Sunday, November 18, 2012

जन पळभर म्हणतील..


गोठोस्कारांनी ‘नवशक्ती’ दैनिकात अनेक वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम केले. तथापि त्याबाबत ते फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्याचा विषय महाराष्ट्र आणि त्याचे राजकारण हाच असे. ज्या प्रमाणात त्यांच्याकडे माहिती असायची, त्या प्रमाणात त्यांनी लिखाण केले असते तर फार बरे झाले असते. कारण त्यातून एखादा अस्सल दस्तऐवज आकारास येऊ शकला असता. अकोला करार, नागपूर करार, सीमाप्रश्न, काँग्रेस पक्षातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील घडामोडी आणि विविध नेत्यांची गुणवैशिष्टय़े हे विषय त्यांना अधिक आवडत. मात्र साखर कारखानदारी म्हटले की, ज्या आवेशाने गोठोस्कर बोलू लागत, तो पाहण्यासारखा असे.
शांताराम मंगेश गोठोस्कर यांच्या निधनाची बातमी एक-दोन दैनिकांनी छापली खरी; परंतु वाचकांना ती वाचून फारसा बोध झाला असण्याची शक्यता नाही. गोठोस्कर एक पत्रकार होते, असाच त्याचा समज झाला असेल. गोठोस्कर पत्रकार होतेच, परंतु रूढार्थाने नव्हे. त्यांना स्वतंत्र प्रज्ञा होती. आपली म्हणता येईल अशी भूमिका होती. आणि व्यासंग करायची अखेपर्यंत तयारी होती. म्हणूनच गोठोस्करांच्या जाण्याची दखल योग्य प्रकारे घेण्यात माध्यमे कमी पडली हे मान्य करायला हवे.
गोठोस्कारांनी ‘नवशक्ती’ दैनिकात अनेक वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम केले. तथापि त्याबाबत ते फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्याचा विषय महाराष्ट्र आणि त्याचे राजकारण हाच असे. ज्या प्रमाणात त्यांच्याकडे माहिती असायची, त्या प्रमाणात त्यांनी लिखाण केले असते तर फार बरे झाले असते. कारण त्यातून एखादा अस्सल दस्तऐवज आकारास येऊ शकला असता. अकोला करार, नागपूर करार, सीमाप्रश्न, काँग्रेस पक्षातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळातील घडामोडी आणि विविध नेत्यांची गुणवैशिष्टय़े हे विषय त्यांना अधिक आवडत. मात्र साखर कारखानदारी म्हटले की, ज्या आवेशाने गोठोस्कर बोलू लागत, तो पाहण्यासारखा असे. आपले म्हणणे आकडेवारीसह गोठोस्कर इतके मुद्देसूद मांडत की, त्याचा प्रतिवाद करणे अनेक सहकार सम्राटांना अशक्यप्राय होत असे. सहकारी साखर कारखानदारीने कसे बाळसे धरले, तिचा किती वेगाने विस्तार झाला, या चळवळीत अपप्रवृत्तींचा शिरकाव कसा झाला आणि ही चळवळ निरोगी करण्याची उपाययोजना अशा मुद्यांवर गोठोस्कर अधिकारवाणीने बोलत असत. त्यांचे विवेचन ऐकले की, आपल्या विद्वत्तेचा अहंकार किती पोकळ आहे, याची विदारक जाणीव होत असे.
माझ्या पिढीने पत्रकारितेत प्रवेश केला तेव्हा श्यामराव देशपांडे, भालचंद्र मराठे, विनायक तिवारी, जगन फडणीस, सीताराम कोलपे, दि. बा. खाडे, वसंतराव देशपांडे, बाळ देशपांडे, अरूण साधू आदि ज्येष्ठ वार्ताहर कसे काम करतात, हे पाहून आपोआप प्रशिक्षण झाले. त्या काळातील राजकीय संस्कृतीही भिन्न होती. राजकारणी आणि माध्यमांचे काम परस्परपूरक असे. त्यांच्यात आज दिसणारे द्वैत नव्हते. विशेष म्हणजे, सत्य हे मूल्य ब-याच अंशी शाबूत होते. छापील शब्दांचा दबदबा होता. कोणाच्याही दावणीला बांधून घेणे अपमानास्पद समजण्यात येत असे. शिक्षक जसा गरीब असे तसाच पत्रकारही मध्यमवर्गीय असे. डामडौल, छानछौकी सर्वसाधारण पत्रकाराला परवडत नसे. संपादक बस अथवा लोकलने प्रवास करीत. माधवराव गडकरी यांना ‘मारुती गाडी’ भेट मिळाली तेव्हा तो बातमीचा विषय झाला होता. कालांतराने सगळेच बदलत गेले. मात्र सच्चे पत्रकार होते तसेच राहिले. गोठोस्कर श्रमिक पत्रकार नसले तरी त्यांनीही सत्य अन्वेषण, हेच उद्दिष्ट समोर ठेवून लिखाण केले.
