Showing posts with label Obituary. Show all posts
Showing posts with label Obituary. Show all posts

Sunday, November 18, 2012

जन पळभर म्हणतील..


गोठोस्कारांनी ‘नवशक्ती’ दैनिकात अनेक वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम केले. तथापि त्याबाबत ते फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्याचा विषय महाराष्ट्र आणि त्याचे राजकारण हाच असे. ज्या प्रमाणात त्यांच्याकडे माहिती असायची, त्या प्रमाणात त्यांनी लिखाण केले असते तर फार बरे झाले असते. कारण त्यातून एखादा अस्सल दस्तऐवज आकारास येऊ शकला असता. अकोला करार, नागपूर करार, सीमाप्रश्न, काँग्रेस पक्षातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील घडामोडी आणि विविध नेत्यांची गुणवैशिष्टय़े हे विषय त्यांना अधिक आवडत. मात्र साखर कारखानदारी म्हटले की, ज्या आवेशाने गोठोस्कर बोलू लागत, तो पाहण्यासारखा असे.
शांताराम मंगेश गोठोस्कर यांच्या निधनाची बातमी एक-दोन दैनिकांनी छापली खरी; परंतु वाचकांना ती वाचून फारसा बोध झाला असण्याची शक्यता नाही. गोठोस्कर एक पत्रकार होते, असाच त्याचा समज झाला असेल. गोठोस्कर पत्रकार होतेच, परंतु रूढार्थाने नव्हे. त्यांना स्वतंत्र प्रज्ञा होती. आपली म्हणता येईल अशी भूमिका होती. आणि व्यासंग करायची अखेपर्यंत तयारी होती. म्हणूनच गोठोस्करांच्या जाण्याची दखल योग्य प्रकारे घेण्यात माध्यमे कमी पडली हे मान्य करायला हवे.
गोठोस्कारांनी ‘नवशक्ती’ दैनिकात अनेक वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम केले. तथापि त्याबाबत ते फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्याचा विषय महाराष्ट्र आणि त्याचे राजकारण हाच असे. ज्या प्रमाणात त्यांच्याकडे माहिती असायची, त्या प्रमाणात त्यांनी लिखाण केले असते तर फार बरे झाले असते. कारण त्यातून एखादा अस्सल दस्तऐवज आकारास येऊ शकला असता. अकोला करार, नागपूर करार, सीमाप्रश्न, काँग्रेस पक्षातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील घडामोडी आणि विविध नेत्यांची गुणवैशिष्टय़े हे विषय त्यांना अधिक आवडत. मात्र साखर कारखानदारी म्हटले की, ज्या आवेशाने गोठोस्कर बोलू लागत, तो पाहण्यासारखा असे. आपले म्हणणे आकडेवारीसह गोठोस्कर इतके मुद्देसूद मांडत की, त्याचा प्रतिवाद करणे अनेक सहकार सम्राटांना अशक्यप्राय होत असे. सहकारी साखर कारखानदारीने कसे बाळसे धरले, तिचा किती वेगाने विस्तार झाला, या चळवळीत अपप्रवृत्तींचा शिरकाव कसा झाला आणि ही चळवळ निरोगी करण्याची उपाययोजना अशा मुद्यांवर गोठोस्कर अधिकारवाणीने बोलत असत. त्यांचे विवेचन ऐकले की, आपल्या विद्वत्तेचा अहंकार किती पोकळ आहे, याची विदारक जाणीव होत असे.
माझ्या पिढीने पत्रकारितेत प्रवेश केला तेव्हा श्यामराव देशपांडे, भालचंद्र मराठे, विनायक तिवारी, जगन फडणीस, सीताराम कोलपे, दि. बा. खाडे, वसंतराव देशपांडे, बाळ देशपांडे, अरूण साधू आदि ज्येष्ठ वार्ताहर कसे काम करतात, हे पाहून आपोआप प्रशिक्षण झाले. त्या काळातील राजकीय संस्कृतीही भिन्न होती. राजकारणी आणि माध्यमांचे काम परस्परपूरक असे. त्यांच्यात आज दिसणारे द्वैत नव्हते. विशेष म्हणजे, सत्य हे मूल्य ब-याच अंशी शाबूत होते. छापील शब्दांचा दबदबा होता. कोणाच्याही दावणीला बांधून घेणे अपमानास्पद समजण्यात येत असे. शिक्षक जसा गरीब असे तसाच पत्रकारही मध्यमवर्गीय असे. डामडौल, छानछौकी सर्वसाधारण पत्रकाराला परवडत नसे. संपादक बस अथवा लोकलने प्रवास करीत. माधवराव गडकरी यांना ‘मारुती गाडी’ भेट मिळाली तेव्हा तो बातमीचा विषय झाला होता. कालांतराने सगळेच बदलत गेले. मात्र सच्चे पत्रकार होते तसेच राहिले. गोठोस्कर श्रमिक पत्रकार नसले तरी त्यांनीही सत्य अन्वेषण, हेच उद्दिष्ट समोर ठेवून लिखाण केले.
