कोणत्याही बातमीच्या मुळाशी जाऊन त्यातील सत्यासत्यता वाचकांपुढे आणणारे, कोणत्याही घटनेमागे नेमके काय घडले आहे याची पूर्ण माहिती घेऊन ती वाचकांपर्यंत पोहोचविणारे शां. मं. गोठोसकर म्हणजे गेल्या साडेचार दशकांच्या मराठी पत्रकारितेचे साक्षीदार आहेत. आपला मुद्दा वेळप्रसंगी समाजाच्या आणि राजकारण्यांच्या विरोधात जाऊनही ठामपणे मांडणारे गोठोसकर आज आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काही आठवणींना दिलेला उजाळा.
---------माझा पहिला लेख १९५८ साली मे महिन्यात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाला. त्या वेळी मी २२ वर्षांचा होतो. कोकण रेल्वे हा विषय होता. सलग तीन लेखांकात तो प्रसिद्ध झाला. मला आकाश ठेंगणे झाले होते. त्या वेळी मी कोल्हापूरला सरकारी नोकरी करीत होतो. मला पत्रकार व्हायचे होते. ती नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही सत्पात्र आहात, असे तो लेख वाचल्यावर माझ्या मित्रांनी सांगितले.एक वर्षांनंतर सरकारी नोकरी सोडून मी मुंबईला आलो. पत्रकार म्हणून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांचे त्या वेळी ‘लोकमित्र’ दैनिक होते. ते मालक व संपादक होते. त्यांना मी १५ नोव्हेंबर १९५९ रोजी भेटलो. त्यांनी त्यांच्या दैनिकातील एक ज्येष्ठ पत्रकार वि. गं. देशपांडे यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितले.
दैनिक वर्तमानपत्राला कॉलम किती असतात येथून प्रश्न सुरू झाले. ‘कॉलमातील एका ओळीत अक्षरे किती असतात?’ मी उत्तरलो, ‘आपल्याकडे १७ तर इतर दैनिकांमध्ये १९ असतात.’ अशा फरकाचे कारण काय, असे देशपांडय़ांनी विचारता आपले कॉलम अरूंद आहेत, असे मी सांगितले. त्यांनी लगेच खात्री करून घेतली. एका कॉलमात ओळी किती असतात, या प्रश्नावर इतरांपेक्षा आपल्याकडे जास्त कारण आपले कॉलम अधिक लांबीचे आहेत, असे मी सांगितले. त्याचीही त्यांनी खात्री करून घेतली. हा प्राणी निरूत्तर होण्यापैकी नाही, हे देशपांडय़ांच्या लक्षात आले. त्यांनी होकार सांगितल्यावर एस. एम.नी मॅनेजर श्रीरंग साबडे यांना बोलावून सांगितले, ‘यांना दीड महिना उमेदवारी करू द्या. त्यानंतर पेरोलवर घेण्याचा विचार करू.’
महाद्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करण्याची पूर्वतयारी त्या वेळी चालू होती. मुंबईच्या उत्पन्नातून महाराष्ट्राने गुजरातला दरवर्षी चार कोटी रुपये याप्रमाणे १० वर्षे द्यायचे, असा प्रस्ताव पक्का होत आला होता. त्याला विरोध करणारा माझा लेख ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या अंकात मुख्य लेख म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एस. एम. साहेबांवर टीका होती. माझ्या नोकरीचा तो तिसरा दिवस होता. दुपारी एस. एम. ‘लोकमित्रा’त आले. ‘तो लेखक तुम्हीच का?’ असे मला विचारून माझ्या टेबलासमोरच्या खुर्चीवर ते बसले आणि त्यांनी अर्धा तास त्या लेखावर चर्चा केली. नंतर ते आपल्या केबिनमध्ये गेले. त्यांनी साबडेंना बोलावून घेतले आणि ‘गोठोसकरांना पे-रोलवर घ्या,’ असे सांगितले. अशा प्रकारे मी ‘लोकमित्र’मध्ये उपसंपादक झालो.त्या वेळी त्या दैनिकात संपादक खात्यातील कोणीही अग्रलेख लिहीत नसे, तर तो बाहेरून येत असे. आऊटसोर्सिग हा शब्द भारताच्या किनाऱ्याला लागण्यापूर्वीच ही व्यवस्था होती. एकदा तसा अग्रलेख येऊ शकला नाही, मग वृत्तसंपादक दिनकर भागवत यांनी सर्वाना प्रश्न केला, ‘अग्रलेख कोण लिहू शकेल?’ मी हात वर करताच त्यांनी मला बोलावून घेतले, चर्चा केली आणि ‘लिहा’ म्हणून सांगितले. अशा प्रकारे पहिला पगार मिळण्यापूर्वीच या ज्युनिअरमोस्टचा अग्रलेख छापून आला.