अर्थात गोठोस्करांचेही प्रेमाचे आणि रागाचे विषय होते. मुंबईतील एका अग्रगण्य सहकारी बँकेविरुद्ध त्यांनी चालविलेली मोहीम अत्यंत वादग्रस्त ठरली. हेत्वारोपांचे वादळ उठले. काही काळानंतर ते शमलेसुद्धा. तथापि, अभ्यास करून अद्ययावत माहितीच्या आधारे लिखाण करण्याचे त्यांचे व्रत चालूच राहिले. सतत वाचन करणे हा पत्रकारासाठी पहिला धडा असतो. तो गोठोस्करांनी आयुष्यभर गिरवला. ‘नामूलं लिख्यते क्वचित’ हा बाणा त्यांनी जन्मभर जपला. त्यासाठी द्यावी लागणारी किंमतही मोजली. परंतु माघार घेतली नाही आणि त्याबद्दलची वाच्यताही केली नाही. वर्तमानपत्र सकाळी वाचकाच्या हाती पडते तेव्हा अनेकांचे श्रम त्यामागे असतात. संपादकीय पानावरील लिखाण हा त्याचा आत्मा असतो. त्यावरून त्याचा दर्जा लक्षात येतो. मात्र हे पान सजवणारा उपसंपादक किंवा सहसंपादक सामान्यपणे अप्रसिद्ध राहतो. अशा पत्रकारांना गोठोस्करांचा लेख हाती आला की, हायसे वाटत असे कारण शुद्ध भाषा आणि अचूक माहिती यांची ती जणू हमी असे.
गोठोस्करांबरोबर काम करण्याची संधी गतवर्षी विधिमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्मृतिग्रंथ सिद्ध करताना मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण संपादित करण्याची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. बाबासाहेबांसारख्या ज्ञानसूर्याचे भाषण वाचतानाच आपल्यावर दडपण येते. हे संपूर्ण भाषण वाचून त्याचा आटोपशीर मर्यादित अंश ग्रंथात समाविष्ट करताना त्याच्या मूळ वस्तुला तशाच स्वरूपात सादर करण्याचे आव्हान संपादक मंडळासमोर होते. मात्र हे काम गोठोस्करांनी स्वीकारल्यानंतर त्याबद्दलची निश्चिंती सर्वानाच वाटून गेली. अवघे पाऊणशे वयमान असलेले गोठोस्कर आणि त्यांचे समवयस्क वसंतराव देशपांडे यांनी या ग्रंथासाठी घेतलेले कष्ट अवर्णनीय म्हणावे लागतील.
आजचे वर्तमानपत्रीय लेखन वाचताना गोठोस्करांची आणि त्यांच्या पिढीतील पत्रकारांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पत्रकारितेला विविध रूपे असतात. मात्र समाज आणि राज्य यांचे हितरक्षण करणे, हे पत्रकारितेचे मूलभूत कर्तव्य पार पडले तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेण्याचा अधिकार पत्रकारितेला प्राप्त होतो. सत्याची चाड आणि आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा राखणे हे पत्रकारितेचे मानबिंदू आहेत. त्यांचे जतन होईल तेव्हाच लोकजीवन निरोगी होईल. एखादा अधिकारी किंवा राजकीय नेता आपल्या लिखाणामुळे नेस्तनाबूत करणे हे पत्रकारितेचे इतिकर्तव्य मानता येणार नाही. गोठोस्कर आणि त्यांच्या पिढीने या संकेताचे निष्ठेने पालन केले, याची नोंद होणे आवश्यक आहे. ते दुर्दैवाने न घडल्यास ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय,’ अशी अवस्था होणे क्रमप्राप्त आहे.

Please click here to read this article on Prahaar.in

No comments:

Post a Comment