अर्थात गोठोस्करांचेही प्रेमाचे आणि रागाचे विषय होते. मुंबईतील एका अग्रगण्य सहकारी बँकेविरुद्ध त्यांनी चालविलेली मोहीम अत्यंत वादग्रस्त ठरली. हेत्वारोपांचे वादळ उठले. काही काळानंतर ते शमलेसुद्धा. तथापि, अभ्यास करून अद्ययावत माहितीच्या आधारे लिखाण करण्याचे त्यांचे व्रत चालूच राहिले. सतत वाचन करणे हा पत्रकारासाठी पहिला धडा असतो. तो गोठोस्करांनी आयुष्यभर गिरवला. ‘नामूलं लिख्यते क्वचित’ हा बाणा त्यांनी जन्मभर जपला. त्यासाठी द्यावी लागणारी किंमतही मोजली. परंतु माघार घेतली नाही आणि त्याबद्दलची वाच्यताही केली नाही. वर्तमानपत्र सकाळी वाचकाच्या हाती पडते तेव्हा अनेकांचे श्रम त्यामागे असतात. संपादकीय पानावरील लिखाण हा त्याचा आत्मा असतो. त्यावरून त्याचा दर्जा लक्षात येतो. मात्र हे पान सजवणारा उपसंपादक किंवा सहसंपादक सामान्यपणे अप्रसिद्ध राहतो. अशा पत्रकारांना गोठोस्करांचा लेख हाती आला की, हायसे वाटत असे कारण शुद्ध भाषा आणि अचूक माहिती यांची ती जणू हमी असे.
गोठोस्करांबरोबर काम करण्याची संधी गतवर्षी विधिमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्मृतिग्रंथ सिद्ध करताना मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण संपादित करण्याची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. बाबासाहेबांसारख्या ज्ञानसूर्याचे भाषण वाचतानाच आपल्यावर दडपण येते. हे संपूर्ण भाषण वाचून त्याचा आटोपशीर मर्यादित अंश ग्रंथात समाविष्ट करताना त्याच्या मूळ वस्तुला तशाच स्वरूपात सादर करण्याचे आव्हान संपादक मंडळासमोर होते. मात्र हे काम गोठोस्करांनी स्वीकारल्यानंतर त्याबद्दलची निश्चिंती सर्वानाच वाटून गेली. अवघे पाऊणशे वयमान असलेले गोठोस्कर आणि त्यांचे समवयस्क वसंतराव देशपांडे यांनी या ग्रंथासाठी घेतलेले कष्ट अवर्णनीय म्हणावे लागतील.
आजचे वर्तमानपत्रीय लेखन वाचताना गोठोस्करांची आणि त्यांच्या पिढीतील पत्रकारांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पत्रकारितेला विविध रूपे असतात. मात्र समाज आणि राज्य यांचे हितरक्षण करणे, हे पत्रकारितेचे मूलभूत कर्तव्य पार पडले तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेण्याचा अधिकार पत्रकारितेला प्राप्त होतो. सत्याची चाड आणि आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा राखणे हे पत्रकारितेचे मानबिंदू आहेत. त्यांचे जतन होईल तेव्हाच लोकजीवन निरोगी होईल. एखादा अधिकारी किंवा राजकीय नेता आपल्या लिखाणामुळे नेस्तनाबूत करणे हे पत्रकारितेचे इतिकर्तव्य मानता येणार नाही. गोठोस्कर आणि त्यांच्या पिढीने या संकेताचे निष्ठेने पालन केले, याची नोंद होणे आवश्यक आहे. ते दुर्दैवाने न घडल्यास ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय,’ अशी अवस्था होणे क्रमप्राप्त आहे.

