ांचा वारसा आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सचिवालय म्हणतात. नासिकरावांनी त्याप्रमाणे ‘उपमुख्यमंत्र्यांचे सचिवालय’ तयार केले. साहजिकच, त्याला शोभेल एवढी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या असली पाहिजे हे ओघानेच आले. तथापि, त्यानंतरच्या एकाही उपमुख्यमंत्र्याने एवढय़ा संख्येची मुळीच गरज नाही असे सांगण्याचा प्रामाणिकपणा दाखविलेला नाही. संख्या कमी झाली तर आपले महत्त्व कमी होईल अशी खोटी भीती यामागे असते. या लेखात विशद केल्याप्रमाणे या पदाला मुळात महत्त्वच नाही. मग भीती का वाटावी?

मंत्र्याने त्याच्या हाताखालील राज्यमंत्री व उपमंत्री यांना कामे वाटून द्यावीत असे ‘रुल्स ऑफ बिझनेस’मध्ये म्हटले आहे; परंतु सध्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून एकाही मंत्र्याने तसे न केल्यामुळे सर्व राज्यमंत्री कामाविना आहेत. केंद्रातही अशीच परिस्थिती आहे. ५० वर्षांपूर्वी स. का. पाटील केंद्रीय मंत्री असताना त्यांनी आपल्याकडे मुख्य तेवढे अधिकार ठेवले आणि बाकीचे सर्व राज्यमंत्री व उपमंत्री यांना वाटून टाकले. मंत्रालय (म्हणजे त्यांच्याकडील खाती) चालविण्यासाठी आपण दिल्लीत नसून राजकारण करण्यासाठी येथे आहोत असे ते म्हणत असत. खरे म्हणजे मंत्र्याने कनिष्ठ मंत्र्याला काम नेमून दिले पाहिजे असा दंडकच असायला हवा. त्यासाठी ‘रुल्स’मध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. सध्याचे ‘रुल्स’ १९६४ साली तयार झालेले आहेत हे वर म्हटलेच आहे. आता केंद्र सरकारचे व अन्य राज्य सरकारांचे ‘रुल्स ऑफ बिझनेस’ लक्षात घेऊन महाराष्ट्रात पूर्णपणे नवे ‘रुल्स’ तयार करण्याचे नवीन राज्यपाल शंकरनारायणन यांनी मनावर घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याला अधिकार कसे द्यावेत हेसुद्धा त्यामध्ये नमूद केले तरच त्या पदाला खरा अर्थ प्राप्त होईल.

Tuesday, October 26, 2010

‘वाचकांनी तुम्हाला शहाणे म्हटले पाहिजे!’

कोणत्याही बातमीच्या मुळाशी जाऊन त्यातील सत्यासत्यता वाचकांपुढे आणणारे, कोणत्याही घटनेमागे नेमके काय घडले आहे याची पूर्ण माहिती घेऊन ती वाचकांपर्यंत पोहोचविणारे शां. मं. गोठोसकर म्हणजे गेल्या साडेचार दशकांच्या मराठी पत्रकारितेचे साक्षीदार आहेत. आपला मुद्दा वेळप्रसंगी समाजाच्या आणि राजकारण्यांच्या विरोधात जाऊनही ठामपणे मांडणारे गोठोसकर आज आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काही आठवणींना दिलेला उजाळा.
---------

माझा पहिला लेख १९५८ साली मे महिन्यात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाला. त्या वेळी मी २२ वर्षांचा होतो. कोकण रेल्वे हा विषय होता. सलग तीन लेखांकात तो प्रसिद्ध झाला. मला आकाश ठेंगणे झाले होते. त्या वेळी मी कोल्हापूरला सरकारी नोकरी करीत होतो. मला पत्रकार व्हायचे होते. ती नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही सत्पात्र आहात, असे तो लेख वाचल्यावर माझ्या मित्रांनी सांगितले.एक वर्षांनंतर सरकारी नोकरी सोडून मी मुंबईला आलो. पत्रकार म्हणून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांचे त्या वेळी ‘लोकमित्र’ दैनिक होते. ते मालक व संपादक होते. त्यांना मी १५ नोव्हेंबर १९५९ रोजी भेटलो. त्यांनी त्यांच्या दैनिकातील एक ज्येष्ठ पत्रकार वि. गं. देशपांडे यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितले.

दैनिक वर्तमानपत्राला कॉलम किती असतात येथून प्रश्न सुरू झाले. ‘कॉलमातील एका ओळीत अक्षरे किती असतात?’ मी उत्तरलो, ‘आपल्याकडे १७ तर इतर दैनिकांमध्ये १९ असतात.’ अशा फरकाचे कारण काय, असे देशपांडय़ांनी विचारता आपले कॉलम अरूंद आहेत, असे मी सांगितले. त्यांनी लगेच खात्री करून घेतली. एका कॉलमात ओळी किती असतात, या प्रश्नावर इतरांपेक्षा आपल्याकडे जास्त कारण आपले कॉलम अधिक लांबीचे आहेत, असे मी सांगितले. त्याचीही त्यांनी खात्री करून घेतली. हा प्राणी निरूत्तर होण्यापैकी नाही, हे देशपांडय़ांच्या लक्षात आले. त्यांनी होकार सांगितल्यावर एस. एम.नी मॅनेजर श्रीरंग साबडे यांना बोलावून सांगितले, ‘यांना दीड महिना उमेदवारी करू द्या. त्यानंतर पेरोलवर घेण्याचा विचार करू.’

महाद्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करण्याची पूर्वतयारी त्या वेळी चालू होती. मुंबईच्या उत्पन्नातून महाराष्ट्राने गुजरातला दरवर्षी चार कोटी रुपये याप्रमाणे १० वर्षे द्यायचे, असा प्रस्ताव पक्का होत आला होता. त्याला विरोध करणारा माझा लेख ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या अंकात मुख्य लेख म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एस. एम. साहेबांवर टीका होती. माझ्या नोकरीचा तो तिसरा दिवस होता. दुपारी एस. एम. ‘लोकमित्रा’त आले. ‘तो लेखक तुम्हीच का?’ असे मला विचारून माझ्या टेबलासमोरच्या खुर्चीवर ते बसले आणि त्यांनी अर्धा तास त्या लेखावर चर्चा केली. नंतर ते आपल्या केबिनमध्ये गेले. त्यांनी साबडेंना बोलावून घेतले आणि ‘गोठोसकरांना पे-रोलवर घ्या,’ असे सांगितले. अशा प्रकारे मी ‘लोकमित्र’मध्ये उपसंपादक झालो.त्या वेळी त्या दैनिकात संपादक खात्यातील कोणीही अग्रलेख लिहीत नसे, तर तो बाहेरून येत असे. आऊटसोर्सिग हा शब्द भारताच्या किनाऱ्याला लागण्यापूर्वीच ही व्यवस्था होती. एकदा तसा अग्रलेख येऊ शकला नाही, मग वृत्तसंपादक दिनकर भागवत यांनी सर्वाना प्रश्न केला, ‘अग्रलेख कोण लिहू शकेल?’ मी हात वर करताच त्यांनी मला बोलावून घेतले, चर्चा केली आणि ‘लिहा’ म्हणून सांगितले. अशा प्रकारे पहिला पगार मिळण्यापूर्वीच या ज्युनिअरमोस्टचा अग्रलेख छापून आला.

पुढे १९६१ च्या जुलैमध्ये पानशेत धरण फुटले आणि त्याचा परिणाम म्हणून खडकवासला धरणही कोसळले. पुण्यात भीषण असा जलप्रलय झाला. त्या वेळी सेंट्रल वॉचर अॅण्ड पॉवर कमिशनचे ‘भगीरथ’ हे इंग्रजी मासिक प्रत्येक दैनिकाकडे भेट म्हणून पाठविले जात असे. ते अंक मी जपून ठेवत असे. ते चाळले असता, धरणे कशी फुटतात या विषयावर एक लेख होता. तो दोनदा काळजीपूर्वक वाचला, त्याचा अनुवाद केला आणि लेखक म्हणून माझ्याच नावाने छापला. या विषयावर फक्त ‘लोकमित्र’मध्ये लेख आल्याने वाचकही खूश झाले. पत्रकारितेमधील माझे हे पहिले चौर्य!

दक्षिणोत्तर लांबलचक रत्नागिरी जिल्ह्याचे १९८० साली विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच ही मागणी चालू होती. मी ‘लोकमित्र’मध्ये असताना संपादक मंडळात याची चर्चा झाली. मी म्हणालो, ‘विभाजन न करता सागरकिनारी मध्यावर जे गाव असेल तेथे जिल्ह्याच्या ठाण्याचे स्थलांतर करावे.’ एसएम चिडले. ते मला म्हणाले, ‘तुम्ही लहान आहात. असले प्रश्न राजकीय असतात, ते कधीच गणिताने सुटत नसतात हे कायम लक्षात ठेवा. तरी पण मला सांगा, तसे मध्यावर गाव कोणते येते?’ मी उत्तरलो, ‘पावस!’ ते आमच्या संपादकांचेच गाव होते. ते यावर म्हणाले, ‘गोठोसकरांचा तोडगा अगदी बिनतोड आहे!’

‘लोकमित्र’मध्ये दोन वर्षे झाल्यानंतर १९६२ साली मी दैनिक ‘नवशक्ती’मध्ये उपसंपादक म्हणून दाखल झालो. त्यावेळी पु. रा. बेहेरे सहसंपादक होते. नव्याने आलेल्या उपसंपादकांपैकी कोणाला स्फुट लिहिता येते काय याची त्यांनी चाचपणी केली आणि मला एक स्फुट लिहायला सांगितले. त्यांनी ते वाचले आणि फाडून टाकले. ते म्हणाले, ‘माहिती, विचार व युक्तिवाद सारे काही चांगले आहे, पण ‘मी शहाणा कसा?’ या थाटात ते लिहिले आहे. त्याऐवजी वाचकांनी तुम्हाला शहाणे म्हटले पाहिजे, अशा धोरणाने हेच स्फुट पुन्हा लिहा.’

