Wednesday, March 14, 2007

श्रीमुखात भडकावून द्यायची झाली तर..!

शां. मं. गोठोसकर

भारताच्या राजकारणात हिंदी भाषिकांचे प्राबल्य आहे, तसेच बिगरहिंदी राज्यांमध्ये प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हिंदी भाषिकांची ही लुडबूड येथेच संपत नाही. मुंबई महापालिकेचे सभागृह व प्रशासन यांमध्ये हिंदी भाषा हे माध्यम असावे, अशी त्यांची मागणी असते. मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी आता पुढे आली, तर त्यात हिंदी भाषिकांचाच पुढाकार राहील, हे ओळखले पाहिजे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाचा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. कोणा बिहारीने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला आईवरून शिवी दिली तर कानफटात मारली जाईल, असा इशारा या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रसंगी दिला. दूरचित्रवाहिन्यांवर हे वृत्त लगेच झळकले. त्यावर लालू प्रसाद यादव, नितीश कुमार आदी प्रमुख बिहारी नेत्यांनी तत्काळ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वीस वर्षांपूवीर् खलिस्तान चळवळ जोरात असताना पंजाबात शेतमजूर म्हणून गेलेल्या बिहारी लोकांपैकी शेकडो जणांची शीख अतिरेक्यांनी हत्या केली. अलीकडेच आसामात उपजीविकेसाठी गेलेल्या बिहारींची उल्फा दहशतवाद्यांनी कत्तल केली. त्यावर बिहारी नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आताएवढ्या कडक नव्हत्या, हे लक्षात घेतले पाहिजे.

या बाबीच्या नेमके उलट काही दिवसांपूवीर् घडले होते. ख्यातनाम अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांची एका दूरचित्रवाहिनीवर मुलाखत चालू होती. उत्तर भारतीयांना मुंबईत सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, अशी खंत मुलाखत घेणाऱ्याने व्यक्त केली. त्यावर, अशी वागणूक मिळत नसेल तर संबंधितांनी आपल्या राज्यात निघून जावे, असे हेमामालिनी म्हणाल्या. त्यावर एवढा गहजब झाला की खासदारबाईंना घुमजाव करणे भाग पडले.

या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकभाषिक राज्यात भाषिक अल्पसंख्याकांंचे स्थान काय हा खरा प्रश्ान् आहे. पन्नास वर्षांपूवीर् राज्य पुनर्रचना झाली ती दोन अपवाद वगळता एकभाषिक राज्यरचना होती. थोड्याच वर्षांनी त्या अपवादांचीही एकभाषिक राज्ये झाली. राज्य पुनर्रचना आयोगाने यासंबंधात इशारा देऊन ठेवला होता. एकभाषिक राज्यांमध्ये तेथील मुख्य भाषेच्या लोकांनी ते राज्य आपल्याच मालकीचे आहे असे समजता कामा नये आणि असे राज्य हे उपराष्ट्र आहे, असा त्यांचा गैरसमज होता कामा नये, असे त्या अहवालात म्हटले होते. तथापि, आयोगाची ती भीती खरी ठरली असे प्रत्यक्षात घडले. बिगरहिंदी राज्यांमधील भाषिक अल्पसंख्याक हे तेथे दुय्यम दर्जाचे नागरिक ठरले.

भारतात हिंदी भाषिकांची नऊ राज्ये असून बाकीची एकभाषिक आहेत. त्या बिगरहिंदी राज्यांतील मुख्य भाषा ही तेथे कायद्याने अधिकृत भाषा करण्यात आली आणि त्या भाषिकांना ते राज्य फक्त आपलेच आहे असे वाटते. राष्ट्रगीतासारखे तेथे राज्यगीत असते. (उदा. महाराष्ट्रगीत). सभा संपताना 'जय हिंद'बरोबर 'जय महाराष्ट्र' असाही घोष होतो. राष्ट्रदोहीप्रमाणे 'महाराष्ट्रदोही' असाही वाक्प्रचार वापरात असतो. बहुतेक सर्व बिगरहिंदी राज्यांमध्ये असे आढळते. अशा प्रकारे बिगरहिंदी राज्ये प्रत्यक्षात उपराष्ट्रे बनल्यामुळे त्यांचे विभाजन म्हणजे राष्ट्र तोडण्याचाच प्रकार आहे, असे संबंधित भाषिकांना वाटते. ही बाब हिंदी राज्यांना लागू नाही. त्यामुळे उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड ही नवी हिंदी राज्ये निर्माण होऊ शकली. परंतु तेलंगण, विदर्भ आदी राज्ये स्थापन करायची तर 'उपराष्ट्रे' मोडावी लागतात. साहजिक त्या मागण्या मान्य करणे कठीण होते. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंदात सत्तेवर असताना तीन नवी हिंदी राज्ये निर्माण झाली. त्यानंतर त्यावेळचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी नागपूरला आले असताना, महाराष्ट्र विधानसभेने तसा ठराव केला तर आम्ही विदर्भाचे वेगळे राज्य देऊ असे ते म्हणाले. त्याला तीव्र आक्षेप घेणारे पत्र तेव्हाचे विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लिहिले. त्यामध्ये 'उपराष्ट्र' ही बाब त्यांच्या नजरेला आणून दिली आणि अडवाणींचे वक्तव्य हा शुद्ध आगलावेपणा आहे असे ठासून नमूद केले. त्यानंतर आणखी नवी राज्ये स्थापन करण्याचा आपल्यापुढे प्रस्ताव नाही असे सरकारने सांगून टाकले.