पुढे १९६१ च्या जुलैमध्ये पानशेत धरण फुटले आणि त्याचा परिणाम म्हणून खडकवासला धरणही कोसळले. पुण्यात भीषण असा जलप्रलय झाला. त्या वेळी सेंट्रल वॉचर अॅण्ड पॉवर कमिशनचे ‘भगीरथ’ हे इंग्रजी मासिक प्रत्येक दैनिकाकडे भेट म्हणून पाठविले जात असे. ते अंक मी जपून ठेवत असे. ते चाळले असता, धरणे कशी फुटतात या विषयावर एक लेख होता. तो दोनदा काळजीपूर्वक वाचला, त्याचा अनुवाद केला आणि लेखक म्हणून माझ्याच नावाने छापला. या विषयावर फक्त ‘लोकमित्र’मध्ये लेख आल्याने वाचकही खूश झाले. पत्रकारितेमधील माझे हे पहिले चौर्य!
दक्षिणोत्तर लांबलचक रत्नागिरी जिल्ह्याचे १९८० साली विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच ही मागणी चालू होती. मी ‘लोकमित्र’मध्ये असताना संपादक मंडळात याची चर्चा झाली. मी म्हणालो, ‘विभाजन न करता सागरकिनारी मध्यावर जे गाव असेल तेथे जिल्ह्याच्या ठाण्याचे स्थलांतर करावे.’ एसएम चिडले. ते मला म्हणाले, ‘तुम्ही लहान आहात. असले प्रश्न राजकीय असतात, ते कधीच गणिताने सुटत नसतात हे कायम लक्षात ठेवा. तरी पण मला सांगा, तसे मध्यावर गाव कोणते येते?’ मी उत्तरलो, ‘पावस!’ ते आमच्या संपादकांचेच गाव होते. ते यावर म्हणाले, ‘गोठोसकरांचा तोडगा अगदी बिनतोड आहे!’
‘लोकमित्र’मध्ये दोन वर्षे झाल्यानंतर १९६२ साली मी दैनिक ‘नवशक्ती’मध्ये उपसंपादक म्हणून दाखल झालो. त्यावेळी पु. रा. बेहेरे सहसंपादक होते. नव्याने आलेल्या उपसंपादकांपैकी कोणाला स्फुट लिहिता येते काय याची त्यांनी चाचपणी केली आणि मला एक स्फुट लिहायला सांगितले. त्यांनी ते वाचले आणि फाडून टाकले. ते म्हणाले, ‘माहिती, विचार व युक्तिवाद सारे काही चांगले आहे, पण ‘मी शहाणा कसा?’ या थाटात ते लिहिले आहे. त्याऐवजी वाचकांनी तुम्हाला शहाणे म्हटले पाहिजे, अशा धोरणाने हेच स्फुट पुन्हा लिहा.’
पुढे १९६५ साली पां. वा. गाडगीळ ‘नवशक्ति’चे संपादक झाले. कोणत्याही योग्य विषयावर आज अग्रलेख लिहा असे त्यांनी एकदा मला सांगितले. तो वाचल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही यामध्ये संबंधितांवर सडकून टीका करताना कित्येक मुद्दे वापरले आहेत. तुमच्याकडे आणखी मुद्दे आहेत की संपले?’ मी ‘संपले’ असे सांगताच ते म्हणाले, ‘निम्मे मुद्दे वापरून तुम्ही पुन्हा अग्रलेख लिहा. तुमच्याकडे एवढाच मसाला आहे, असे गृहीत धरून संबंधित मंडळी उत्तर देतील. मग राहिलेले मुद्दे वापरून त्यांचा निकाल लावा.’ मग गाडगीळसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे काय असेल, याची बातमी एकदा ‘नवशक्ति’मध्ये त्याच दिवशी मी दिली. अर्थमंत्री बॅ. वानखेडे यांचे भाषण संपताच विरोधी सदस्य डॉ. मंडलिक यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आक्षेप घेतला. त्यावर अर्थमंत्री उत्तरले, ‘तीन महिन्यांपूर्वी मी दिल्लीला जाऊन पुढच्या वार्षिक योजनेबाबत नियोजन आयोगाशी चर्चा केली. त्याची बातमी ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या २६ नोव्हेंबरच्या अंकात आली आहे. त्यामध्ये कसलाही बदल न करता ‘नवशक्ति’ची बातमी ‘भांडाफोड’ म्हणून तयार करण्यात आली. संबंधित पत्रकाराच्या बुद्धिचातुर्याचे मी कौतुक करतो.’