पुढे १९६५ साली पां. वा. गाडगीळ ‘नवशक्ति’चे संपादक झाले. कोणत्याही योग्य विषयावर आज अग्रलेख लिहा असे त्यांनी एकदा मला सांगितले. तो वाचल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही यामध्ये संबंधितांवर सडकून टीका करताना कित्येक मुद्दे वापरले आहेत. तुमच्याकडे आणखी मुद्दे आहेत की संपले?’ मी ‘संपले’ असे सांगताच ते म्हणाले, ‘निम्मे मुद्दे वापरून तुम्ही पुन्हा अग्रलेख लिहा. तुमच्याकडे एवढाच मसाला आहे, असे गृहीत धरून संबंधित मंडळी उत्तर देतील. मग राहिलेले मुद्दे वापरून त्यांचा निकाल लावा.’ मग गाडगीळसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे काय असेल, याची बातमी एकदा ‘नवशक्ति’मध्ये त्याच दिवशी मी दिली. अर्थमंत्री बॅ. वानखेडे यांचे भाषण संपताच विरोधी सदस्य डॉ. मंडलिक यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आक्षेप घेतला. त्यावर अर्थमंत्री उत्तरले, ‘तीन महिन्यांपूर्वी मी दिल्लीला जाऊन पुढच्या वार्षिक योजनेबाबत नियोजन आयोगाशी चर्चा केली. त्याची बातमी ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या २६ नोव्हेंबरच्या अंकात आली आहे. त्यामध्ये कसलाही बदल न करता ‘नवशक्ति’ची बातमी ‘भांडाफोड’ म्हणून तयार करण्यात आली. संबंधित पत्रकाराच्या बुद्धिचातुर्याचे मी कौतुक करतो.’

पुण्यात खासगी कंपनी वीजपुरवठा करीत होती त्यावेळची ही गोष्ट. गणेश खिंडीत तिचा मुख्य ट्रान्स्फॉर्मर होता. त्याचा १९६८ साली स्फोट होऊन सबंध पुणे काळोखात बुडाले. त्या कंपनीचा वार्षिक अहवाल महिन्यापूर्वी ‘नवशक्ति’च्या कार्यालयात आला होता. तो मी वाचला. ‘त्या ट्रान्स्फॉर्मरवर त्याच्या शक्तीपेक्षा भार वाढला असून तो आणखी वाढतो आहे. जास्त शक्तीच्या ट्रान्स्फॉर्मरची आयात करण्यासाठी आम्ही तीन वर्षे प्रयत्न करीत आहोत, पण केंद्र सरकार परवाना देत नाही. त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मरचा कधी स्फोट होऊन साऱ्या पुण्यात अंधार होईल हे सांगता येत नाही,’ अशा आशयाचा मजकूर त्या अहवालात होता. तो वाचून कंपनीचे अध्यक्ष गोकुळचंद मोरारका यांची मुलाखत घेतली आहे, असे कल्पून बातमी तयार केली. ती पहिल्या पानावर आली. ती वाचून ‘नवाकाळ’चे त्यावेळचे संपादक आप्पासाहेब खाडिलकर म्हणाले, ‘याला म्हणतात खरा जरनॅलिझम! सर्व दैनिकांमध्ये फक्त ‘नवशक्ति’ने कंपनीचे म्हणणे काय हे जाणून घेतले.’ पत्रकारितेमधील माझे हे दुसरे व अंतिम चौर्य!

पु. रा. बेहेरे १९६८ साली ‘नवशक्ति’चे संपादक झाले. त्यावेळी तिलारी प्रकल्पाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. महाराष्ट्र व गोवा यांच्यासाठी सिंचन व जलविद्युत यांकरिता तो आंतरराज्य बडा प्रकल्प होता. त्यावर ‘लिहा’ असे बेहेरे म्हणाले. मग मी त्या प्रकल्पाचा गोपनीय अहवाल मिळविला आणि त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये मला दोन ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. विशेष म्हणजे सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर कमिशनने तो अहवाल तांत्रिकदृष्टय़ा तपासून संमत केला होता. तरीही त्यामध्ये चुका राहून गेल्या होत्या.तिलारी प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील परमे गावी मुख्य धरण योजले होते. त्याचा जलाशय पानशेतच्या तिपटीहून किंवा वैतरणाच्या दुपटीहून मोठा राहणार होता. त्या जलाशयामुळे नऊ हजार लोक (१९६१ च्या जनगणनेनुसार) विस्थापित होणार होते. या विषयावर ‘नवशक्ति’मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. परमे गावच्या वरच्या बाजूला दोन किलोमीटरवर असलेल्या आयनोडे गावी धरण बांधल्यास फक्त तीन हजार लोक विस्थापित होतील असे मी त्यात म्हटले होते. त्यावेळचे सिंचनमंत्री शंकरराव चव्हाण यांनी तो लेख वाचला. त्या प्रकल्प अहवालात ढोबळ चुका आहेत, याची त्यांनी खात्री करून घेतली आणि मग परमे येथील जागा रद्द करून आयनोडे येथे धरण बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सरकार आपल्या गतीने चालते. त्यानुसार आयनोडेचे धरण पुरे व्हायला ३५ वर्षे लागली. तीन वर्षांपूर्वी त्यामध्ये पाणी भरण्यात आले. माझ्या लेखामुळे सहा हजार लोक विस्थापित होण्यापासून म्हणजेच घरावरून नांगर फिरविला जाण्यापासून वाचले. माझ्या आयुष्यात माझ्या हातून घडलेले हे सर्वात मोठे सत्कार्य असे मी समजतो.

शिवाजीराव गिरीधर पाटील विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी एका विषयावर समितीचा अहवाल तयार केला. तो सभागृहाला सादर करणे एवढेच मग अध्यक्षाचे काम असते. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा अहवाल विशेष कसा आहे हे सांगितले. त्यावर ‘नवशक्ति’मध्ये मी अग्रलेख लिहिला. पाच वर्षांपूर्वीच्या अंदाज समितीने याच विषयावर तयार केलेला अहवाल फार चांगला होता आणि त्याच्याशी विसंगत असा हा शिवाजीरावांचा अहवाल अगदी निर्थक आहे असे त्या अग्रलेखात दाखवून दिले होते. त्यावर शिवाजीरावांनी संबंधित उपसचिवाला बोलावून घेतले आणि त्याची खरडपट्टी काढली!

लक्ष्मणराव दुधाने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष असताना देश समाजवादाच्या दिशेने जात होता. आपल्या देशात पहिला वीज कायदा १९१२ साली झाला. तो रद्द करून १९४८ साली नवा वीज कायदा अंमलात आला. राज्यातील विजेची निर्मिती, पारेषण व वितरण हे सर्व एकाच अधिकाराखाली असावे यासाठी १९४८ चा वीज कायदा अस्तित्वात आला असे जाहीर विधान दुधानेसाहेबांनी केले होते. त्यावर मी ‘नवशक्ति’मध्ये अग्रलेख लिहिला. त्या कायद्याचे विधेयक १९४६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे ठेवले होते. ते विधेयक, त्याची प्रस्तावना व बाबासाहेबांचे भाषण यांमध्ये दुधाने म्हणतात तसे काही नव्हते. पुढे १९४८ साली घटना समितीमध्ये काकासाहेब गाडगीळांनी ते चर्चेसाठी सादर केले. त्यावेळी चर्चेपूर्वी व उत्तर देताना काकासाहेबांनी एकाधिकाराचा दुरान्वयानेही उल्लेख केला नव्हता. पुढे पंचवार्षिक योजनांचे ग्रंथ किंवा सरकारची अन्य धोरणात्मक कागदपत्रे यांमध्ये असा कोठेही उल्लेख नव्हता. मग एकाधिकाराचा हा मुद्दा तुम्ही कोठून आणला, असा सवाल त्या अग्रलेखातून करण्यात आला होता. मी सांगतो तेच ब्रह्मवाक्य समजा, अशा आशयाचे उत्तर दुधान्यांनी पाठविले.

बॅ. अंतुले १९७२ साली सार्वजनिक बांधकाम व बंदरे या खात्यांचे कॅबिनेट मंत्री झाले. रायगड जिल्ह्यासाठी आणि विशेषत: आपल्या श्रीवर्धन मतदारसंघासाठी जास्तीत जास्त विकास खर्च करण्याचे त्यांनी मनावर घेतले. रेडी ते विजयदुर्ग असा किनाऱ्याला समांतर मार्ग तयार करण्याचे सरकारने त्या आधीच ठरविले होते आणि त्यासाठी निधीसुद्धा मंजूर केला होता. मग अंतुल्यांनी त्याऐवजी रेडी ते रेवस अशा सागरी महामार्गाची घोषणा केली आणि तो निधी आपल्या मतदारसंघात वापरायला सुरूवात केली. रत्नागिरी बंदर बारमाही करण्याचे काम बंद करून त्या पैशातून आपल्या मतदारसंघातील दिघी बंदरात धक्का बांधायचे काम त्यांनी सुरू केले. मुंबई-कोकण-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ पश्चिमेकडे सरकवून आपल्या आंबेत गावावरून जावा यासाठी अंतुल्यांनी विशेष प्रयत्न केले. संपादक बेहेरे यांची अंतुल्यांशी घनिष्ठ मैत्री होती. हे पाहता ‘नवशक्ति’मधून हे प्रकरण बाहेर काढणे, मला शक्य नव्हते. मग अंतुल्यांच्या एका राजकीय विरोधकाला मी ही माहिती दिली. त्याने टाकलेल्या पावलांमध्ये सर्वच वृत्तपत्रांमध्ये या गोष्टी प्रकाशात आल्या.

‘नवशक्ति’मध्ये असताना मी कोकण रेल्वेवर केवळ वारंवार लिहित होतो, असे नव्हे तर त्या विषयाचा अॅक्टिव्हिस्टही होतो. त्या कामाचे इंजिनिअरिंग सर्वेक्षण १९७१ साली झाले. आमच्या कार्यालयात भास्कर नावाचा शिपाई होता. वैभववाडी तालुक्यात त्याचे गाव होते. संकल्पित रेल्वे त्याच्या घरावरून जाणार असे त्याला गावावरून पत्र आले. तो संतापला. संपादकांना म्हणाला, ‘कोकणी लोकांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी शेकडो एसटय़ा आहेत. ते सुखाने प्रवास करत आहेत. रेल्वे हवीच कशाला? हे गोठोसकरसाहेब नसते खूळ डोक्यात घेऊन बसले आहोत. त्यांना तुम्ही जरा सांगा!’

पुढे १९७७ साली मी ‘नवशक्ति’मधल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि वर्किंग जरनॅलिस्ट म्हणून माझी १८ वर्षे संपुष्टात आली. या काळात मला ‘नवशक्ति’मध्ये दोनदा पदोन्नती मिळाली होती आणि सोडताना माझे स्थान संपादकांच्या खालोखाल होते.

