Sunday, April 18, 2004

बेरीज कसली ही तर वजाबाकीच

शां. मं. गोठोसकर

लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांची एकजूट झाल्याने शिवसेना-भाजपचा धुव्वा उडेल , अशी आघाडीची पूर्ण खात्री होती. 1999 साली लोकसभा व विधानसभा निवडणुका एकदमच झाल्या , त्यावेळी दोन्ही काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढल्या होत्या. त्या दोघांच्या मतांची मतदारसंघांनुसार बेरीज पाहून सेना-भाजपचा पराभव नक्की , असा निष्कर्ष काढला गेला. पण ही बेरीज गृहीत धरणेच बरोबर नव्हते. याचे कारण म्हणजे , त्या बेरजेएवढी मते दोन्ही काँग्रेस एक असताना कधीच मिळाली नव्हती. विविध बाबींचा विचार करून मत कोणाला द्यायचे , हे मतदार ठरवितात. केवळ पक्षाचा विचार करीत नाहीत. यामुळे बेरीज निरर्थक ठरते. उभय काँग्रेसने आघाडी करताना जे सूत्र ठरविले , तेही अशा बेरजेला आता बाधक ठरत आहे.

गेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात दोन काँग्रेसपैकी जो मतांच्या आकड्यांनुसार वर होता , त्याला उमेदवारी देण्याचे सूत्र आहे. सोनिया गांधी शरद पवारांच्या घरी चहाला येण्यापूवीर्च ते ठरले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीने उमेदवारही निश्चित केले होते. त्यानुसार त्या पक्षाने कोपरगावसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची उमेदवारी पक्की केली होती.

या मतदारसंघात गेल्या वेळी बाळासाहेब विखेपाटील हे शिवसेनेतफेर् विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे गुलाबराव शेळके दुसऱ्या , तर काँग्रेसचे गोविंदराव आदिक तिसऱ्या क्रमांकावर होते. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत ससाणे जिंकले होते. राष्ट्रवादीचे मुरकुटे दुसऱ्या क्रमांकावर होते. याचा अर्थ , दोनदा आमदार झालेल्या मुरकुट्यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार नव्हती. याच कारणाने लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवार म्हणून त्यांना निश्चित केले होते.

बाळासाहेब विखेपाटील यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसप्रवेश केला आणि समीकरणे बदलली. त्यांना कोपरगावमधूनच उमेदवारी द्यायची , असे काँग्रेसश्रेष्ठींनी ठरविले होते. भंडारा लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी भाजप विजयी झाला होता. काँग्रेसचे डॉ. श्रीकांत जिचकार दुसऱ्या , तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते. ही जागा आता राष्ट्रवादीला द्यावी आणि त्याबदल्यात कोपरगावची जागा काँग्रेसला , असे ठरले आणि मुरकुटे बाजूला पडले. आता मी काय करू , असे त्यांनी शरद पवारांना विचारले. शिवसेनेत जा , असे त्यांना उत्तर मिळाले. मुरकुट्यांनी हे जाहीरपणे सांगितले आहे. शिवसेनेकडेही मुरकुट्यांच्या तोडीचा उमेदवार नसल्याने ते सेनेचे उमेदवार झाले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे शंकरराव कोल्हे निवडून आले होते. शिवसेनेचे नामदेवराव परजणे दुसऱ्या , तर काँग्रेसचे अशोक काळे तिसऱ्या स्थानावर राहिले. परजणे हे विखेपाटलांचे व्याही. तेही काँग्रेसमध्ये गेले. आता विधानसभा निवडणुकीसाठी ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याने काळे यांनी काय करायचे ? कोळपेवाडी साखर कारखाना , गौतम सहकारी बँक आदी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांचे ते पुत्र. नव्या परिस्थितीत हे पितापुत्र शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेला हे घबाडच मिळाले.

असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्याचा चंदगड विधानसभा मतदारसंघात झाला. तेथून 1995 साली भरमू पाटील हे अपक्ष विजयी झाले. शिवसेना-भाजप सरकारात ते राज्यमंत्री होते. पुढे 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नरसिंगराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवाराला नगण्य मते मिळाली. पुढे भरमूंनी काँग्रेसप्रवेश केला. पण आता त्यांना तिकिट मिळणार नसल्याने त्यांनी सेनेचा रस्ता धरला.

भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख हे 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत होते. पतंगराव कदम यांनी त्यांचा पराभव केला. शिवसेनेने अनामत रक्कम गमावली. आता विधानसभेच्या येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करण्याचा प्रश्ान्च येत नाही. मग साखरसम्राट पृथ्वीराजांनी काय करावे ? शिवसेनेवाचून त्यांना गत्यंतर उरलेले नाही.

विधानसभेचे किमान 100 मतदारसंघ असे आहेत की , जेथे शिवसेना व भाजप यापैकी एकाचीही ताकद नाही. तेथे ताकद फक्त काँग्रेस पक्षांची आहे. नव्या परिस्थितीत तेथील मातब्बर मराठा नेते शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करीत आहेत. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या पक्षांतरचा शुभारंभ केला.

या पक्षांतराची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. राज्यात मराठा समाज एकतृतियांश असून , दोनतृतियांश शेतजमीन त्यांच्याकडे आहेे. अन्य कोणताही समाज त्यांच्या जवळपास नाही. यामुळे ग्रामीण भागावर या समाजाची पकड आहे. हा समाज नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहिला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या हाती सत्ता आल्याची जाणीव या समाजाला झाली आणि काँग्रेसच्या मागे तो भक्कमपणे उभा ठाकला. यशवंतरावांची या समाजावरील पकड कमी करण्याचा इंदिरा गांधींनी प्रयत्न केला. काँग्रेसचे अनेकदा विभाजन झाले. तथापि , मराठा समाज या सर्व काँग्रेस पक्षांबरोबर राहिला. आता तो केंदात सत्ता असलेल्या भाजप आघाडीकडे जात आहे. बिगरमराठा समाजांना आपल्याकडे खेचून ताकद वाढविण्याचा प्रयत्न भाजप-सेनेने बरीच वषेर् केला ; परंतु मराठा समाजावाचून महाराष्ट्राचे राजकारण होत नाही , याची या पक्षांना उशिराने का होईना , पण जाणीव झाली. यामुळेच उभय काँग्रेस पक्षांतून येणाऱ्या मातब्बर मराठा मंडळींचे शिवसेना व भाजप यांनी स्वागत चालविले आहे. अशा प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी यांची एकजूट ही बेरीज नसून , ती वजाबाकी ठरत आहे.

No comments:

Post a Comment