पुण्यात खासगी कंपनी वीजपुरवठा करीत होती त्यावेळची ही गोष्ट. गणेश खिंडीत तिचा मुख्य ट्रान्स्फॉर्मर होता. त्याचा १९६८ साली स्फोट होऊन सबंध पुणे काळोखात बुडाले. त्या कंपनीचा वार्षिक अहवाल महिन्यापूर्वी ‘नवशक्ति’च्या कार्यालयात आला होता. तो मी वाचला. ‘त्या ट्रान्स्फॉर्मरवर त्याच्या शक्तीपेक्षा भार वाढला असून तो आणखी वाढतो आहे. जास्त शक्तीच्या ट्रान्स्फॉर्मरची आयात करण्यासाठी आम्ही तीन वर्षे प्रयत्न करीत आहोत, पण केंद्र सरकार परवाना देत नाही. त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मरचा कधी स्फोट होऊन साऱ्या पुण्यात अंधार होईल हे सांगता येत नाही,’ अशा आशयाचा मजकूर त्या अहवालात होता. तो वाचून कंपनीचे अध्यक्ष गोकुळचंद मोरारका यांची मुलाखत घेतली आहे, असे कल्पून बातमी तयार केली. ती पहिल्या पानावर आली. ती वाचून ‘नवाकाळ’चे त्यावेळचे संपादक आप्पासाहेब खाडिलकर म्हणाले, ‘याला म्हणतात खरा जरनॅलिझम! सर्व दैनिकांमध्ये फक्त ‘नवशक्ति’ने कंपनीचे म्हणणे काय हे जाणून घेतले.’ पत्रकारितेमधील माझे हे दुसरे व अंतिम चौर्य!
पु. रा. बेहेरे १९६८ साली ‘नवशक्ति’चे संपादक झाले. त्यावेळी तिलारी प्रकल्पाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. महाराष्ट्र व गोवा यांच्यासाठी सिंचन व जलविद्युत यांकरिता तो आंतरराज्य बडा प्रकल्प होता. त्यावर ‘लिहा’ असे बेहेरे म्हणाले. मग मी त्या प्रकल्पाचा गोपनीय अहवाल मिळविला आणि त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये मला दोन ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. विशेष म्हणजे सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर कमिशनने तो अहवाल तांत्रिकदृष्टय़ा तपासून संमत केला होता. तरीही त्यामध्ये चुका राहून गेल्या होत्या.तिलारी प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील परमे गावी मुख्य धरण योजले होते. त्याचा जलाशय पानशेतच्या तिपटीहून किंवा वैतरणाच्या दुपटीहून मोठा राहणार होता. त्या जलाशयामुळे नऊ हजार लोक (१९६१ च्या जनगणनेनुसार) विस्थापित होणार होते. या विषयावर ‘नवशक्ति’मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. परमे गावच्या वरच्या बाजूला दोन किलोमीटरवर असलेल्या आयनोडे गावी धरण बांधल्यास फक्त तीन हजार लोक विस्थापित होतील असे मी त्यात म्हटले होते. त्यावेळचे सिंचनमंत्री शंकरराव चव्हाण यांनी तो लेख वाचला. त्या प्रकल्प अहवालात ढोबळ चुका आहेत, याची त्यांनी खात्री करून घेतली आणि मग परमे येथील जागा रद्द करून आयनोडे येथे धरण बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सरकार आपल्या गतीने चालते. त्यानुसार आयनोडेचे धरण पुरे व्हायला ३५ वर्षे लागली. तीन वर्षांपूर्वी त्यामध्ये पाणी भरण्यात आले. माझ्या लेखामुळे सहा हजार लोक विस्थापित होण्यापासून म्हणजेच घरावरून नांगर फिरविला जाण्यापासून वाचले. माझ्या आयुष्यात माझ्या हातून घडलेले हे सर्वात मोठे सत्कार्य असे मी समजतो.
शिवाजीराव गिरीधर पाटील विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी एका विषयावर समितीचा अहवाल तयार केला. तो सभागृहाला सादर करणे एवढेच मग अध्यक्षाचे काम असते. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा अहवाल विशेष कसा आहे हे सांगितले. त्यावर ‘नवशक्ति’मध्ये मी अग्रलेख लिहिला. पाच वर्षांपूर्वीच्या अंदाज समितीने याच विषयावर तयार केलेला अहवाल फार चांगला होता आणि त्याच्याशी विसंगत असा हा शिवाजीरावांचा अहवाल अगदी निर्थक आहे असे त्या अग्रलेखात दाखवून दिले होते. त्यावर शिवाजीरावांनी संबंधित उपसचिवाला बोलावून घेतले आणि त्याची खरडपट्टी काढली!