Tuesday, June 29, 2010

कोकण रेल्वे नव्हे, ही तर पश्चिम किनारा रेल्वे

शां. मं. गोठोसकर

कोकण रेल्वेकडून आपणाला किमान आवश्यक एवढीसुद्धा सेवा उपलब्ध होत नाही याची उशिराने का होईना कोकणवासीयांना जाणीव झाली हे चांगले झाले. ते आता प्रक्षुब्ध झाले आहेत. त्यांच्यातील या असंतोषाला वाट करून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या घोषणा राजकीय पुढाऱ्यांनी केल्या आहेत. महसूलमंत्री नारायण राणे यांनी कोकण रेल्वेविषयक मागण्यांची यादी मांडून त्यासाठी येत्या ९ जुलैला ‘चक्का जाम’ करण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे. त्याआधी ३० जूनला शिवसेनेचे कार्याध्यक्ष याच विषयावर मैदानात उतरणार आहेत. या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करून कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल करण्याची खरोखरच गरज आहे काय?

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत रेल्वेचे जास्तीत जास्त प्रकल्प व कमाल सुविधा मिळविण्यात गुजरात आघाडीवर राहिला. तेथे यासाठी कधीही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रात मात्र यासाठी चळवळी होतात. रेल्वे कशाशी खातात हे मराठी लोकांना माहीत नाही आणि कोकणवासीयांना तर अजिबात नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. नाही म्हणायला ठाण्याचे भूतपूर्व खासदार प्रकाश परांजपे यांनी रेल्वेची कार्यपद्धती जाणून घेऊन एक प्रश्न सोडविला होता. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ठाण्याला थांबवावी अशी त्यांनी रेल्वेकडे मागणी केली होती. ती मान्य करणे कसे अशक्य आहे याचे सविस्तर उत्तर रेल्वेकडून आले. त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला, आणखी माहिती गोळा केली आणि रेल्वेला पुन्हा लिहिले. रेल्वेच्या वेळापत्रकाला कसलीही बाधा न येता महालक्ष्मी ठाण्याला थांबविणे कसे शक्य आहे हे त्यांनी त्यामध्ये दाखवून दिले होते. रेल्वेने ते मान्य केले आणि ही गाडी थांबू लागली. त्यासाठी जक्का जाम करण्याची धमकी परांजप्यांनी दिली नव्हती.

कोकणवासीयांचे रेल्वेविषयक प्रश्न परांजप्यांच्या पद्धतीने हाताळणे नारायणरावांना सहज शक्य आहे. सावंतवाडी ते मुंबई अशी एक्स्प्रेस गाडी सुरू झाली की, यापैकी निम्मे अधिक प्रश्न सुटतात. त्यासाठी सावंतवाडीला प्रथम टर्मिनस तयार करायला हवे असे कोकण रेल्वे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी १८ कोटी रुपये खर्चाची योजना आखण्यात आली असून अतिरिक्त जमीन मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण पडून आहे. तो विषय मी चुटकीसारखा पुरा करतो असे नारायणराव म्हणतात. पण त्याआधी त्यांनी या विषयाचा किमान आवश्यक अभ्यास करण्याची गरज आहे.

कारवारला टर्मिनस तयार न करता तेथून मुंबईसाठी एक्स्प्रेस गाडी गेल्या वर्षी सुरू झाली. मग टर्मिनसविना सावंतवाडीहून सुरू करण्यात अडचण कोणती? टर्मिनस बांधायचे हा आराखडा काय आहे, नवी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासाठी किमान कोणत्या गोष्टी हव्यात आणि तातडीने त्या पुऱ्या कशा करता येतील याचा विचार करून नारायणरावांनी तो कार्यक्रम आखून दिला असता तर आंदोलनाचे पाऊल टाकण्याचा त्यांना विचार करावा लागला नसता. रेल्वेतील जाणकारांच्या मते सावंतवाडीहून एक्स्प्रेस गाडी सुरू करणे अल्पावधीत शक्य आहे. टर्मिनस नाही म्हणून सावंतवाडीहून गाडी सोडता येत नाही असे ११ वर्षांपूर्वी रेल्वेमंत्री असताना राम नाईक म्हणाले होते. नारायणराव त्यावेळी मुख्यमंत्री होते. तेथे टर्मिनस करा असे पत्र त्यांनी त्यावेळी रेल्वेमंत्र्यांना पाठविले असते तर ते केव्हाच अस्तित्वात आले असते.

सावंतवाडीला १८ कोटी रुपयांचे टर्मिनस बांधायचे झाले तर कोल्हापूर-बेळगाव पट्टय़ात तयार होणारी साखर रेल्वेने केरळला पाठविण्यासाठी ते उपयोगी पडू शकेल. रेडी येथील टटा मेटॅलिक्सचा (पूर्वीच्या उषा इस्पातचा) कारखाना हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा औद्योगिक प्रकल्प आहे. तो सावंतवाडी स्टेशनचा वापर करतो. रेडी बंदराचा मोठा विकास होत आहे. त्याला सावंतवाडी हेच जवळचे स्टेशन आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन टर्मिनसच्या आराखडय़ाचा विचार व्हावयास हवा. या स्टेशनच्या लगत दक्षिणेला सावंतवाडी-रेडी राज्य महामार्गावर लेव्हल क्रॉसिंग आहे. टर्मिनसचा भाग म्हणून तेथे उड्डाण पूल बांधावा लागेल. या सर्व खर्चासाठी कोकण रेल्वेकडे पैसे नाहीत. तसेच, नवीन रेल्वे इंजिने, डबे व वाघिणी खरेदी करण्यासाठीही पैसे हवे आहेत. मग करायचे काय?आतापर्यंत कोकण रेल्वे महामंडळाला भारतीय रेल्वेकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध झालेला आहे. यापुढे तसा मिळत राहणे कठीण आहे. यास्तव या सावंतवाडी टर्मिनसचा व नवीन रेल्वेगाडय़ांचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावयास हवा. या राज्याच्या पूर्वेकडील भागात नांदेड-यवतमाळसारख्या नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी निम्मे खर्च देण्याचे या सरकारने मान्य केले आहे. हे सरकार तिकडे शेकडो कोटी रुपये खर्च करणार आहे. हे पाहता सावंतवाडी टर्मिनसबाबत अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही.

कोकण रेल्वे महामंडळाच्या शेअरभांडवलात भारतीय रेल्वेचा ५१ टक्के सहभाग असून बाकीचे ४९ टक्के महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्य सरकारांकडे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा हिस्सा सर्वात मोठा आहे. अशा प्रकारे या महामंडळात आपले राज्य सरकार दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समभागधारक असून त्याला संचालक मंडळावर एक जागा आहे. सध्या त्या जागी आहे कोण व तो करतो तरी काय? कोकणवासीयांचे हे प्रश्न तडीला नेण्यासाठी त्याचा काही उपयोग होईल की नाही? आपण ‘चक्का जाम’ची घोषणा केल्यामुळे संचालक मंडळात त्याची अडचण होईल काय आदी बाबींचा नारायणरावांनी प्रथम विचार करायला हवा होता. कर्नाटकाच्या संचालकाने कारवार-मुंबई एक्स्प्रेस गाडी सुरू करून घेतल्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे बनले आहेत. नव्या रेल्वेची मागणी करताना कोठपासून कोठपर्यंत हे त्यामध्ये नमूद केलेले असते. कोकण रेल्वेबाबत तसे नव्हते. मुंबईहून माझ्या गावापर्यंत रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे अशी प्रत्येक कोकणवासीयाची कल्पना होती. त्याच्या मनात ती ब्रॅन्च लाइन होती, पण प्रत्यक्षात मेन लाइन मिळाल्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे असे त्याला वाटते. मराठवाडय़ात असेच घडले. प्रदीर्घ आंदोलनानंतर तेथे मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले खरे, पण प्रत्यक्षात ती मेनलाइन झाली. ही रेल्वे आपल्या उपयोगाची राहिलेली नाही असे मराठवाडय़ातील लोकांना वाटू लागले आहे.

कोकण रेल्वे होण्यापूर्वी भारतीय रेल्वेचा नकाशा पाहता मुंबई ते मंगळूर एवढय़ा किनाऱ्याला समांतर रेल्वे नव्हती. देशातील रेल्वेच्या जाळ्यातील तो न सांधलेल दुवा (मिसिंग लिंक) होता. तो जोडण्याचे काम या रेल्वेने केले. त्यामुळे केरळ व तामिळनाडूचा पश्चिम भाग यांना मुंबई व पश्चिम भारत जवळ आले. या रेल्वेचा ५५ टक्के भाग कोकणात असून बाकीचा गोवा व कर्नाटक राज्यांमध्ये आहे. तिचे ‘पश्चिम किनारा रेल्वे’ असे यथार्थ नाव ठेवले असते तर ही ब्रँच लाइन नाही याची जाणीव झाल्याने, आपल्यावर अन्याय होत आहे, असे कोकणवासीयांना वाटले नसते.

कोकणाशी संबंध नाही, पण देशाच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाणाऱ्या अशा किती रेल्वेगाडय़ा कोकणातून धावतात याची भली-मोठी यादी देऊन, कोकणवासीयांवर कसा अन्याय होतो हे सांगितले जाते. अशा सुमारे २२ गाडय़ा असल्या तरी त्या सर्व रोज सुटणाऱ्या नाहीत. सरासरीने दिवसाला त्या चार आहेत. या लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये किमान एकेका ठिकाणी थांबल्या पाहिजेत अशी नारायणरावांची मागणी आहे. ती मुळीच व्यवहार्य नाही. मुंबई ते दिल्ली ही राजधानी एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून निघाल्यानंतर थेट सुरतेला जाते. वाटेत ती चार जिल्हे ओलांडते. त्या प्रत्येक जिल्ह्यात ती एकेका ठिकाणी थांबल्यास ती एक्स्प्रेस राहील काय? एर्नाकुलम (केरळ) ते निझामुद्दीन (दिल्ली) ही दुरोन्तो एक्स्प्रेस गाडी वाटेत सात राज्ये पार करते, पण कोठेच थांबत नाही. ती कोकण रेल्वेवरून धावते. जी गाडी राज्यात थांबत नाही तेथे जिल्हयात कशी थांबेल?

