' टाइम्स ऑफ इंडिया'चे भूतपूर्व संपादक शामलाल यांचे नुकतेच निधन झाले. या दैनिकात त्यांचे 'लाइफ अँड लेटर्स' हे साप्ताहिक सदर बुधवारी प्रसिद्ध होत असे. जगात नव्याने विशेष गाजत असलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण त्या सदरात येत असे. देशाबाहेर महत्त्वाचे काही चालले असल्यास ते भारतवासीयांना प्रथम समजावून देण्याचा अधिकार आपलाच आहे असे ते समजत. त्यांना एका पत्रकाराने यशस्वी गुगली टाकली त्याची ही गोष्ट. बोरिस पास्तरनाक या ख्यातनाम रशियन लेखकाची डॉ. झिवागो या आत्मचरित्रात्मक नोबेल विजेत्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रती मुंबईत स्टँड बुक स्टॉलमध्ये पोचल्या. त्यावेळी 'इंडियन एक्सप्रेस'मधील एक पत्रकार मोहन राव तेथे उपस्थित होते. तो शनिवार होता. आलेल्या प्रतींपैकी 'टाइम्स' व 'एक्सप्रेस' यांना एकेक द्यायची होती. 'लाइफ अँड लेटर्स'सारखे ग्रंथ समीक्षणाचे राव यांचे सदर शुक्रवारी 'एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध होत असे. डॉ. झिवागोची प्रत 'टाइम्स'मध्ये सोमवारी दिली, तर त्यावर बुधवारच्या अंकात शामलाल लिहिणार हे उघड होते. यास्तव, दोन्ही दैनिकांना गुरुवारी प्रती द्या, अशी विनंती राव यांनी बुक स्टॉलचे मालक शानभाग यांना केली. ते व राव दोघे कोकणी असल्यामुळे त्यांचे सख्य होते. मग राव यांनी एक प्रत घरी नेली आणि सोमवारी परत आणून दिली. पुढे शानभागांनी त्या प्रती गुरुवारी दोन्ही दैनिकांना पाठवून दिल्या. दुसऱ्या दिवशी शामलाल पाहतात तर 'एक्सप्रेस'मध्ये डॉ. झिवागोवर समीक्षण प्रसिद्ध झाले होते. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी शानभाग व 'एक्सप्रेस'चे त्यावेळचे संपादक फ्रँक मोराइस यांच्याकडे चौकशी केली असता, त्या प्रती गुरुवारीच वाटण्यात आल्या होत्या, याबद्दल त्यांची खात्री झाली. त्याचबरोबर मोहन राव यांनी चांगलीच कुरघोडी केली हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.
शां. मं. गोठोसकर, वडाळा.Click here to read this letter on Maharashtratimes.com
No comments:
Post a Comment