लक्ष्मणराव दुधाने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष असताना देश समाजवादाच्या दिशेने जात होता. आपल्या देशात पहिला वीज कायदा १९१२ साली झाला. तो रद्द करून १९४८ साली नवा वीज कायदा अंमलात आला. राज्यातील विजेची निर्मिती, पारेषण व वितरण हे सर्व एकाच अधिकाराखाली असावे यासाठी १९४८ चा वीज कायदा अस्तित्वात आला असे जाहीर विधान दुधानेसाहेबांनी केले होते. त्यावर मी ‘नवशक्ति’मध्ये अग्रलेख लिहिला. त्या कायद्याचे विधेयक १९४६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे ठेवले होते. ते विधेयक, त्याची प्रस्तावना व बाबासाहेबांचे भाषण यांमध्ये दुधाने म्हणतात तसे काही नव्हते. पुढे १९४८ साली घटना समितीमध्ये काकासाहेब गाडगीळांनी ते चर्चेसाठी सादर केले. त्यावेळी चर्चेपूर्वी व उत्तर देताना काकासाहेबांनी एकाधिकाराचा दुरान्वयानेही उल्लेख केला नव्हता. पुढे पंचवार्षिक योजनांचे ग्रंथ किंवा सरकारची अन्य धोरणात्मक कागदपत्रे यांमध्ये असा कोठेही उल्लेख नव्हता. मग एकाधिकाराचा हा मुद्दा तुम्ही कोठून आणला, असा सवाल त्या अग्रलेखातून करण्यात आला होता. मी सांगतो तेच ब्रह्मवाक्य समजा, अशा आशयाचे उत्तर दुधान्यांनी पाठविले.
बॅ. अंतुले १९७२ साली सार्वजनिक बांधकाम व बंदरे या खात्यांचे कॅबिनेट मंत्री झाले. रायगड जिल्ह्यासाठी आणि विशेषत: आपल्या श्रीवर्धन मतदारसंघासाठी जास्तीत जास्त विकास खर्च करण्याचे त्यांनी मनावर घेतले. रेडी ते विजयदुर्ग असा किनाऱ्याला समांतर मार्ग तयार करण्याचे सरकारने त्या आधीच ठरविले होते आणि त्यासाठी निधीसुद्धा मंजूर केला होता. मग अंतुल्यांनी त्याऐवजी रेडी ते रेवस अशा सागरी महामार्गाची घोषणा केली आणि तो निधी आपल्या मतदारसंघात वापरायला सुरूवात केली. रत्नागिरी बंदर बारमाही करण्याचे काम बंद करून त्या पैशातून आपल्या मतदारसंघातील दिघी बंदरात धक्का बांधायचे काम त्यांनी सुरू केले. मुंबई-कोकण-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ पश्चिमेकडे सरकवून आपल्या आंबेत गावावरून जावा यासाठी अंतुल्यांनी विशेष प्रयत्न केले. संपादक बेहेरे यांची अंतुल्यांशी घनिष्ठ मैत्री होती. हे पाहता ‘नवशक्ति’मधून हे प्रकरण बाहेर काढणे, मला शक्य नव्हते. मग अंतुल्यांच्या एका राजकीय विरोधकाला मी ही माहिती दिली. त्याने टाकलेल्या पावलांमध्ये सर्वच वृत्तपत्रांमध्ये या गोष्टी प्रकाशात आल्या.
‘नवशक्ति’मध्ये असताना मी कोकण रेल्वेवर केवळ वारंवार लिहित होतो, असे नव्हे तर त्या विषयाचा अॅक्टिव्हिस्टही होतो. त्या कामाचे इंजिनिअरिंग सर्वेक्षण १९७१ साली झाले. आमच्या कार्यालयात भास्कर नावाचा शिपाई होता. वैभववाडी तालुक्यात त्याचे गाव होते. संकल्पित रेल्वे त्याच्या घरावरून जाणार असे त्याला गावावरून पत्र आले. तो संतापला. संपादकांना म्हणाला, ‘कोकणी लोकांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी शेकडो एसटय़ा आहेत. ते सुखाने प्रवास करत आहेत. रेल्वे हवीच कशाला? हे गोठोसकरसाहेब नसते खूळ डोक्यात घेऊन बसले आहोत. त्यांना तुम्ही जरा सांगा!’
पुढे १९७७ साली मी ‘नवशक्ति’मधल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि वर्किंग जरनॅलिस्ट म्हणून माझी १८ वर्षे संपुष्टात आली. या काळात मला ‘नवशक्ति’मध्ये दोनदा पदोन्नती मिळाली होती आणि सोडताना माझे स्थान संपादकांच्या खालोखाल होते.