कोकण रेल्वेवर शटल सव्‍‌र्हिस हवी ही मागणी कमी अंतराच्या प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. तथापि ती व्यवहाराला धरून नाही. या संबंधात चीनचे उदाहरण लक्षात घ्यावयास हवे. त्या राष्ट्रात ६० वर्षांपूर्वी कम्युनिस्ट राजवट आली तेव्हा तेथील रेल्वे भारताहून फारच अप्रगत होती. सध्या ती कितीतरी पुढे गेली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वे ही केवळ लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी राहील असे धोरण त्या राष्ट्राने अंगीकारले. त्याचा परिणाम म्हणून शेकडो स्टेशने रद्द करण्यात आली. आपल्याकडे स्टेशने रद्द होणे कठीण आहे, पण रेल्वे ही दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीसाठी आहे हे केंद्र सरकार अप्रत्यक्षपणे अंमलात आणत आहे. त्या धोरणाशी शटल सव्‍‌र्हिसची मागणी विसंगत ठरते.

कोकण रेल्वे ही एकच लाइन आहे ती दुहेरी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. सध्या समोरून येणारी गाडी निघून जाईपर्यंत खोळंबून राहावे लागते. दुहेरी झाल्यानंतर हे संपेल असे नाही. मागाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीसाठी कमी अंतराची गाडी खोळंबून ठेवली जाते. रेल्वेची ही अखिल भारतीय कार्यपद्धती आहे. कोकण रेल्वेसाठी ती बदलली जाणार नाही. दुहेरी मार्ग बनविण्याआधी सध्याच्या मार्गाचा पुरेपूर वापर होतो की नाही म्हणजेच लाइन कपॅसिटी पुरेशी वापरली जाते की नाही हे पाहिले जाते. सध्या तिचा पुरेसा वापर होत नाही. उदाहरण द्यायचे तर पुरेसा ऊस मिळत नसेल तर साखर कारखान्याचा विस्तार का करायचा? ते कसेही असले तरी नजिकच्या भविष्यकाळात लाइन कपॅसिटी पूर्णपणे वापरली जाईल असे गृहीत करून दुहेरीकरणाचा आतापासूनच विचार झाला पाहिजे. कोकण रेल्वे बांधण्यासाठी १२ वर्षांपूर्वी जेवढा खर्च आला त्याहून बराच जास्त आता दुहेरीकरणासाठी येईल. तेवढा निधी उभा करणे या महामंडळाला केवळ अशक्य आहे.

कोकण रेल्वे दुहेरी करणे ही गोष्ट किती कठीण आहे हे लक्षात येण्यासाठी काही पूर्वपीठिका ध्यानात घ्यावयास हवी. पेण नगरपालिकेने १८८४ साली ठराव करून कोकणात रेल्वे हवी अशी मागणी केल्यापासून हा विषय सुरू झाला. नवीन रेल्वेबाबत तीन टप्पे असतात. इंजिनिअरिंग रिकॉनिसन्स सव्‍‌र्हे व ट्रॅफिक सव्‍‌र्हे हा पहिला टप्पा असून त्यानंतर रेल्वे बांधायची असे ठरले तर फायनल लोकेशन सव्‍‌र्हे हा दुसरा टप्पा असतो. प्रत्यक्ष बांधकाम हा शेवटचा टप्पा राहतो. ब्रिटिश सरकारने १९२८ साली दिवा ते दासगाव असा पहिला टप्पा करून घेतला. त्यानंतर जागतिक मंदी आल्यामुळे पुढचा विचार झाला नाही.

दिवा-दासगाव हा प्रकल्प रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित होता. ब्रिटिश सरकारने कोकणच्या दक्षिण टोकापर्यंत रेल्वे बांधायची असा विचार करून त्याप्रमाणे पहिला टप्पा का केला नाही? रत्नागिरी जिल्हा फार डोंगराळ असल्यामुळे तेथे रेल्वे बांधणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्यामुळे दासगावपर्यंतच विचार झाला असे कोकणवासीयांना वाटू लागले. मग १९४८ साली पश्चिम रेल्वेतील एक तंत्रज्ञ अ. ब. वालावलकर हे पुढे आले आणि कोकणात रेल्वे बांधणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आणि तसा दहा-बारा वर्षे प्रचार केला. त्याच्या आधारावर लोकसभेतील कोकणच्या प्रतिनिधींनी आवाज उठवायला सुरुवात केली. मोरोपंत जोशी, नाथ पै, प्रेमजीभाई आशर, नानासाहेब कुंटे, मधू दंडवते, शंकरराव सावंत आदी ही मंडळी होती. मग १९७० च्या दरम्यान रेल्वे बोर्डाने मुंबई ते मंगळूर अशी फायनल लोकेशन सव्‍‌र्हे करून घेतली. पण पुढे हालचाल होईना. याचे कारण म्हणजे नवीन रेल्वे बांधण्यासाठी पंचवार्षिक योजनेत सबंध देशासाठी जेवढी तरतूद त्याच्या दुपटीहून अधिक कोकण रेल्वेचा खर्च होता. दुसरे म्हणजे नवीन रेल्वे कोठे बांधायची याचे अग्रक्रम ठरले होते. त्यामध्ये कोकण रेल्वे बसत नव्हती. या प्रकल्पासाठी कधीच पैसे मिळणार नाहीत असा याचा अर्थ होता.

पुढे १७७३ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी दौऱ्यावर आल्या आणि दुष्काळी काम म्हणून कोकण रेल्वे प्रकल्प हाती घेतल्याची त्यांनी जाहीर घोषणा केली. दिल्लीला परतल्यावर आपण भलतेच काही कबूल करून बसलो हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी अशी काही घोषणा केलीच नाही अशा आशयाच्या बातम्या महाराष्ट्राबाहेरील इंग्रजी दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. दुष्काळ संपल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

केंद्रात १९७७ साली सत्तांतर होऊन जनता पक्ष अधिकारावर आला आणि मधू दंडवते रेल्वेमंत्री झाले. तथापि ते, हा प्रकल्प मंजूर करून घेऊ शकले नाहीत. आपटा ते रोहा एवढय़ाच भागासाठी ते सर्व प्रकारची मंजुरी मिळवू शकले. अडीच वर्षांनंतर त्यांचे हे पद गेल्यानंतर रेल्वे रोह्याला पोचायला सात वर्षे लागली. विलंबित आशेने हृदयव्यथा जडावी तसे कोकणवासीयांचे कोकण रेल्वेबाबत झाले आहे असे चिंतामणराव देशमुख १९६० साली म्हणाले होते. या प्रकल्पाचे काम रोह्याला थांबल्यानंतर हृदयव्यथा पुढे चालू राहिली.

कोकण रेल्वे प्रकल्पाला खरी चालना १९८९ साली मिळाली. त्यावेळी माधवराव शिंदे रेल्वेमंत्री होते. त्यांनी या प्रकल्पासाठी रेल्वेतील सर्व उच्चाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या प्रकल्पासाठी पंचवार्षिक योजनेत निधी उपलब्ध होत नाही तर तो योजनेबाहेर काढून हाती घ्यावा का असा विचार झाला. त्यासाठी खास अ‍ॅथॉरिटी स्थापन करावी लागेल आणि त्यासाठी रेल्वे कायद्यात दुरुस्ती करणे भाग पडेल, असेही चर्चेत सांगण्यात आले. यावेळी इतर उच्चाधिकाऱ्यांव्यतिरिक्त रेल्वे बोर्डाचे तांत्रिक सदस्य इ. श्रीधरन व इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार राणे उपस्थित होते. कायदा दुरुस्त करण्यात फार काळ जाईल त्याऐवजी कंपनी स्थापन तर झटपट काम सुरू करता येईल असे त्यावेळी राणे यांनी सुचविले. ती सूचना मान्य होऊन रेल्वे मंत्रालय कामाला लागले. माधवरावांनी या निर्णयाला कसलीही प्रसिद्धी दिली नव्हती हे विशेष होय. वयाला ६० वर्षे पुरी झाल्याने राणे त्या दरम्यान निवृत्त झाले. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्याला असते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आजिवली हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे आजोबा १९३४ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून माहीममधून निवडून आले होते.

सन १९८९ अखेरीस दिल्लीत सत्तांतर होऊन जॉर्ज फर्नाडिस रेल्वेमंत्री झाले. त्या अगोदर श्रीधरन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनले होते. त्यांनी जॉर्ज फर्नाडिस यांना कोकण रेल्वेसाठी कंपनी ही कल्पना सांगितली आणि मग चक्रे वेगाने फिरू लागली. कंपनी हे माझे ब्रेन चाइल्ड आहे, असे श्रीधरन यांनी खासदार भारतकुमार राऊत पत्रकार असताना त्यांना १५ वर्षांपूर्वी सांगितले होते. विजयकुमार राणे प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहिल्याने श्रीधरन यांच्या हिशोबाने ते अज्ञातवासात गेले होते.

कोकण रेल्वे महामंडळ स्थापन होऊन बांधकाम सुरू झाले. मुळात ठरल्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे काम करण्याचा त्या संस्थेने निर्णय घेतल्यामुळे अंदाजे खर्चापेक्षा प्रत्यक्ष खर्च बराच अधिक झाला. रेल्वेकडून फार मोठे कर्ज घेण्याशिवाय मार्ग उरला नाही. त्या कर्जाची परतफेड करताना मुद्दल सोडाच, पण व्याजही देणे मुश्किल झाले. अखेरीस कर्जाचे रूपांतर शेअरभांडवलात करून रेल्वे बोर्डाने या महामंडळाची सुटका केली. यापुढे दुहेरीकरणासाठी पैसा उभा करणे महामंडळाला शक्य नसल्यामुळे, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो. आता भारतीय रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा फरक झाला असल्याने ती दुहेरीकरणावर खर्च करू शकेल. कोकण रेल्वे सध्या ४० टक्के जास्त भाडे आकारते. विलिनीकरणामुळे हा भार संपुष्टात येऊ शकेल. एक ऐतिहासिक गरज म्हणून हे महामंडळ स्थापन झाले. आता तशाच स्वरूपाची आवश्यकता निर्माण झाल्याने विलिनीकरण व्हावयास हवे. कोकणवासीयांच्या तक्रारींपैकी विलिनीकरणाने काही निकालात निघणे शक्य होईल.

दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि कमी अंतरासाठी सडक हे चीनचे धोरण असल्याचा यापूर्वी निर्देश केलेला आहे. आता या संदर्भात मुंबई-कोकण-गोवा मार्गाचा १७ म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ चा फेरविचार व्हावयास हवा. कोकणमार्गे मुंबई ते गोवा असा मुळात हा रस्ता आखलेला नाही. रायगड व पूर्वीचा रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तालुक्याची ठिकाणे जिल्ह्याच्या ठाण्याला जोडण्यासाठी मुळात रस्ते झाले. हे दोन जिल्हे जोडण्यासाठी कशेडी घाट अस्तित्वात आला नाही. दीडशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरला हर्णे बंदरात उतरून महाबळेश्वरला जाता यावे यासाठी हा घाट बांधण्यात आला. सध्या या राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा संख्येने अपघात होत असतात. तो चौपदरी करायला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ निघाले आहेत. हा त्यावरचा उपाय नव्हे. अकरा वर्षांपूर्वी नितीन गडकरी या खात्याचे मंत्री असताना त्यांनी मुंबई-पुणे यासारखा मुंबई-गोवा एक्स्प्रेस वे योजला होता. मुंबई ते गोवा कमीत कमी अंतराने, कमीत कमी वळणे व कमीत कमी उंचसखलपणा अशा दृष्टीने तो आखला होता. त्याचे प्राथमिक काम सुरू झाले होते. नारायणराव त्यावेळी मुख्यमंत्री होते. शिवसेना-भाजप युतीची सत्ता जाताच ते काम बंद पडले. तो संकल्पित एक्स्प्रेस वे ही कोकणची आता खरी गरज आहे. सध्याच्या महामार्गाचे चौपदरीकरण हा त्याला पर्याय नव्हे. उद्धवरावांचे सोडा, पण नारायणराव प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा बारकाईने अभ्यास करतात असा त्यांचा लौकिक आहे. त्याला अपवाद कोकण रेल्वे झाल्याने हा प्रपंच!

Sunday, October 18, 2009

मुख्यमंत्री कोण?

शां. मं. गोठोसकर


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानपर्व पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा चालू आहे. तोपर्यंतच्या नऊ दिवसांमध्ये राज्य कोणाचे येणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.काँ ग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप युती यापैकी कोणालाही निर्णायक बहुमत न मिळता तेथे पोहोचण्यासाठी पंधरा-वीस आमदारांची गरज भासेल, असे जाणकार धरून चालले आहेत.

छोटय़ा पक्षाचे किंवा लहान आघाडीचे मंत्रिमंडळ मोठय़ा पक्षाच्या पाठिंब्यावर स्थापन झाले, अशी बरीच उदाहरणे आहेत. तसेच, अपक्ष आमदार मुख्यमंत्री बनल्याची अजब घटना घडली आहे. यास्तव, सरकार कोणाचे येणार याऐवजी मुख्यमंत्री कोण होणार याचा विचार करणे अधिक उचित होईल.

मुख्यमंत्रीपदासाठी ३१ जण सक्रिय दावेदार / इच्छुक आहेत, असे आढळून येते. त्यांची यादी सोबत आहे. त्यांची वर्गवारी अशी- सध्याचे व माजी मुख्यमंत्री, सध्याचे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री आणि त्या पदांवरील पूर्वीचे नेते राज्यपाल, सध्याचे व माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पक्षांचे राज्य पातळीवरील प्रमुख, महाराष्ट्र स्तरावरील पक्षांचे प्रमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आदीही मंडळी आहेत. यापैकी जे दावेदार / इच्छुक असल्याचे वृत्त केव्हा तरी प्रसिद्ध झाले होते आणि जे यासंबंधात सक्रिय आहेत एवढय़ांसाठीच नावे या यादीमध्ये घेतलेली आहेत. त्यामध्ये शरद पवारांचा समावेश केलेला नाही, कारण आपण राष्ट्रीय नेते आहोत ही भूमिका त्यांना सोडायची नाही. प्रतिभा पाटील १९७८ ते १९८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या आणि १९८० साली त्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावाही होता. पुढे त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या. राष्ट्रपती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय त्यांच्यापुरता निकालात निघाला, असे म्हणता येत नाही. यानिमित्ताने काही पूर्वपीठिका लक्षात घेतली पाहिजे. चक्रवर्ती राजगोपालाचारी (म्हणजे राजाजी) हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. राज्यघटनेनुसार राष्ट्रपतीपद अस्तित्वात आल्यावर राजाजींची नेमणूक संपुष्टात आली. पुढे १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री झाले.राजाजींची ही थोर परंपरा आहे, असे सांगून, आपली राष्ट्रपतीपदाची मुदत संपल्यावर, प्रतिभाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दावा करणार नाहीत हे कोणी सांगावे?

शिवराज पाटील बरीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते. यापुढे त्यांना धकाधकीची जबाबदारी नको असल्याने ते राज्यपाल म्हणून नेमणूक केव्हा होते याची वाट पाहात आहेत. मधुकरराव चौधरी, शिवाजीराव देशमुख व प्रतापराव भोसले हे एका वेळचे दावेदार आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखे आहेत. शालिनीताई पाटील सूत्रबद्धपणे सक्रिय राहिलेल्या नाहीत. सध्याच्या परिस्थितीत आपण दावेदार आहोत, असे सांगण्याचे धाष्टर्य पद्मसिंह पाटील करणार नाहीत. मुख्यमंत्रीपदावर दावा होता; पण ते मिळण्याआधीच निधन झाले, अशा आठ-दहा मंडळींना या निमित्ताने श्रद्धांजली वाहायला हवी. मुख्यमंत्रीपद हवे, पण ते वेगळ्या विदर्भ राज्याचेच, अशी अट असलेल्या इच्छुकांचा या यादीत समावेश केलेला नाही.

या यादीतील १२ जण आता विधानसभेच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यातील कोणी निवडून आला नाही तर तो बाद झाला असे मुळीच म्हणता येणार नाही. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जुन्या मुंबई राज्यात बाळासाहेब खेर मुख्यमंत्री तर मोरारजीभाई देसाई दुसऱ्या स्थानावर होते. त्यांच्याकडे गृहखाते होते. खेर या निवडणुकीला उभे नव्हते. त्यामुळे मोरारजीभाई मुख्यमंत्री होणार, असे सर्व जण धरून चालले होते; पण बलसाड मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. तरीही ते लगेच मुख्यमंत्री झाले! या यादीतील त्या १२ जणांपैकी तीन-चार इच्छुकांना या वेळी मोठी अटीतटीची झुंज द्यावी लागत आहे, पण त्यांनी डगमगण्याचे कारण नाही. मोरारजीभाईंचे उदाहरण त्यांना तारून नेईल.

मुख्यमंत्रीपदासाठी लोकसेवा आयोगाच्या पद्धतीने निवड होत नाही. तसे असते तर परिस्थिती कठीण झाली असती. याचे कारण असे, की महाराष्ट्रात जिल्हे किती व त्यांची नावे कोणती या प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्या ३० जणांपैकी कमीत कमी १५ जण देऊ शकणार नाहीत. या यादीत काँग्रेसचे १४ इच्छुक आहेत. समजा, त्यांना सोनिया गांधींनी बोलाविले आणि विचारले, ‘‘महाराष्ट्र सरकारपुढे अत्यंत निकडीचे पाच प्रश्न कोणते? तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले तर पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिता येतील, अशा कोणत्या पाच गोष्टी तुम्ही करू इच्छिता?’’ सोनियाजी असे प्रश्न विचारणार नाहीत. विचारलेच तर बहुतेक सारे नापास होतील. राष्ट्रवादीचे सात इच्छुक आहेत. त्या सर्वाचा वकूब शरद पवारांना ठाऊक असल्यामुळे तेसुद्धा अशा प्रकारची मुलाखत घेणार नाहीत. मुख्यमंत्रीपदासाठी शैक्षणिक पात्रता किती, असा प्रश्न नसतो. कायद्यातील अत्युच्च पात्रता संपादन केलेल्या मुख्यमंत्र्याने राज्यघटनेशी पूर्णपणे विसंगत असे प्रक्षोभक वक्तव्य महाराष्ट्र विधान मंडळात केल्यामुळे तो गोत्यात आला होता. सभापतींनी ती वाक्ये कामकाजातून काढून टाकली आणि त्याला वाचविला!

या यादीमध्ये अंतुले सर्वात वयोवृद्ध आहेत. मग ते निवृत्त का होत नाहीत, असा कोणी प्रश्न विचारला तर तो गैरलागू ठरेल. काँग्रेस पक्षाने ८८ वर्षांच्या आप्पासाहेब सा. रे. पाटलांना शिरोळ मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यामुळे अंतुल्यांना वयावरून पक्षाचा आक्षेप असणार नाही. मोरारजीभाई ८१ व्या वर्षी पंतप्रधान बनले तर त्या पदासाठी लोकसभेच्या गेल्या निवडणुकी वेळी ८२ वर्षांच्या लालकृष्ण अडवाणींनी बाशिंग बांधले होते. आंध्र राज्य स्थापन झाले त्या वेळी (१९५४ साली) टी. प्रकाशम हे पहिले मुख्यमंत्री होते. त्या वेळी ते ८६ वर्षांचे होते. यावरून अंतुलेसाहेब अजून तरुण आहेत हे ध्यानात यावे. आपला अपुरा राहिलेला अजेण्डा पुन्हा मुख्यमंत्री बनून त्यांना पुरा करायचा आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड व पोलादपूर हे तालुके आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड व मंडणगड हे तालुके मिळून अंतुल्यांना नवीन रायगड जिल्हा स्थापन करायचा आहे आणि त्याचे ठाणे आंबेत येथे ठेवायचे आहे.

