Tuesday, November 13, 2012

'सुरस आणि चमत्कारिक.. '


शां. मं. गोठोस्कर हे एक विलक्षण रसायन होते. मूळचे पत्रकार. अगदी महाराष्ट्राच्या जन्माचे साक्षीदार. पु. रा. बेहेरे आदींचा सहवास लाभल्याने मूळचीच विचक्षण असलेली नजर अधिक सजग झालेली. साहजिकच राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार होते. त्यांना ज्याची अंडीपिल्ली माहीत नाहीत, असा महाराष्ट्राचा एक राजकारणी नसेल.  पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावरही साखर संघ वगैरेंत ते सक्रिय कार्यमग्न होते. त्यामुळे राजकारण आणि सहकारी साखर कारखानदारीचे त्यांचे ज्ञान शब्दश: प्रचंड होते. या सगळय़ाच्या जोडीला आपल्याला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगावे ही वृत्ती. त्यामुळे गोठोस्कर हे वर्तमानपत्रीय जगाचे आधारस्तंभ होते. राज्याचा संदर्भ हवा आहे आणि तो त्यांच्याकडे नाही असे क्वचितच झाले असेल. गोठोस्कर जवळपास दररोज वीस वर्तमानपत्रे वाचत आणि अर्धा डझनभर साप्ताहिके, मासिके त्यांच्या नजरेखालून जात. त्यांचे ज्यांच्याशी जवळचे संबंध होते त्यांना गोठोस्कर यांचा दररोज न चुकता एक फोन असायचा म्हणजे असायचाच. आपण जे काही वाचले त्यातले बरोबर काय, असत्य वा चूक ते काय आणि तुम्ही त्यावर काही लिहिणार असलातच तर त्यात काय असायला हवे, असा सल्ला गोठोस्करांनी दिला नाही असे घडले नाही. हे सर्व सकारात्मकच असेल असे नाही. वय आणि अनुभवाच्या आधारे आलेल्या ज्येष्ठतेचा ते प्रसंगी कान उपटण्यासाठीही वापर करीत. अहो.. हे तुम्ही काय लिहून ठेवलेत.. या वाक्याने त्यांचा फोन सुरू झाला की पुढील दोन-पाच मिनिटे आपणास श्रवणभक्ती करायची आहे याची खूणगाठ बांधली जाई. कामाच्या गडबडीत त्यांचा फोन घेता आलाच नाही तर ते एसएमएस करीत. 'अमुक नियतकालिकातील तमुक लेख.. न जमल्यास अमुक परिच्छेद.. न वाचल्यास तो दखलपात्र गुन्हा समजला जाईल, याची नोंद घ्यावी' असा दम देणारा मजकूर त्या एसएमएसमध्ये असे. गोठोस्कर यांचे वैशिष्टय़ हे की ते दुसऱ्या दिवशी पुन्हा कालचे ते वाचलेत का, असे विचारण्यास विसरत नसत. गोठोस्करांनी सांगितले आणि वाचले नाही, असे करण्यास कोणीही धजावत असेल असे वाटत नाही. वयाच्या या टप्प्यावरही गोठोस्कर प्रचंड उत्साही होते. 'लोकसत्ता'चे ते नियमित लेखक. 'लोकसत्ता'चे कार्यालय ही त्यांची क्षणभर विश्रांती होते. हक्काने येत. गोठोस्कर आले की हातातले काम बाजूला ठेवण्यास गत्यंतर नसे. आपल्या अत्यंत मिश्कील शैलीत, 'समजलं का..' असे म्हणून ते काही सांगायला सुरुवात करीत. ते ऐकणे हे कर्तव्य असायचे. हवी ती आकडेवारी त्यांना मुखोद्गत असायची. आकडय़ांची तुलना करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे एखाद्या कंपनीस इतका फायदा झाला असे त्यांच्यासमोर म्हटले गेले की.. म्हणजे अमुक राज्याच्या ठोकळ उत्पादनाइतका.. वगैरे तपशील ते झटक्यात सांगत. त्यामुळे महाराष्ट्रावर लिहू इच्छिणाऱ्यांना एक वेगळीच दृष्टी मिळे. हे माहितीज्ञानामृत पाजून झाले की गोठोस्कर संबंधित विषयातील काही मनोरंजक- आणि बरीचशी खासगी माहिती सांगत. 'आता तुम्हाला काही सुरस आणि चमत्कारिक सांगतो..' अशी सुरुवात करून गोठोस्कर एखाद्या व्यक्तीचा आश्चर्यकारक असा तपशील देत. हे सारे रंगवून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. गोठोस्कर, हे सगळे तुम्ही लिहून ठेवायला हवे.. तुम्ही म्हणजे राज्याचा चालताबोलता इतिहास आहात.. असे आमच्याकडून त्यांना वारंवार सांगितले गेले. 'लिहिणार तर..' असे त्यांचे उत्तर असे. त्यांच्या निधनाने आता ते सगळेच हवेत विरले. महाराष्ट्राचा सुरस आणि चमत्कारिक इतिहास सांगणारी अधिकारी व्यक्ती आपल्यातून कायमची गेली.

No comments:

Post a Comment