Please click here to read this article on Prahaar.in

Saturday, November 17, 2012

शां. मं. गोठोस्कर

शांताराम मंगेश गोठोस्कर हे स्वतः प्रकट न होणारे पण प्रकाशात येणारी असंख्य माणसे घटना तर्क आणि युक्तिवादांमागची कर्तुम-अकर्तुम शक्ती असत. तसे ते मुळात पत्रकार. नवशक्ति या दैनिकात प्रदीर्घ कारकीर्द केलेले. पण ही त्यांची ओळख फारच अपुरी ठरेल. याचे कारण महाराष्ट्राचे राजकारण व त्याच्या अनुषंगाने येणारा सहकारक्षेत्राचा प्रचंड डोलारा समाजकारण आणि त्याला विळखा घालून बसलेली जातिव्यवस्था आधुनिक अर्थकारण आणि त्याच्या मांडीवरच जाऊन विसावलेला कॉर्पोरेट भ्रष्टाचार संस्कृतिकरण आणि त्यात घुसणारा प्रांतवाद तसेच जातिविचार... अशा साऱ्यांमध्ये गोठोस्करांना आमूलाग्र रस असे. शिवाय हा रस केवळ तत्त्ववैचारिक किंवा विद्यापीठीय नसे. ते स्वतः या घुसळणीतील खेळाडू होते. खरेतर या लालमातीत ताकदीने शड्डू ठोकणारे पैलवानच होते. पण त्यांचे प्रत्यक्ष रूप दर्शन आणि बोलणे याच्या विपरीत होते. सौम्य बोलणारे ,हलकेच हसून आपला मुद्दा पटविणारे महाराष्ट्रासंबंधीच्या असंख्य पण विश्वासार्ह नेमक्या आकडेवाऱ्यांनी दीपवून टाकणारे एखाद्याचा एखाद्या विषयात अधिकार आहे असे पटल्यास त्याला विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून शंका विचारणारे... असे गोठोस्कर होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केवळ चालता-बोलता ज्ञानकोश नव्हे तर 'व्यवहारकोश हरपला आहे! गोठोस्करांनी असंख्य राजकीय नेते सहकारातील पुढारी अॅग्रो-उद्योजक पत्रकार-संपादक आणि कारखानदारांना व्यावहारिक सल्ले व धडे दिले. हे धडे देताना त्यांचे कायदे-नियमांचे ज्ञान ,अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे भान सरकारी पातळीवरच्या घडामोडींची जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची तहान हे सारे पणाला लागे. यामुळे ते कधी कोणत्या प्रकल्पावर काम करत असतील याचा नेम नसे. कधी ते मराठी- 'इटालियन उत्तम भाषांतर करणारा विश्वासाचा माणूस आहे का अशी विचारणा करीत तर कधी एखाद्या आडनावाचा कीस पाडून त्याची जात-पोटजात-प्रांत शोधून काढत. मतदारसंघांची फेररचना झाली तेव्हा गोठोस्करांनी दिलेले अहवाल केलेली कामे थक्क करणारी होती. एखाद्या तरुण पत्रकाराची त्यांच्याशी ओळख होणेयासारखा बोनस नसे. कारण एखादा विषय व बातमीकडे पाहण्याची नजरच ते बदलून टाकत. कितीतरी दुर्लक्षित आयाम सहज लक्षात आणून देत. ठोस बातम्यांचा त्यांच्याकडे इतका खजिना असे की ते बोलता बोलता अनेक बायलाइन्स देऊ शकत. गोठोस्करांसारखी चतुरस्र माणसे भारतासारख्या गुंतागुंतीच्या अवाढव्य लोकशाहीत वंगणासारखी असतात. अनेक संभाव्य कटकटी संघर्ष किंवा कटुता ते आपल्या बुद्धिचातुर्याने टाळतात.रिजिड सिस्टम मधून उत्तरे शोधून देतात. असे योगदान देणाऱ्यांकडे निर्मळ दृष्टीने पाहण्याइतकी आपली लोकशाही अजून प्रगत झालेली नाही. तशी ती होईल तेव्हा गोठोस्करांचे नाव पुन्हा एकदा आदराने स्मरावे लागेल.

Please click here to read this article on Maharashtra Times website.