प्रभा राव राज्यपालपदी असल्या तरी आपणाला पेन्शनीत काढले आहे, असे मानायला त्या तयार नाहीत. केंद्र सरकारच्या मानश्रेणीमध्ये (ऑर्डर ऑफ प्रीसिडन्समध्ये) राज्यपालपद चौथ्या तर केंद्रीय मंत्रीपद व राज्याचे मुख्यमंत्रीपद सातव्या क्रमांकावर असते. सुशीलकुमार शिंदे व एस. एम. कृष्णा हे राज्यपालपद सोडून केंद्रीय मंत्री झाल्यामुळे प्रभाताईंची महत्त्वाकांक्षा पूर्णपणे टिकून आहे. महाराष्ट्रात अमराठी व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकणार नाही म्हणून हे पद मिळविण्यासाठी प्रथम महाराष्ट्रापासून मुंबई तोडली पाहिजे, असे ठरवून मुरली देवरा १९८५ साली कामाला लागले. त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी देवरांची ही चाल ओळखून त्यांना तात्काळ राजकीयदृष्टय़ा धोबीपछाड केले. तथापि, आता पाव शतक पुरे होत आले तरीही या महोदयांनी तो डाव मनातून काढून टाकला आहे, असे दिसत नाही. या यादीत शिवसेनेचे फक्त तिघे आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्यापैकी एक असून, त्यांचे नाव पुढे आल्यानंतर त्या पक्षातून कोणी नवीन इच्छुक पुढे आलेला नाही. उरलेले दोघे त्यापूर्वीचे आहेत. उद्धव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची पक्षसंघटनेवरील पकड अधिक मजबूत होईल हे लक्षात घेऊन ते पद त्यांना देण्याचे शिवसेनाप्रमुखांनी योजले आहे खरे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याविना युती अधिकारावर येणे शक्य नसले तर असा राज्याभिषेक होणे कठीण आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव असता कामा नये आणि त्यांच्या हाती रिमोट कंट्रोल असू नये, अशी कडक अट पाठिंब्यासाठी राज ठाकरे घालतील हे उघड आहे. मग मनोहर जोशींना संधी मिळेल काय? पासष्टीला निवृत्त झाले पाहिजे हा शिवसेनाप्रमुखांचा दंडक पंतांसाठी अपवाद ठरेल, असे वाटत नाही. त्यामुळे सुरेश प्रभू हे एकच नाव शिल्लक उरते. दहा वर्षांपूर्वी या पदासाठी त्यांचे नाव प्रथम चर्चेत आले होते. त्यांच्यावर कार्याध्यक्षांचा वरदहस्त असतोच. हे लक्षात घेता त्यांनी बाशिंग बांधायला हरकत नाही. केंद्र सरकारच्या नद्या जोडणे समितीचे ते प्रमुख होते. आता नवे मंत्री जयराम रमेश यांनी ही बाब निकाली काढली आहे. यास्तव, प्रभू मुख्यमंत्री झाले तर पहिल्या दिवसापासून त्यांची जयराम रमेश यांच्याशी जुंपेल हे निश्चित!

निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतील बडय़ा सुप्रतिष्ठित हिंदी दैनिकात एक पृष्ठ खास मजकूर आला. कृपापर्व असे त्या पृष्ठाचे नाव होते. मथळा होता- ‘मुंबईची राजकीय ओळख म्हणजे कृपाशंकरसिंह’ बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरे ही मुंबईची ओळख नव्हे, असा याचा अर्थ! कृपाशंकर हे केवळ नववी नापास असले तरी एका मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विद्वतसभेचे सदस्य आहेत. हे लक्षात घेता आपणच मुंबईची राजकीय ओळख, असा दावा करण्याएवढे त्यांच्याकडे धाष्टर्य असू शकते. त्यांची चाल मुरली देवराहून वेगळी आहे. मुंबई त्यांना तोडायची नाही. अखंड महाराष्ट्राचे त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. या राज्याच्या राजकारणात मराठा व बिगरमराठा अशा दोनच जाती आहेत. कृपाशंकरांना पाठिंबा देणारी प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी आपली समर्थक मंडळी तयार केली असून ती सर्व बिगरमराठा आहेत. बिगरमराठा तितुका मेळवावा, असे त्यांचे धोरण आहे. आता मुख्यमंत्रीपद मुंबईला पाहिजे, असे जेव्हा गुरुदास कामत म्हणतात तेव्हा त्याचा प्रत्यक्षात अर्थ काय होतो याची त्यांना कल्पना नाही. उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंदवल्लभ पंत त्या पदावर दहा वर्षे होते. हे पंत कुटुंब मूळचे मराठी. मध्य प्रदेशात भगवंतराव मंडलोई हे मराठी गृहस्थ एकदा मुख्यमंत्री होते. राजस्थानात वसुंधरा राजे यांचे मुख्यमंत्रीपद गाजत राहिले. या मराठी मंडळींना स्थानिक हिंदी भाषिकांनी कधी विरोध केला नाही, मग येथे मराठी लोक मला कसा विरोध करू शकतील, असा त्यांचा प्रश्न आहे. भय्यांनी येथे पाणीपुरी विकावी, पण राजकारणात लुडबूड करू नये, असे राज ठाकरे म्हणतात. प्रत्यक्षात झेप केवढय़ापर्यंत आली आहे याची मनसेने पुरती जाणीव करून घेणे आवश्यक आहे.मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचाच असावा, असे निश्चित झाले तर सध्याच्या मुख्यमंत्र्यांना पुढे चालू ठेवावे, की दुसरा कोणी आणावा, असा प्रश्न पडतो. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसलाच पुन्हा मोठे बहुमत मिळणार हे ठरल्यासारखे आहे. तेथे प्रचारसभेत बोलताना ‘मुख्यमंत्री हुडा हे त्या पदावर पुढे चालू राहतील’ असे सोनिया गांधी म्हणाल्या. अशोक चव्हाणांचे काम चांगले चालले आहे एवढेच त्या नांदेडच्या सभेत म्हणाल्या. सोनियांचा पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ चव्हाण समर्थक लावत आहेत. त्यांना या पदावर पुढे चालू राहू द्यायचे नाही यासाठी विलासराव देशमुख व नारायण राणे यांची एकजूट झाली आहे. आपण पुढे चालू राहिले पाहिजे यासाठी अशोक चव्हाणांनी प्रचंड मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी प्रसारमाध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. त्याचा उफराटा परिणाम (काऊण्टर प्रॉडक्टिव) होण्याचा धोका संभवतो. यश मिळाले तर त्याचे श्रेय सोनियांच्या नेतृत्वाला आणि अपयश पदरी पडले तर त्याचे खापर अशोक चव्हाणांच्या माथी अशी ही काँग्रेसची रीत आहे.

महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात भाग घेताना, विकासाच्या मुद्दय़ावर काँग्रेसला मते द्या, असे सोनिया गांधींनी आवाहन केले. ते तपासून पाहावयास हवे. सध्या अकरावी पंचवार्षिक योजना (२००७-१२) चालू असून आताचे २००९-१० हे तिचे तिसरे वर्ष आहे. या योजनेत खातेनिहाय निधीवाटप (सेक्टरल अलॉकेशन्स) करण्याची फाईल विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे कित्येक वेळ गेली, पण त्यांना सवड झाली नाही. मग अशोक चव्हाणांकडे चारदा गेली, पण मुंबईवरील हल्ला मग लोकसभेची व नंतर विधानसभेची निवडणूक यामुळे त्यांना उसंत झालेली नाही. सोनिया गांधींनी सांगितलेल्या महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्दय़ाची कथा ही अशी आहे.

अशोक चव्हाणांच्या नांदेड जिल्ह्याच्या विकासाची गाथा वेगळीच आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २००५ सालापासून रिझव्‍‌र्ह बँकेने बंद ठेवली. आर्थिक परिस्थिती फारच खालावली हे त्याचे कारण आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जिल्हा बँक अशी बंद ठेवली, असे भारतातील हे एकमेव उदाहरण आहे. जिल्हा बँक दिवाळ्यात काढता येत नाही यामुळे ती बंद ठेवलेली आहे एवढेच. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा विषय नांदेडमध्ये उफाळून वर आला तेव्हा ही बँक मी अल्पावधीत सुरू करून देतो, असे ठोस आश्वासन अशोक चव्हाणांनी मान्यवरांच्या बैठकीत दिले. त्याला सात महिने झाले. बँक अजून बंदच आहे. अशोकराव १९९९ साली कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर सहा वर्षांनी ही बँक बंद झाली. या काळात त्यांनी काळजी का घेतली नाही? बंद झाल्यानंतर मुख्यमंत्री होईपर्यंतच्या तीन वर्षांत बँक सुरू व्हावी म्हणून त्यांनी कोणते प्रयत्न केले?ोता मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या पदमहात्म्याच्या जोरावर ते रिझव्‍‌र्ह बँकेवर दडपण आणू पाहतात. अडवाणी उपपंतप्रधान व गृहमंत्री असताना माधवपुरा बँक दिवाळ्यात जाण्यापासून वाचवू शकले नाहीत तेथे अशोक चव्हाणांची काय कथा? नांदेड बँक पुन्हा सुरू करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक कशाशी खातात हे प्रथम समजून घेतले पाहिजे. अशोकरावांना त्यासाठी सवड नाही हीच तरी खरी अडचण आहे. ही बँक बंद राहिलेली असली तरी ती सुरू करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली आहे, असे अशोकराव विधानसभेच्या निवडणूक प्रचारात सांगत राहिले. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे, अशी कोणी तक्रार केली नाही हे मुख्यमंत्र्यांचे नशीब म्हटले पाहिजे. शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे हिला तिच्या ३५ व्या वर्षी सुखी संसारातून ओढून राजकारणात आणले ते तिला मुख्यमंत्री करण्यासाठीच हे न समजण्याएवढा मराठी माणूस दूधखुळा नाही.झारखंडमध्ये मधू कोडा हे अपक्ष आमदार मुख्यमंत्री झाले. तसा महाराष्ट्रात कोण होऊ शकेल? शालिनीताई, सुनील देशमुख की विनय नातू?


मुख्यमंत्रीपदाचे सक्रिय दावेदार / इच्छुक

नाव वय वर्षे

१) ए. आर. अंतुले ८०

२) शिवाजीराव पाटील- निलंगेकर ७८

३) बाळासाहेब विखे पाटील ७७

४) प्रभा राव ७४

५) मुरली देवरा ७३

६) मनोहर जोशी ७२

७) गोविंदराव आदिक ७०

८) रोहिदास पाटील ६९

९) सुशीलकुमार शिंदे ६८

१०) पतंगराव करदम ६५

११) विजयसिंह मोहिते- पाटील ६५

१२) विलासराव देशमुख ६४

१३) पृथ्वीराज चव्हाण ६३

१४) छगन भुजबळ ६२

१५) गोपीनाथ मुंडे ६०

१६) कृपाशंकरसिंह ५९

१७) नारायण राणे ५७

१८) सुरेश प्रभू ५६

१९) प्रकाश आंबेडकर ५५

२०) माणिकराव ठाकरे ५५

२१) गुरुदास कामत ५५

२२) आर. आर. पाटील ५३

२३) नितीन गडकरी ५२

२४) अशोक चव्हाण ५१

२५) अजित पवार ५०

२६) रामदास आठवले ५०

२७) उद्धव ठाकरे ४९

२८) जयंत पाटील ४७

२९) राज ठाकरे ४१

३०) सुप्रिया सुळे ४०

३१) विनय कोरे ३८

Click on this link to read this article on Loksatta.com

Sunday, August 2, 2009

सर्व पक्षांनी स्वबळावर लढावे हे उत्तम!