हिंदी राज्ये उपराष्ट्रे नसल्यामुळे त्या भाषिकांना या बाबीची जाणीवच नसते. ते जेव्हा बिगरहिंदी राज्यात जातात तेव्हा तेथील भाषा शिकण्याची आपणाला गरज आहे, असे त्यांना वाटत नाही. त्या राज्यातील लोक राष्ट्रभाषा म्हणून हिंदी शिकलेलेच असतात. मग आपणाला त्यांची भाषा शिकण्याची गरजच काय, असे त्या हिंदी भाषिकांना वाटते. राज्यघटनेनुसार देशात कोठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे. एवढ्यावरच ही हिंदी मंडळी थांबत नाहीत. त्यांना बिगरहिंदी राज्यांच्या राजकारणात भाग घ्यायचा असतो. भारताच्या राजकारणात हिंदी भाषिकांचे प्राबल्य आहे, तसेच बिगरहिंदी राज्यांमध्ये प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस व भाजप त्यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मराठी इच्छुकांच्या अनेक पटींनी हिंदी भाषिक होते. यावेळी प्रथमच राणे फॅक्टरमुळे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास कामत यांनी मनावर घेतल्यामुळे अधिक मराठी इच्छुकांना त्या पक्षाची तिकिटे देण्यात आली. त्यामुळे हिंदी भाषिक इच्छुकांना झुकते माप मिळाले नाही. हेमामालिनीना तसा प्रश्ान् विचारला जाण्यामागे हेच कारण होते.

हिंदी भाषिकांची ही लुडबूड येथेच संपत नाही. मुंबई महापालिकेचे सभागृह व प्रशासन यांमध्ये हिंदी भाषा हे माध्यम असावे, अशी त्यांची मागणी असते. या आगाऊपणाबद्दल प्रथम कानफटीत मारणे गरजेचे आहे. आंध्रप्रदेश राज्य तोडण्याचे पाप आपल्या माथी नको म्हणून दुसरा राज्य पुनर्रचना आयोग नेमा, असे काँग्रेसने केंद सरकारला सांगितले आहे. असा पहिला आयोग स्थापन झाला तेव्हा म्हणजे ५३ वर्षांपूवीर् मुंबई महानगराचे वेगळे राज्य स्थापन व्हावे अशी मागणी येथील जवळजवळ सर्व बिगरमराठी लोकांनी केली होती. ही मंडळी पुन्हा उचल खाणार यात शंका नाही. त्यावेळी या संबंधात गुजराती मंडळींकडे याचे नेतृत्व होते, आता ते हिंदी भाषिकांकडे राहील, हे वेगळे सांगायला नको. या संकटाला तोंड देण्यासाठी एखाद्या ताकदवान पक्षाने/नेत्याने मनावर घेऊन आतापासून तयारीत असणे गरजेचे आहे.

मुंबईत मराठी लोक आथिर्कदृष्ट्या दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, असे बिगरमराठी मंडळी गृहीत धरतात. महापालिकेच्या नियमाप्रमाणे पाट्या मराठीत लावायला हे लोक तयार नाहीत. मराठी लोकांबाबत आता वस्तुस्थिती बरीच बदलली आहे. राज ठाकरे व मनोहर जोशी यांनी संयुक्तपणे कोहिनूर गिरणीची जागा शेकडो कोटी रुपयांना खरेदी केली, एवढीच ती मर्यादित नाही. मुंबईतील सर्वात मोठ्या मॉलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांमध्ये मराठी लोकच सर्वात जास्त असतात, असे सवेर्क्षणात आढळून आले. दरडोई किमान पाच हजार रुपये घेऊन केवळ एक दिवसाची सागर सफर घडविणाऱ्या स्टार क्रूझमध्ये मराठी मंडळी सर्वात मोठ्या संख्येने असतात. आपण आथिर्कदृष्ट्या दुय्यम नागरिक आहोत, असा न्यूनगंड मराठी लोकांनी बाळगण्याचे कारण नाही, असा याचा अर्थ.

याबरोबरच आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत येणारे लोंढे रोखण्याची. राज्यघटनेनुसार कोणाही नागरिकाला देशात कोठेही स्थायिक होण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक हितासाठी त्यावर बंधन घालणारा कायदा सरकार करू शकेल, असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशासाठी असा कायदा करून या लोंढ्यांना प्रतिबंध केला पाहिजे. मुंबई महापालिकेने असा ठराव केला तरच त्यासाठी राज्य सरकारला बळ प्राप्त होईल. मनसेने यासंबंधात पुढाकार घ्यायला हवा. त्यानंतर तसा ठराव झाला नाही, तर इतर पक्षांचे पितळ उघडे पडेल. राज ठाकरे यांनी यथायोग्य पावले टाकून या बाबी तडीस नेल्या नाहीत, तर बिहारींच्या कानफटात लगावण्याऐवजी आपल्याच श्रीमुखात भडकावून घेण्याची कालांतराने त्यांच्यावर पाळी येईल.
Click here to read this article on Maharashtratimes.com

No comments:

Post a Comment