Wednesday, November 14, 2012

शांताराम गोठोस्कर यांचे निधन


ज्येष्ठ अर्थविश्लेषक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते त्यांच्यापश्चात पत्नी अपर्णा मुलगा भरत मुलगी प्राजक्ता सून जावई असा परिवार आहे दादर शिवाजी पार्कविद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले 


मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने गोठोस्कर यांना मागील महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखलकरण्यात आले होते गेली २५ दिवस ते कोमातच होते चर्नी रोड येथील मोतीबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधनझाले सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून आले होते राज्य सरकारच्याराज्य वित्त महामंडळावर ते संचालक होते सहकार अर्थ तसेच अन्य विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते .

Tuesday, November 13, 2012

'सुरस आणि चमत्कारिक.. '


शां. मं. गोठोस्कर हे एक विलक्षण रसायन होते. मूळचे पत्रकार. अगदी महाराष्ट्राच्या जन्माचे साक्षीदार. पु. रा. बेहेरे आदींचा सहवास लाभल्याने मूळचीच विचक्षण असलेली नजर अधिक सजग झालेली. साहजिकच राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार होते. त्यांना ज्याची अंडीपिल्ली माहीत नाहीत, असा महाराष्ट्राचा एक राजकारणी नसेल.  पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावरही साखर संघ वगैरेंत ते सक्रिय कार्यमग्न होते. त्यामुळे राजकारण आणि सहकारी साखर कारखानदारीचे त्यांचे ज्ञान शब्दश: प्रचंड होते. या सगळय़ाच्या जोडीला आपल्याला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगावे ही वृत्ती. त्यामुळे गोठोस्कर हे वर्तमानपत्रीय जगाचे आधारस्तंभ होते. राज्याचा संदर्भ हवा आहे आणि तो त्यांच्याकडे नाही असे क्वचितच झाले असेल. गोठोस्कर जवळपास दररोज वीस वर्तमानपत्रे वाचत आणि अर्धा डझनभर साप्ताहिके, मासिके त्यांच्या नजरेखालून जात. त्यांचे ज्यांच्याशी जवळचे संबंध होते त्यांना गोठोस्कर यांचा दररोज न चुकता एक फोन असायचा म्हणजे असायचाच. आपण जे काही वाचले त्यातले बरोबर काय, असत्य वा चूक ते काय आणि तुम्ही त्यावर काही लिहिणार असलातच तर त्यात काय असायला हवे, असा सल्ला गोठोस्करांनी दिला नाही असे घडले नाही. हे सर्व सकारात्मकच असेल असे नाही. वय आणि अनुभवाच्या आधारे आलेल्या ज्येष्ठतेचा ते प्रसंगी कान उपटण्यासाठीही वापर करीत. अहो.. हे तुम्ही काय लिहून ठेवलेत.. या वाक्याने त्यांचा फोन सुरू झाला की पुढील दोन-पाच मिनिटे आपणास श्रवणभक्ती करायची आहे याची खूणगाठ बांधली जाई. कामाच्या गडबडीत त्यांचा फोन घेता आलाच नाही तर ते एसएमएस करीत. 'अमुक नियतकालिकातील तमुक लेख.. न जमल्यास अमुक परिच्छेद.. न वाचल्यास तो दखलपात्र गुन्हा समजला जाईल, याची नोंद घ्यावी' असा दम देणारा मजकूर त्या एसएमएसमध्ये असे. गोठोस्कर यांचे वैशिष्टय़ हे की ते दुसऱ्या दिवशी पुन्हा कालचे ते वाचलेत का, असे विचारण्यास विसरत नसत. गोठोस्करांनी सांगितले आणि वाचले नाही, असे करण्यास कोणीही धजावत असेल असे वाटत नाही. वयाच्या या टप्प्यावरही गोठोस्कर प्रचंड उत्साही होते. 'लोकसत्ता'चे ते नियमित लेखक. 'लोकसत्ता'चे कार्यालय ही त्यांची क्षणभर विश्रांती होते. हक्काने येत. गोठोस्कर आले की हातातले काम बाजूला ठेवण्यास गत्यंतर नसे. आपल्या अत्यंत मिश्कील शैलीत, 'समजलं का..' असे म्हणून ते काही सांगायला सुरुवात करीत. ते ऐकणे हे कर्तव्य असायचे. हवी ती आकडेवारी त्यांना मुखोद्गत असायची. आकडय़ांची तुलना करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे एखाद्या कंपनीस इतका फायदा झाला असे त्यांच्यासमोर म्हटले गेले की.. म्हणजे अमुक राज्याच्या ठोकळ उत्पादनाइतका.. वगैरे तपशील ते झटक्यात सांगत. त्यामुळे महाराष्ट्रावर लिहू इच्छिणाऱ्यांना एक वेगळीच दृष्टी मिळे. हे माहितीज्ञानामृत पाजून झाले की गोठोस्कर संबंधित विषयातील काही मनोरंजक- आणि बरीचशी खासगी माहिती सांगत. 'आता तुम्हाला काही सुरस आणि चमत्कारिक सांगतो..' अशी सुरुवात करून गोठोस्कर एखाद्या व्यक्तीचा आश्चर्यकारक असा तपशील देत. हे सारे रंगवून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. गोठोस्कर, हे सगळे तुम्ही लिहून ठेवायला हवे.. तुम्ही म्हणजे राज्याचा चालताबोलता इतिहास आहात.. असे आमच्याकडून त्यांना वारंवार सांगितले गेले. 'लिहिणार तर..' असे त्यांचे उत्तर असे. त्यांच्या निधनाने आता ते सगळेच हवेत विरले. महाराष्ट्राचा सुरस आणि चमत्कारिक इतिहास सांगणारी अधिकारी व्यक्ती आपल्यातून कायमची गेली.