शां. मं. गोठोसकर

महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी २००४ साली झालेल्या निवडणुकीप्रमाणे आघाडी करावी की नाही हा वाद आता ऐरणीवर आला आहे. संसदेचे चालू अधिवेशन संपल्यानंतरच पक्षश्रेष्ठी ही बाब विचारात घेतील आणि तोपर्यंत हा वाद वाढत जाईल, असे दिसते. ही आघाडी चालू राहते की नाही यावर अन्य सर्व पक्षांची व्यूहरचना अवलंबून राहणार आहे. त्यामुळे त्या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांप्रमाणे या अन्य पक्षांतील मंडळींनाही तोपर्यंत अपरिहार्यपणे ताटकळत राहावे लागणार आहे.

विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेसने आघाडी न करता स्वबळावर लढविली पाहिजे, असे आग्रहपूर्वक प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी लोकसभेची गेली निवडणूक संपताच केले. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख बाळासाहेब विखे पाटील यांनीही हीच भूमिका घेतली. पुढे केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मागणीला आपले समर्थन जाहीर केले. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला दुपटीहून अधिक जागा मिळाल्या हे या भूमिकेमागचे मुख्य कारण आहे. या प्रश्नावर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावयाचा आहे, तोपर्यंत आघाडी चालू राहणार, असे गृहीत धरून आपण काम चालवले पाहिजे, असे या संबंधात मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे सांगत राहिले.

हा विषय नंतर आणखी पुढे गेला. श्रेष्ठी मंडळींपैकी दोघांनी या भूमिकेला पाठिंबा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी स्वबळावर लढण्याला आपली सहमती दर्शविली आहे. पूर्वी ते मध्य प्रदेशचे १० वर्षे मुख्यमंत्री होते. पक्षसंघटनेत त्यांच्याकडे उत्तर प्रदेश व बिहार ही राज्ये सोपविलेली आहेत. त्या राज्यांमध्ये स्वबळाचे धोरण अवलंबिल्यामुळे लक्षणीय यश मिळाले. साहजिकच त्यांच्या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे एक सरचिटणीस अनिल शास्त्री यांनी तर यासंबंधात बॉम्बच टाकला! पक्षाच्या ‘काँग्रेस संदेश’ या मुखपत्रात त्यांनी अग्रलेखाद्वारे महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसची जिल्हावार चाचपणी चालू आहे. स्वबळावर लढण्याबाबत त्या वेळी कार्यकर्त्यांची मते अजमावण्यात येत आहेत. आता मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन होऊन गेल्यावर या बाबीवर पक्षाचा अंतिम निर्णय होईल, असे दिसते.

काँग्रेसला स्वबळावर लढायचे असून राष्ट्रवादीला मात्र आघाडी हवी आहे, असे वातावरण दिसत असले तरी त्यावर पूर्ण विसंबून राहता येत नाही. काँग्रेसची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीने तो बहाणा केला असणे शक्य आहे. तशी काही पूर्वपीठिकासुद्धा आहे. महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा यांच्या खालोखाल मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची असते. तिच्या गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघीडीची बोलणी बरेच दिवस चालली आणि शेवटी राष्ट्रवादीने क्षुल्लक कारण देऊन ती मोडली. याचे कारण म्हणजे आघाडी झाली असती तर शिवसेना-भाजपची सत्ता जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीची आली असती. प्रत्यक्षात शिवसेनेची जाऊन काँग्रेसची आली असती. अशा प्रकारे काँग्रेसला बलवान करण्यात राष्ट्रवादीला स्वारस्य नव्हते. त्यामुळे आघाडी न होता शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळाली. हे लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वस्वी आघाडीवर अवलंबून आहे, असे काँग्रेसने गृहीत धरून चालता कामा नये.

महाराष्ट्रात आपली ताकद काँग्रेसपेक्षा बरीच जास्त वाढलेली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सातत्याने केला जात असे. या निवडणुकीमध्ये हा दावा पुरता फोल ठरला. तो खरा आहे हे दाखविण्याची संधी आता विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळणार आहे. यासाठी आघाडी न करता आपण स्वबळावर ही निवडणूक लढविली तरच ही गोष्ट शक्य होईल, असे राष्ट्रवादीतील काही प्रमुखांना वाटते. स्वबळावर लढावे लागेल असे गृहीत धरून त्या पक्षाने तशी पूर्वतयारी पूर्ण केलेली आहे. त्याबरोबरच व्यूहरचनेचा पक्का विचार केलेला आहे. अशा तयारीत काँग्रेस पक्ष बराच मागे आहे. हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले तर त्या मैत्रीपूर्ण लढती असतील. तसा प्रयोग १९८० साली पुलोदच्या घटक पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीत केला होता. तशा लढती आता विधानसभेच्या निवडणुकीत झाल्या तर त्यासाठी राष्ट्रवादीने केंद्र सरकारातून बाहेर पडण्याची गरज नाही तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळालाही त्यामुळे धोका उत्पन्न होण्याचा संभव नाही.

काँग्रेसने स्वबळावर लढावे यासाठी विलासराव देशमुख विशेष आग्रही का आहेत हे पाहावयास हवे. अशा प्रकारे निवडणूक झाली तर काँग्रेसला शंभरपेक्षा अधिक तर राष्ट्रवादीला पन्नासहून कमी जागा मिळतील, असे विलासरावांना वाटते. त्यानंतर आघाडी केल्यावर सध्याप्रमाणे समान सत्तावाटप न राहता २:१ या प्रमाणात ते राहील, असे ते धरून चालले आहेत. पवारांनी १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचा लातुरात पराभव घडवून आणला होता. त्याचे उट्टे काढण्याची ही संधी आहे असे देशमुखांना वाटते. आपल्या पाठीराख्यांना काँग्रेसची जास्तीत जास्त तिकिटे मिळवून द्यायची, त्यांच्या निवडणूक खर्चाची पुरेशी सोय करायची आणि त्यानंतर विधानसभा काँग्रेस पक्षात आपले बहुमत प्रस्थापित करून पुन्हा मुख्यमंत्रीपद पटकावायचे अशी विलासरावांची व्यूहरचना आहे. आपण पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांना मंत्री करणार आहोत असे विलासरावांनी नुकतेच कोल्हापुरात जाहीरपणे सांगितले हे यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.

या मनसुब्यामध्ये अडचण एवढीच आहे की, विधानसभेच्या २००४ साली झालेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसश्रेष्ठींकडून होणाऱ्या सूत्रचालनात आता बराच बदल झालेला आहे. विधानसभा काँग्रेस पक्षात ज्याला जास्तीत जास्त पाठिंबा असेल त्याला मुख्यमंत्री करायचे असे सोनिया गांधींचे धोरण असे. आता हा विषय राहुल गांधी हाताळत आहेत. त्यांनीच अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री बनविले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुल गांधींची राजकीय ताकद बरीच वाढलेली आहे. त्या निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंह वगळता पंतप्रधान कोण होणार यासाठी सुमारे दहा नावे पुढे आली होती. आता राहुल गांधी एवढेच नाव शिल्लक आहे. विधानसभा काँग्रेस पक्षात बहुतम ही मोजपट्टी राहुल स्वीकारतील असा संभव नाही. युवकांना प्राधान्य देण्यावर त्यांचा भर असतो. आता प्रस्तुत प्रकरणी प्रश्न असा आहे की ३९ वर्षे वयाचे राहुल गांधी ५१ वर्षांच्या अशोक चव्हाणांना काढून ६४ वर्षांच्या विलासरावांना पुन्हा मुख्यमंत्री करतील काय?

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढले होते. त्या वेळी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्या सुमारे ५० मतदारसंघांत तर राष्ट्रवादी व मित्र पक्ष यांच्या सुमारे ६० ठिकाणी अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. एका मतदारसंघात तर या दोन्ही पक्षांनी अनामत गमावली होती! पुढे २००४ सालच्या निवडणुकीत उभय पक्षांच्या एकूण सुमारे दहा उमेदवारांची अनामत जप्त झाली होती. आता पुन्हा स्वबळावर लढायचे झाल्यास सरकारी तिजोरीत अधिक भर पडेल हे निश्चित!

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत बेबनाव आहे, मात्र शिवसेना- भाजप युतीमध्ये सारे काही आलबेल आहे अशातील भाग नाही. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे भाजप नेत्यांना अपमानास्पद वागणूक देतात असे अलीकडच्या काळात अनेकदा दिसून आले आहे. तरीही भाजपची मंडळी गप्प राहिली होती, पण लोकसभेच्या निवडणूक निकालाचे पृथ:करण केल्यावर त्यांना धक्काच बसला. जेथे शिवसेनेचा उमेदवार नसतो, पण भाजपाचा असतो तेथे शिवसेनेचे मतदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करतात असे भाजपला आढळून आले आहे. यास्तव युतीमध्ये मनसेला समाविष्ट करावे असा भाजपचा आग्रह असून ती सूचना शिवसेनेला मुळीच मान्य नाही. शिवसेना व भाजप यांना मिळणारी मते फुटावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात मनसेचा उमेदवार असावा असा विशेष प्रयत्न काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडून होईल हे उघड आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप काय करील? काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली नाही तर भाजपसुद्धा स्वबळावर लढण्याचा विचार करील यात शंका नाही.

महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडी आणि शिवसेना व भाजप यांच्या दरम्यान युती होण्यामध्ये मतदारसंघांची झालेली फेररचना (डिलिमिटेशन) ही मुख्य अडचण आहे. तीस वर्षांनंतर झालेल्या या फेररचनेत सारे उलटेपालटे होऊन गेले आहे. त्यामुळे कोणत्या आधारावर उभय पक्षांमध्ये वाटप करावे हा यक्षप्रश्न होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्य़ात विधानसभेचे मुळात १७ मतदारसंघ होते. ते आता दहा झाले आहेत. उपनगर जिल्ह्य़ात १७चे २६ बनले आहेत. ठाणे जिल्ह्य़ात नागरी आठ होते त्याचे १८ झाले आहेत. भंडारा जिल्ह्य़ात पाच होते त्याचे तीन बनले आणि त्यातील एक राखीव करण्यात आला. महाराष्ट्रभर अशी तोडफोड झाली. लोकसभेच्या निवडणुकीत फेररचनेनंतर वाटप करताना विशेष अडचण आली नाही हे खरे, पण विधानसभेबाबत ती मोठीच ठरणार आहे. यासंबंधात काँग्रेसपुढे आणखी समस्या म्हणजे नारायण राणे यांच्याबरोबर आलेले आमदार आणि अपक्ष आमदार यांचे काय करायचे? त्यांच्यासाठी आघाडीत मतदारसंघ नाहीत, पण स्वबळावर लढल्यास ते मिळू शकतात अशी परिस्थिती आहे. बिघाडी व्हावी या मताचे राष्ट्रवादीमध्येही पुष्कळ लोक आहेत. शिवसेना व भाजप यांच्या युतीमध्ये १९८९-९० मध्ये वाटप होताना १९८४-८५ च्या निवडणुकांतील निकालांचा आधार होता. तसेच, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीत २००४ साली झालेले वाटप १९९९ च्या निकालावर आधारित होते. या सर्व जुन्या गोष्टी झालेल्या असल्याने या चारही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली तर कोण किती पाण्यात आहे हे सर्वाना समजेल, खोटय़ा वल्गना निकालात निघतील आणि वस्तुनिष्ठपणे व नव्याने आघाडी व युती करता येईल.

Sunday, June 14, 2009

पुढचा मुख्यमंत्री मनसे ठरवील काय?

शां. मं. गोठोसकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवील अशी घोषणा त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्य विधानसभेच्या येत्या निवडणुकीत तिच्या सर्व २८८ जागा आधी लढवा आणि मग अशी बढाई मारा अशा आशयाची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मनसेने बहुमत मिळविल्यावर कोणाला मुख्यमंत्री करायचे ते मी ठरवीन असे राज ठाकरे म्हणालेले नाहीत. त्यामुळे पवारांची प्रतिक्रिया गैरलागू ठरते. त्यांच्या काँग्रेस (एस)तर्फे १९८० व १९८५ आणि राष्ट्रवादीतर्फे १९९९ या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सर्व जागा लढवू शकले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसला अखिल भारतीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता असली तरी आताच्या लोक सभेच्या निवडणुकीत तो पक्ष १० टक्केसुद्धा जागा लढवू शकलेला नाही, तरी पंतप्रधानपदावर पवारांचा दावा होताच. हे सर्व पाहता राज ठाकरे यांना हिणवण्याचा शरद पवारांना मुळीच अधिकार पोचत नाही.



महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना- भाजप युती यांपैकी कोणालाही गेल्या दोन निवडणुकांमध्ये निर्भेळ बहुमत मिळाले नव्हते. आताही तसेच घडून फरक पुरेसा राहील आणि त्या फरकाहून जास्त जागा मनसेला मिळतील असे राज ठाकरे यांनी गृहीत धरलेले आहे हे उघड आहे. साहजिकच, मुख्यमंत्री कोण हे ठरविण्याचा अधिकार आपल्या हाती येईल असे त्यांना वाटते. शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेला नेहमीप्रमाणे जास्त जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील हे ठरल्यासारखे आहे, पण राज ठाकरे यांनी अगोदरच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी हे त्या पदासाठी सर्वात अधिक पात्र असल्याची शिफारस केली आहे. तथापि, आपणाला मनसेचा पाठिंबा नको आहे, असे गडकरींनी आताच सांगून टाकले आहे. त्यामुळे युतीला पाठिंबा देण्याचा प्रश्न संपला आहे काय?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या नाहीत तरीही मुख्यमंत्रीपदासाठी त्या पक्षाचाच उमेदवार असणार. कारण राष्ट्रवादीमध्ये दावेदार ढीगभर आहेत. त्यातून निवड करण्याऐवजी काँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद दिलेले बरे असा विचार गेल्या वेळेप्रमाणे यंदाही शरद पवार करतील, पण पाठिंबा हवा तर मीच मुख्यमंत्री होणार असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला तर? झारखंडमध्ये अपक्ष आमदार मुख्यमंत्री झाला होता हे लक्षात घेता मनसेचा असा दावा फाजील म्हणता येणार नाही. ही ‘आपत्ती’ टाळण्यासाठी शिवसेना काय करील? काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेचा पाठिंबा राहणार नाही, पण कधीही विरोधी मतदान करणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे देतील आणि आघाडीने आपल्या आमदारालाच मुख्यमंत्री करावे अशी अट घालतील. मनसेवाल्यांना चांगले बदडून काढण्यासाठी कृपाशंकर सिंह यांना मुख्यमंत्री केले पाहिजे असे काँग्रेसचे एक सरचिटणीस राजीव शुक्ला म्हणाले होते. त्यानुसार आघाडीचे ते नेते झाले तर राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील की उद्धव ठाकरेंना? मुख्यमंत्री ठरविण्याच्या प्रयत्नांना असे विविध फाटे फुटू शकतात.

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला कोटीमध्ये मते मिळवू असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. कोटी म्हणजे नक्की किती होतात याची त्यांना कल्पना नाही असे दिसते. महाराष्ट्रात गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकासुद्धा पक्षाला एक कोटी मते मिळालेली नाहीत. पवारांनी सांगितल्याप्रमाणे मनसेने सर्व २८८ जागा लढविल्या तर एक कोटी मतांसाठी प्रत्येक जागी सरासरीने ३५ हजार मते मिळाली पाहिजेत. आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाने ज्या १२ जागा लढविल्या त्यांच्या खाली विधानसभेच्या ७२ जागा होत्या. तेथे सरासरीने या पक्षाला २१ हजार मते मिळाली. एक कोटी मते मिळविणार ही केवळ वल्गना कशी ठरते याची यावरून कल्पना येईल.

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार त्या संभाव्य नावांमध्ये अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांच्याबरोबर राज ठाकरे यांचेही नाव घेतले पाहिजे. या ठाकरे बंधूंबाबत आक्षेपाची बाब म्हणजे या पदासाठी किमान आवश्यक एवढी त्यांची तयारी झालेली नाही. खरे म्हणजे त्यांनी तशी तसदी घेतलेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी व त्या आधी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रभर मोठय़ा सभा झाल्या. गर्दी खेचणाऱ्या पुढाऱ्यांमध्ये ते समाविष्ट झाले. त्या सर्व सभांमध्ये ‘सातबारा कोरा करणार’ हा त्यांचा एकमेव नारा होता. त्या संबंधात अलिकडेच एका चित्रवाहिनीवरील मुलाखतीमध्ये ‘सातबारा म्हणजे काय?’ असा प्रश्न अँकरने विचारला असता ते यथार्थ उत्तर देऊ शकले नाहीत. यानंतरही त्यांनी ही बाब व्यवस्थितपणे जाणून घेतली असेल असे संभवत नाही. मुख्यमंत्रीपदासाठी आपली किमान आवश्यक एवढी तयारी करण्याकरिता ठाकरे बंधूंनी येत्या दोन महिन्यात रोज १५ मिनिटे खर्च केली तरी पुरेशी आहेत. राजकीय नेत्यांप्रमाणे ठाकरेंबंधूंची दिनचर्या नाही. त्यांच्या दिनचर्येप्रमाणे राजकारण चालत नसते. राजकारणात आवश्यक त्याप्रमाणे त्यांनी दिनचर्या राखली नाहीतर शिवसेना व मनसे यांना कालांतराने ते फारच महागात पडेल.स्थापना होऊन तीन वर्षे झाली तरी मनसेची राजकीय पक्ष म्हणून रीतसर बांधणी करायला अजून प्रारंभ झालेला नाही. पक्ष म्हटला की त्याला सैद्धांतिक बैठक हवी. तशी मनसेला काहीसुद्धा नाही हे तिचे संकेतस्थळ पाहिल्यावर लक्षात येते. मनसे ही दहशतवादी आहे अशी तिची संभावना एकदा सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मनसेवाले हे स्थानिक दहशतवादी आहेत असे ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी नुकतेच पुण्यात म्हणाले. नक्षलवाद्यांबाबत ते असे बोलत नाहीत. कारण त्यांना काही तात्विक आधार आहे. मनसेसाठी तसा पैदा करणे कठीण नाही. पण तो असला पाहिजे याची प्रथम नेतृत्वाला जाणीव हवी. अशी सैद्धांतिक बैठक असली की त्या पक्षाची अशा प्रकारे कोणी अवहेलना करू शकणार नाही. अशा बैठकीबरोबर पक्षसंघटना बांधण्याचाही विचार व्हायला हवा. स्थापना झाल्यापासून मनसेबाबत तसा आनंदच आहे. या संबंधात एक उदाहरण देण्यासारखे आहे. विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला २००४ साली उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले नाही. तरीही तो अपक्ष म्हणून लढला व दुसऱ्या क्रमांकाला आला. शिवसेनेच्या उमेदवाराची मात्र अनामत रक्कम जप्त झाली. महाराष्ट्रात असे चार मतदारसंघांमध्ये झाले. तथापि, त्या ताकदवान कार्यकर्त्यांशी शिवसेनेने सोडाच, पण मनसेनेही अजून संपर्क साधलेला नाही. शिवसेना व भाजप यांच्या जागावाटपात विधानसभेची व त्यावरची लोकसभेचीही जागा भाजपाला अशी स्थिती सुमारे ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. भाजपची पालखी उचलणे एवढेच काम तेथील शिवसैनिकांना असते. मनसेला हे चांगले मार्केट असले तरी तेथेही हा पक्ष पोचलेला नाही.

नवा महाराष्ट्र घडविण्याचा आपला कार्यक्रम मनसेने जाहीर केला आहे. सध्याच्या विशेष स्पर्धात्मक राजकारणात तो निर्थक म्हणावा लागतो. त्याऐवजी मुंबईत येणारे लोंढे थोपविणारा कायदा करण्याची घोषणा मनसे का करीत नाही? असा कायदा करणे राज्यघटनेनुसार शक्य असून त्याला मुंबईतील अमराठीपैकी बिगर हिंदी नागरिक पाठिंबा देण्याची शक्यता आहे. असा कायदा आम्ही करणार अशी घोषणा शिवसेनेने केली तर मनसेच्या शिडातील सारी हवाच काढून घेतली जाईल. त्याचा अर्थ मुख्यमंत्री ठरविण्याचा अधिकारही हिरावला जाईल असाही होतो.