ज्येष्ठ अर्थविश्लेषक शां. मं. गोठोस्कर यांचे निधन


ज्येष्ठ अर्थविश्लेषक व स्तंभलेखक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे सोमवारी सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अपर्णा, मुलगा भरत, मुलगी प्राजक्ता पांढरे, सून, जावई व दोन नाती असा परिवार आहे. दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडीत झाल्यानंतर शां. मं. गोठोस्कर यांना १८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ दिवसांपासून ते कोमातच होते. अखेर आज सकाळी ८.४५ वाजता चर्नी रोड येथील मोतीबेन दळवी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य वित्त महामंडळावरही (महावित्त) ते संचालक म्हणून होते.

सहकार, आर्थिक तसेच अनेक राजकीय घडामोडींवरील त्यांचे लेखन 'लोकसत्ता'सह विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम मुंबई - बंगळुरु दरम्यान 'ब्रॉडगेज' रेल्वेमार्गाची कल्पना मांडली होती. तिहारी धरण बांधकामाच्या वेळी दाखविलेल्या प्रत्यक्ष सहभागामुळे सुमारे १० हजार लोकांचे विस्थापन रोखले गेले.


Please click here to read this article on Loksatta.com

शां.मं.गोठोस्कर यांचे निधन

pg1-1
मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) - ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक `नवशक्ति’चे माजी सहसंपादक शां. मं. गोठोस्कर यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र आणि कन्या असा परिवार आहे. दैनिक `नवशक्ति’त ते सुरुवातीला काही काळ वृत्तसंपादक आणि नंतर सहसंपादक होते. तत्पूर्वी एस. एम. जोशी यांच्या `लोकमित्र’ आणि पा. वा. गाडगीळ यांच्या `लोकमान्य’ या दैनिकांमध्ये काही काळ त्यांनी काम केले.  वीज प्रश्न, कोकण रेल्वेचे प्रश्न यावर  1958 पासून त्यांनी दीर्घकाळ लेखन केले. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचा पहिला लेख `लोकसत्ता’ या दैनिकात छापून आला होता. 2012 पर्यंत त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये सक्रिय राहून चिकित्सक लेखन केले. त्यांचे बालपण सावंतवाडीतील बांदा येथे गेले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. महाराष्ट्र शुगर असोसिएशनशी आणि विधिमंडळाच्या कामकाजाशी त्यांचा प्रदीर्घकाळ संबंध होता. काही वर्षे ते सारस्वत बँकेच्या संचालक मंडळावरही होते. राज्य वित्तीय मंडळावरही ते पाच वर्षे संचालक होते. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले.

शां. म. गोठोसकर यांचे निधन


ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य शां. म. गोठोसकर यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हृदयविकारामुळे त्यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोठोसकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून विविध विषयांवर लिखाण केले आहे. ]राजकीय व आर्थिक विश्लेषण या विषयांत त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सारस्वत बँकेच्या संचालक मंडळावरही काही काळ काम केले होते. राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू, जाणकर पत्रकार हरपला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


Please click here to read this article on Lokmat Website